कुटुंब समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल.
खताची कामे झाल्यावर खरीप हंगामात समृद्धी बागेची सुरुवात करावी. या बागेची कल्पना नेहमीच्या शेतीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे कुटुंबातील स्त्रियांना सगळे लगेच जमेल असे नाही. हळूहळू त्यांना जमेल, झेपेल असे काम द्यावे.
सर्वप्रथम वेलीभाज्यांनी सुरुवात करावी. त्यांचा फायदा असा की त्यांच्यासाठी बी कमी लागते. या भाज्या चांगल्या वाढून अनेक दिवस उत्पादन देतात. बी-बियाणांच्या दुकानात अशा बहुतेक भाज्यांचे बी मिळते.
वेलीभाज्यांत काकडी वेलीभाज्या आणि दोडका वेलीभाज्या असे दोन प्रकार असतात. काकडी, वाळूक, कारली, दोडका, दुध्या, पडवळ, तांबडा भोपळा, कोहळा, घोसाळी, ढेमसे, तोंडली, परवर या भाज्या तसेच खरबूज, किलगड ही फळे लावता येतात. या भाज्यांना शेतातीलच झाडांच्या फांद्या, बांबू, मेढय़ा, तूरकाटय़ा, शेवऱ्या, पळाटय़ा अशा साहित्यापासून मांडव करता येतो. मांडवामुळे भाज्या निरोगी वाढतात. त्यांची फळेही जास्तीतजास्त मिळतात. कीड, रोग आल्याचे लगेच कळते. त्यावर ते वाढण्यापूर्वीच उपाय करता येतात.
घेवडेवर्गीय भाज्यांत सोलापुरी घेवडा, डबलबीन, लायमाबीन, वालपापडी, चवळी; शेंगभाज्यांत वाटाणा, गवार, भेडी, श्रावणघेवडा, पावटा (वाल), तूर, शेवगा, हादगा; मेथी, शेपू, चवळी, राजगिरा, करडी, अंबाडी अशा पालेभाज्या; कोिथबीर, पुदिना, कांदा, लसूण, आले अशा मसालेभाज्या; मुळा, गाजर, बीट, माईनमूळ अशा मूळ व कंद भाज्या; कोबीवर्गीय भाज्या; टोमॅटो, ढोबळी मिरची, पुंडय़ाऊस अशा फळभाज्या; कडधान्ये, तृणधान्ये, फळझाडे, फुलझाडे, इतर उपयुक्त झाडे (बांबू, साग, शिवण, शिसव, चंदन, कडुिलब), औषधी झाडे या बागेत लावता येतील.
-प्र.बा. भोसले (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी..  – विज्ञानवृत्ति आणि विज्ञानाची भाषा
आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले म्हणून का होईना, त्यांची भाषा आपल्याला मिळाली हे आपले सुदैवच. हीच भाषा आता विश्वाची भाषा होऊ घातली आहे. इंग्रजांचा मी उदोउदो करतो असे समजू नका, कारण इतर वसाहतकारांचा आणि त्यांच्या वसाहतीमधे झालेल्या जुलमांचा, धर्मातराचा आणि स्थानिक भाषा घोटण्याच्या झालेल्या प्रकाराचा लेखाजोखा घ्यायचा असेल तर दक्षिण अमेरिकेचा इतिहास वाचावा.
काळाच्या प्रवाहात उत्तर अमेरिकेत आपली राष्ट्रभाषा कोणती असावी याची जनमत चाचणी झाली तेव्हा इंग्रजीने जर्मन भाषेवर निसटता विजय मिळवल्याची पुसटशी गोष्ट वाचल्याचे आठवते. पुढे अमेरिकेने सगळीकडेच वर्चस्व स्थापन केल्यावर तर आपल्या  पथ्यावरच पडले. शेवटी आइन्स्टाइन जर्मन असला तरी त्याला विज्ञानाच्या सिंहासनावर इंग्रजी बोलणाऱ्यांनीच बसवले आणि त्याने आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे अमेरिकेतच काढली. इंग्रजीमुळेच आपल्याकडे बोस, रामन आणि हल्लीचे नारळीकर संशोधक म्हणून नावाजले. आपले मूलभूत तत्त्वज्ञान वैज्ञानिक निकषावर आधारित आहे हे जे हल्ली दवंडी पिटल्यासारखे सांगितले जाते तेही इंग्रजी वर्तमानपत्रांमुळेच सर्वत्र पसरते. तत्त्वज्ञानावर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ज्या विलोभनीय अलंकारमंडित इंग्रजी भाषेत लिहिले ते वाचले की वाटते की त्यांनी ‘इंग्रजातेही पैजा जिंके’ अशा स्तराचे लिहिले आहे.  पण ही आणि इतर अनेक नावे आपल्या लोकसंख्येच्या मानाने अपवादात्मक आणि विरळाच. बाकीच्यांनी हेल काढत पोपट पंची केली.
पूर्वी दोन तीन प्रकारच्याच मोटर गाडय़ा मिळत असत. नवी घेणे अनेक तऱ्हेने दुरापास्तच असे तेव्हा कोपऱ्याकोपऱ्यावर गाडी दुरुस्त करण्याची गॅरेज असत. त्यातले वंगणाने मळके झालेले कपडे घालून कोठलीही गाडी वर्षांनुवर्षे चालत ठेवण्याचे, जे काम होई त्याला जी करामत लागत असे ती करामत अस्सल एतद्देशीयच. पण त्यांच्यातल्या असंख्य हुशार तरुणांच्या मनात आपणच एक नवी गाडी बांधावी असा विचार एक तर आला नाही किंवा प्रोत्साहनाविना तो मागे पडला असेच झाले..
कारण आपण आत्मविश्वास गमवून बसलो होतो. आपल्यात जिद्द नव्हती आणि आपली अर्थव्यवस्था खिळखिळी होती.
मधल्याकाळात लोकानुनयनामुळे धड ना इंग्रजी धड ना मराठी असा काळ गेला. आता सर्वत्र अतिशय निकृष्ट इंग्रजी, एखाद्या तवंगासारखे पसरले आहे.
इंग्रजी हवेच पण ते चांगले हवे आणि आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय भाषा म्हणून हवे.
उद्या मातृभाषेबद्दल.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crops in the family wealth garden
First published on: 24-12-2013 at 12:13 IST