सूतनिर्मितीचे तंत्र
वस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कच्चा माल म्हणून विविध तंतूंचा उपयोग केला जातो. या तंतूंपासून प्रथम सुताची निर्मिती केली जाते. पुढे या सुतापासून कापड, कापडावर रासायनिक प्रक्रिया केल्या जातात व या पद्धतीने तयार झालेल्या कापडापासून कपडे शिवले जातात. पंधरा-वीस वर्षांपूर्वी वस्त्रोद्योगामध्ये फक्त रासायनिक प्रक्रिया करून तयार झालेले कापड (फिनिश्ड) बाजारात विकले जात असे. असे कापड कापडाच्या दुकानातून विकत घेऊन िशप्याकडून कपडे शिवून घेतले जात असत. त्या वेळी या उद्योगाला ‘वस्त्रोद्योग’ (टेक्सटाइल इंडस्ट्री) असे संबोधण्यात येत असे; परंतु आज बहुतांशी लोक तयार कपडे (रेडीमेड गारमेंट) विकत घेणे पसंत करतात.
तयार कपडय़ांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होण्यासाठी तयार कपडे शिवण्याचे उद्योग प्रस्थापित झाले. पूर्वी वस्त्रोद्योगातील उत्पादन विभागाची शृंखला रासायनिक प्रक्रिया विभागापर्यंत येऊन संपत असे. त्या शृंखलेमध्ये तयार कापडापासून कपडे शिवण्यासाठी शिलाई विभागाची भर पडली. तयार कपडे शिलाई उद्योग हा अशा रीतीने वस्त्रोद्योगातील उत्पादन विभागांच्या शृंखलेचा एक महत्त्वाचा भाग बनला. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे ‘वस्त्रोद्योग’ याऐवजी ‘वस्त्र व तयार कपडे उद्योग’ (टेक्सटाइल आणि अ‍ॅपरल इंडस्ट्री) असे नामकरण झाले.
सूतनिर्मिती ही वस्त्रोद्योगाची पहिली पायरी आहे. तंतूपासून सुताची निर्मिती केली जाते. तंतू हे दोन प्रकारांमध्ये येतात. काही तंतू हे कमी लांबीचे असतात. उदा. कापूस- दोन ते पाच सें.मी., लोकर ८ ते २० सें.मी., तर तागाचे तंतू २ सें.मी.पासून ७५ ते ८० सें.मी. एवढय़ा लांबीचे असतात. अशा तंतूंना आखूड तंतू (स्टेपल फायबर) असे म्हणतात. आखूड तंतूंपासून सूत तयार करण्यासाठी आधी या तंतूंची एका अखंड अशा लांबसडक सूत्रात (स्ट्रँड) रचना करून त्याला ताकद येण्यासाठी पीळ द्यावा लागतो. या प्रक्रियेस सूत कातणे असे म्हणतात व ज्या उद्योगात अशा प्रकारे सुताचे उत्पादन केले जाते त्या उद्योगास सूतकताई उद्योग (स्पिनिंग) असे संबोधले जाते.
चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर : पालनपूर संस्थान
गुजरातेतील आजच्या बनासकांठा जिल्ह्याचे प्रमुख शहर पालनपूर हे शहर स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश संरक्षित संस्थान होते. १७६६ चौरस कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या या राज्याला ब्रिटिशांनी तेरा सलामींचा मान दिला. प्रथम प्रल्हादपूर असे नाव असलेल्या या राज्याचे संस्थापक शासक अफगाणिस्तानातील युसुफझाई वंशाच्या लोहानी जमातीचे होते. १२ व्या शतकात या लोकांनी बिहारात आपले बस्तान बसविले; परंतु त्यांच्यातील मलिक खुर्रम खानाने १४ व्या शतकात बिहारमधून बाहेर पडून मांडोरच्या विशालदेव याच्याकडे सन्यात नोकरी धरली. खुर्रम खानाचा पुढचा एक वंशज मलिक गाझी खान द्वितीय याने अकबराच्या सावत्र बहिणीशी लग्न केल्यावर हुंडा म्हणून त्याला पालनपूर, दिसा आणि दांतीवाडा हे परगाणे मिळाले. पुढे मोगलांसाठी अफगाणांचा अंमल असलेले अटोक घेण्याची मोठी कामगिरी मलिकने केल्यामुळे दिवाण हा बहुमान त्याला मिळून आणखी काही जहागिऱ्या मिळाल्या. पालनपूरचे राज्यक्षेत्र आता विस्तीर्ण होऊन स्थिरता आली. परंतु सतराव्या शतकाच्या मध्यावर मराठय़ांच्या हल्ल्यांनी आणि खंडणीच्या मागण्यांनी त्रस्त होऊन पालनपूर शासकांनी ईस्ट इंडिया कंपनी सरकारसह १८१७ साली ‘संरक्षण करार’ केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वतंत्र भारतात १९४७ साली पालनपूर संस्थान विलीन होईपर्यंत पालनपूर नवाब ब्रिटिशांशी निष्ठावंत राहिले. त्यांनी अँग्लो-अफगाण युद्धात, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात आणि दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिशांना मदत केली. या काळातील पालनपूर शासक नवाब सर शेर मुहम्मद खान आणि त्यांचा मुलगा सर ताले मुहम्मद खान यांनी राज्यात आधुनिक सुधारणा आणि लोककल्याणकारी योजना राबवून चांगले प्रशासन दिले.
ब्रिटिशांच्या काळात प्रशासनाच्या सोयीसाठी सतरा लहान संस्थाने जोडून पालनपूर पोलिटिकल एजन्सी तयार केली गेली. पालनपूर येथे या एजन्सीचे प्रमुख प्रशासकीय ठाणे होते. पुढे स्वतंत्र भारतात पालनपूर सौराष्ट्र राज्यसंघात सामील केले गेले.
सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com