छायाचित्रणाच्या क्षेत्रातला स्थिरचित्रणाच्या नंतरचा टप्पा म्हणजे चलत्चित्रण. एकापाठोपाठ काढलेली चित्रे वेगाने दाखवून हालचालींचा आभास निर्माण करणारी ‘फेनॅकिस्टोस्कोप’सारखी खेळणी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी वापरात होती. यामध्ये ‘पर्सिस्टन्स ऑफ व्हिजन’ (दृष्टिसातत्य) आणि ‘फाय फेनॉमेनॉन’ या दोन तत्त्वांचा वापर केला गेला होता. डोळ्यांनी पाहिलेली प्रतिमा नेत्रपटलावरून गेल्यानंतरही, सेकंदाच्या काही भागापुरती मेंदूमध्ये टिकून राहते, याला दृष्टिसातत्य म्हणतात. एकामागोमागच्या अशा प्रतिमा एकमेकांमध्ये मिसळून हालचालींचा आभास निर्माण होतो, याला फाय फेनॉमेनॉन म्हणतात. १८३० च्या दशकात निर्मिलेल्या या फेनॅकिस्टोस्कोपमध्ये एका पुठ्ठय़ाच्या चकतीवर अ‍ॅनिमेशनच्या स्वरूपातली अनेक चित्रे क्रमाने काढलेली असायची. एका हँडलद्वारे ही चकती फिरवल्यानंतर त्यावरची चित्रे हालचाल करीत असल्याचे भासायचे. १८९० साली थॉमस एडिसन आणि विल्यम डिक्सन यांनी अमेरिकेत ‘किनेटोस्कोप’ची निर्मिती केली. यात जलदगतीने सरकत असलेल्या छायाचित्रांकडे, त्यातील भिंगाजवळच्या एका छिद्रातून पाहिल्यास पट्टीवरील चित्रे हालचाल करीत असल्याचे भासायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थिर छायाचित्र घेण्यासाठी छायाचित्रणाच्या सुरुवातीच्या काळात अनेक मिनिटांचे एक्स्पोझर लागत असे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, चांदीच्या क्षारांबरोबर ‘कोलोडिऑन’ हे रसायन वापरल्यामुळे एक्स्पोझरचा हा कालावधी काही मिनिटांवरून सेकंदाच्या आत आला होता. दुसरी गोष्ट म्हणजे, आतापर्यंत कॅमेऱ्यासमोरचे झाकण हाताने काढून छायाचित्र घेतले जाई. चलत्चित्रांच्या निर्मितीच्या दृष्टीने कॅमेऱ्याचे झाकण उघडे ठेवण्याचा कालावधी अत्यंत अल्प असण्याची गरज होती. अमेरिकी छायाचित्रकार एडविअर्ड मयब्रिज याने १८७७ साली यांत्रिक पद्धतीने अत्यल्प काळ उघडणारे शटर असलेले बारा कॅमेरे रांगेत लावून त्यातून रेसच्या घोडय़ांच्या शर्यतीची छायाचित्रे घेतली. ‘मॅजिक लँटर्न’ नावाच्या साधनातून हे घोडे रीतसर धावताना दिसत असत.

जॉर्ज इस्टमनने १८८९ साली चांदीचेच क्षार वापरलेल्या, परंतु ‘सेल्यूलॉइड’ या रसायनाचा लेप दिलेल्या फिल्मची निर्मिती केली. या दीर्घ लांबीच्या आणि गुंडाळी करता येणाऱ्या चित्रफितीमुळे चलत्चित्रण सुलभ झाले. एडिसन आणि डिक्सन यांनी आपल्या किनेटोस्कोपमध्ये याच सेल्यूलॉइडच्या फिल्मचा वापर केला होता. या किनेटोस्कोपमध्ये योग्य ते बदल करून पॅरिसच्या ल्युमिए बंधूंनी १८९५ साली ‘सिनेमॅटोग्राफ’ची निर्मिती केली. या सिनेमॅटोग्राफमुळे दीर्घ लांबीच्या फिल्मवर चित्रित केलेली चित्रे हलत्या स्वरूपात, तेही मोठय़ा पडद्यावर दाखवणे शक्य झाले आणि व्यावहारिक स्वरूपाचा चित्रपट जन्माला आला.

सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cinematography search abn
First published on: 17-09-2019 at 00:04 IST