अंडय़ावरील कोंबडीचे व्यवस्थापन साधारणत: १८-२० आठवडय़ापासून चालू होते. या काळात कॅलिमोर्निया पिंजरा असल्यास पक्ष्यांना एक चौरस फुटापेक्षाही कमी जागा लागते. परंतु गादी पद्धतीने जोपासल्यास त्यांना दोन चौरस फूट जागा असावी. घरे हवेशीर व भरपूर प्रकाश असणारी असावीत. पक्ष्यांना २०-२२ अंश सेल्सियस तापमान चांगले मानवते. त्यापेक्षा जास्त उष्णतेचा अंडी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. उष्णतेच्या ताणामुळे पक्ष्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. ४० अंश तापमानाच्या वर उष्माघातामुळे पक्ष्यांत मरतुक होते.
अंडय़ांवरील पक्ष्यांना प्रत्येकी चार-पाच इंच जागा खाद्य खाण्यासाठी असावी किंवा १८ इंच गोलाकार प्लास्टिकचे भांडे साधारणत: २० व्हाइट लेग हॉर्न कोंबडय़ांसाठी असावे. खाद्यासाठी कमी जागा दिल्यास कोंबडय़ा व्यवस्थित खाऊ शकत नाहीत. त्यामुळे अंडी उत्पादन कमी मिळते आणि कोंबडय़ांना काही वाईट सवयी लागतात. उदा. पंख उपटण्याची सवय. अंडय़ावरील कोंबडय़ांना पाणी पिण्यासाठी साधारण दोन ते अडीच इंच जागा लागते. त्यांना लेअर मॅश खाद्य दिले जाते. यात १८ टक्के प्रथिने असावीत. प्रति किलो खाद्यामध्ये साधारणत: २९०० किलो कॅलरीज ऊर्जा असावी. अंडी उत्पादनासाठी कॅल्शियम क्षारांची आवश्यकता असते. म्हणून खाद्यात कॅल्शियमचे प्रमाण तीन ते साडेतीन टक्के असावे.
कोंबडी अंडय़ावर येईपर्यंत लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला असतो. तरीही प्रत्येक अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर लासोटा लस पाण्यातून द्यावी. यामुळे मानमोडी रोगापासून पक्ष्याचे रक्षण होते. लसीपूर्वी जंताची औषधे द्यावीत. त्यामुळे पक्ष्यात मजबूत प्रतिकारक्षमता निर्माण होते.
अंडय़ांवरील पक्ष्यांना एकंदरीत १६ तास प्रकाश द्यावा. त्याचा अंडी उत्पादनावर चांगला परिणाम होतो. साधारणत: दिवस १२ तासांचा असल्यास रात्री चार तास दिवा चालू ठेवावा व आठ तास अंधार ठेवावा. १६ तासांपेक्षा अधिक काळ प्रकाश दिल्यास अंडय़ाचा आकार बदलतो. अंडय़ाचे कवच फुटते. अंडी मायांगात अडकतात. मायांग बाहेर पडून पक्षी मरतात. फ्ल्युरोसंट टय़ूबचा प्रकाश भरपूर पडतो व खर्चामध्ये कपात होते. प्रकाश शक्यतो खाद्याच्या व पाण्याच्या भांडय़ांवर पडावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी.. – जाळ्या ,खुच्र्या आणि डबे
सार्वजनिक रुग्णालयात जवळजवळ सगळे विनामूल्य असते म्हणून येथे गरीब येतात. ते संख्येने येतात म्हणून गर्दी असते आणि खाटा मर्यादित असल्यामुळे अर्धे रुग्ण जमिनीवर पथारीवर झोपतात. गर्दीमुळे सेवा अपुऱ्या पडतात. एकदा अपुऱ्या पडू लागल्या की, ती सबब सर्वकाळ पुरते आणि जेवढे व्हायला पाहिजे तेवढय़ातून पळवाटा निघतात आणि काहीच होत नाही. म्हणून शुश्रूषा करायला नातेवाईक लागतात. ते वॉर्डच्या बाहेर गर्दी करतात. तिथेच जेवतात, झोपतात. काम नसेल तेव्हा चकाटय़ा पिटतात आणि पान-तंबाखू खातात. बिडय़ा ओढतात. तिथेच आसपास थुंकतात आणि इतस्तत: कचरा फेकतात.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता वॉर्डच्या बाहेरच्या व्हरांडय़ाच्या कट्टय़ाला मी मजबूत जाळ्या लावल्या, कट्टय़ावर आता बसता येईना म्हणून इंडोको रेमेडीज या औषध कंपनीच्या कारे नावाच्या मालकाकडून पैसे मिळवून बसण्यासाठी भरभक्कम खुच्र्या दिल्या, त्या दर पंधरा खुच्र्याच्या समोर मजबूत न काढता येण्याजोगे पण रिकामे करता येण्याजोगे कचऱ्याचे डबे दिले. संस्थेच्या वतीने त्या डब्यात प्लास्टिक पिशव्या लावण्यासाठी माणूस ठेवला आणि दर मजल्यावर स्वच्छता निरीक्षक नेमले. टिळक रुग्णालयाच्या चौकात प्रार्थना करता यावी म्हणून एक देऊळ आहे. त्याच्याभोवती खुच्र्या-टेबले लावून घेतली. तिथे नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था केली आणि भांडी विसळण्यासाठी आणि हात-तोंड धुण्यासाठी एक नळ दिला. कचऱ्याच्या डब्यात नेम धरून पिचकारी मारता येत नाही म्हणून रंगरंगोटी होऊ लागली. तेव्हा डब्याच्या मागे लाल प्लास्टिक लावून ते डाग लपवले, पण काही तरी नेहमी शिजतच राहिले.
जाळ्यांमुळे आमची हवा बंद झाली, डब्यामुळे घाण जमली, देवळाच्या आसपास लोक मांसाहार खातात, जाडय़ा माणसांसाठी खुर्ची अरुंद आहे. एवढी शिस्त हवीच कशाला, अशा तक्रारींचा पाऊस पडू लागला. तरी बरे सगळ्या सुधारणा मी शासन आणि अधिष्ठाता यांना विचारूनच केल्या होत्या. सकाळी रुग्णालय कचऱ्याने वेढलेले असायचे ते आता स्वच्छ झाले होते. वातावरण नक्कीच सुधारले होते आणि एक दिवस ८० टक्के कचऱ्याचे डबेच गुल झाले. शोध घेतला तर ते सुरक्षारक्षकांच्या कार्यालयामागे भंगारासारखे पडले होते. एक मला म्हणाला, ‘डॉक्टर तुम्ही या सगळ्यात पाच-दहा लाख वापरले. हेच महानगरपालिकेतर्फे झाले असते तर २५ टक्क्याने हिशेब करा, म्हणजे त्यांचे (!) किती नुकसान झाले ते कळेल. शिवाय डब्यात कचरा पडू लागला तेव्हा झाडणे कमी झाले. अशीच जर सुधारणा होत गेली तर मग शिस्त वाढेल, अशी भीती वाढू लागली.
मी म्हटले, तेही खरेच.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chicken egg management
First published on: 03-09-2013 at 01:01 IST