एखाद्या देशाच्या औद्योगिक प्रगतीचे परिमाण एकेकाळी सल्फ्युरिक अ‍ॅसिड किती वापरले जाते यावरून ठरविले जाई. नंतर पोलाद किती वापरले जाते ते परिमाण आले आणि नंतर आले प्लास्टिकचे परिमाण. तसे पाहिले तर प्लास्टिकचे उत्पादन जगात सुरू होऊन जेमतेम ६०-६५ एवढीच वष्रे झाली आहेत आणि प्लास्टिकचे हे परिमाण व्यवहारात आले ते ३०-३५ वर्षांपूर्वीच. सुरुवातीला प्लास्टिककडे शोभेच्या वस्तू बनवण्याचा पदार्थ म्हणून पाहिले जाई. पण नंतर प्लास्टिक प्रत्येकाच्या केवळ घरातच नव्हे तर जीवनाच्या सर्व व्यवहारात गेले आहे. आणि त्याचा विस्तार अजूनही चालूच आहे.
१९२६ साली हल्लीच्या बांगलादेशातील जेसोर येथे प्लास्टिकचे कंगवे बनवायला सुरुवात झाली. नंतर १९५७ साली पॉलिकेम कंपनीने मुंबईत पॉलिस्टायरीन बनवायला सुरुवात केली. पुढे दोन वर्षांत कोलकात्याला आय. सी. आय. कंपनीने पॉलिथिलीन बनवायला सुरुवात केली. मग युनियन कार्बाईड आणि नोसिल कंपन्यांचे कारखाने मुंबईत आले. त्यांनी इथिलीन आणि त्यापासून अनेक पदार्थ बनवायला सुरुवात केली. प्रथम इथिल अल्कोहोलपासून इथिलीन बनवले जाई आणि अ‍ॅसिटीलीन वायूपासून पीव्हीसी बनवले जाई. पण मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घ्यायला कार्बनी रसायनेच हवीत आणि त्यासाठी पेट्रोलियम पदार्थाचाच उपयोग करावा लागतो. ‘मुंबई हाय’ प्रकल्पातून तेलाबरोबर मिळणाऱ्या वायूमधून इथेन आणि प्रोपेन मिळवता येतो व त्यापासून अनेक पेट्रोरसायने आणि प्लास्टिक बनवता येतात. भारतातील प्लास्टिक उत्पादनाचे दोन भाग पडतात. एका भागात रेझिन निर्मितीचे कारखाने असतात. दुसऱ्यात रेझिनपासून अनेक वस्तू बनवतात. जगात आज अनेक प्रकारची रेझिन बनतात.
महाराष्ट्रातील प्लास्टिकचे लघुउद्योग १९७३ साली सुरू झाले. त्यात पाईप, रॉड, तोटय़ा, छत्र्यांच्या मुठी, फिल्म, पत्रे, पिशव्या, रेनकोट, रेझिन, तंतू, सूत, दोऱ्या, विणलेल्या पिशव्या, लवचीक पट्टय़ा, पादत्राणे, गृहोपयोगी वस्तू याशिवाय अनेक औद्योगिक वस्तू बनतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोधन पर्व: समाजसत्ता आणि सत्याग्रही संस्कृती
‘‘भांडवलशाही समाजात अपरिमित भौतिक उपभोग घेणारा एक छोटा मालकवर्ग आणि त्याच्या आर्थिक दास्यात रखडणारा दुसरा बुभुक्षित बहुसंख्य सेवकवर्ग असे निर्माण होत असल्याने अशा समाजात शांततेची व नीतीची अपेक्षा करताच येत नाही. ज्या समाजातील बहुसंख्य लोकांना आपल्या जीविताची व जीवितसाधनांची मुळीच शाश्वती नाही अशा समाजात शांतता व नीतिमत्ता नांदणे अशक्य आहे. हिंदुस्थानसारख्या खंडतुल्य राष्ट्रातील पस्तीस कोटी लोकसंख्येच्या पोटापाण्याचा प्रश्न भांडवलशाहीच्या  व साम्राज्यशाहीच्या मार्गाने सोडविणे अशक्य आहे. आणि एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येची जीवितयात्रा सुखाने चालविण्याचे सामथ्र्य केवळ हस्तव्यवसायाच्या ग्रामोद्योगात अथवा छोटय़ा प्रमाणावरच्या वैयक्तिक शेतीत आहे असे वाटत नाही. शिवाय, एवढा मोठा भारतीय समाज हा केवळ आश्रमवासी ऋषीप्रमाणे भौतिक सुखाविषयी विरक्त आणि आत्मिक सुखावर संतुष्ट राहील ही गोष्टही शक्य कोटीतील नाही. या खंडतुल्य भारताचा प्रश्न सोडविण्यास भौतिक विद्या आणि यंत्रकला यांचा भरपूर उपयोग केला पाहिजे व तो धनोत्पादनाचे व धनविभाजनाचे कार्य समाजसत्तेखाली आणूनच केला पाहिजे.’’ ही समाजसत्ता येण्यासाठी आणि आल्यावरही भारताला सत्याग्रहीवर्गाची खरी आवश्यकता आहे, किंबहुना ती सर्व मानवसंस्कृतीलाच आहे हे सांगताना आचार्य शं. द. जावडेकर म्हणतात – ‘‘यापुढे भारतीय संस्कृती व मानवसंस्कृती असा भेद राहणार नाही. भौतिक दृष्टय़ा आज सर्व मानवसमाज एका कुटुंबात अथवा एका घरात आणून कोंडल्यासारखा झाला आहे. त्यातील लोकांना एकत्र नांदल्याखेरीज सुटका नाही व त्यांनी एकत्र नांदावे यातच मानवकुलाची उन्नती आहे. पण एका घरात नांदणाऱ्या लोकांप्रमाणे त्यांनी बंधुभावनेने नांदावयास शिकले पाहिजे. येथून पुढे मानवसंस्कृतीची उन्नती या बंधुभावनेच्या प्रचारावर आणि प्रस्थापनेवर अवलंबून आहे. मानवांच्या अंत:करणातील या बंधुभावनेस प्रेम अशी संज्ञा आहे आणि हा प्रेमरूप परमेश्वर प्रत्येकाच्या अंत:करणात वास करीत असतो, या सिद्धांतावर सत्याग्रही संस्कृतीचा आधार आहे.’’

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity beginning of plastic factories
First published on: 03-05-2014 at 02:45 IST