कुतूहल: सिगारेटचा धूर

धूम्रपानाचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. तंबाखूयुक्त सिगारेटच्या धूम्रपानाने स्वास्थ्याला धोका असतो व त्यासंबंधी सूचना देणाऱ्या जाहिराती ठायी ठायी नजरेस पडतात.

धूम्रपानाचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत. तंबाखूयुक्त सिगारेटच्या धूम्रपानाने स्वास्थ्याला धोका असतो व त्यासंबंधी सूचना देणाऱ्या जाहिराती ठायी ठायी नजरेस पडतात. तंबाखूतील निकोटीन हे रसायन, मानसिक उभारी देणारे (सायकोअ‍ॅक्टिव) असते व त्यामुळे सिगारेटचे व्यसन जडते. सिगारेट ओढणाऱ्यांचे आयुर्मान साधारण १४ वर्षांनी कमी होते. गर्भवती बाईने सिगारेटी फुंकल्यास विकृती असलेले बाळ जन्माला येते. त्यात कमी वजन, शारीरिक व्यंग, अकाली जन्म यांचा समावेश असतो. सिगारेटच्या तंबाखूत प्रोपेलिन ग्लायकोल, ग्लिसरॉल यांसारखे आद्र्रता टिकविणारे पदार्थ, सुगंधित द्रव्ये इ. मिसळलेले असतात.
प्रत्यक्ष धूम्रपान करणाऱ्याइतकाच अप्रत्यक्ष धूर पोटात जाणाऱ्यांनादेखील या धुरातील घातक रसायनांचा फटका बसतो. त्यासाठीच तर गाडीघोडय़ातील प्रवासात तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला मज्जाव असतो. धूम्रपानाचे इशारे तर सर्वत्र झळकत असतात. इतके असूनही काही शौकीन मंडळी या व्यसनाच्या आहारी गेलेली आढळतात.
त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ी-्रूॠं१ी३३ी२ किंवाी-्रूॠ२) चा शोध लागलेला आहे. विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या या सिगारेटमधून धूर येत नाही, विशिष्ट प्रमाणातले निकोटिन (तंबाखूमधले नशा देणारे रसायन) धूम्रशौकीनांच्या पोटात जाते. आजूबाजूच्यांना त्याचा कोणताच त्रास होत नसतो.
नव्या शोधांनुसार या सिगारेटमध्ये तंबाखूतले कर्कप्रेरकी असतातच पण त्याव्यतिरिक्त एरवीच्या तंबाखूत न आढळणारी घातक रसायनेदेखील त्यात असतात. तंबाखूत चार प्रकारची नायट्रोसामाइन गटातील रसायने असतात आणि ती कर्कप्रेरकी असतात. तंबाखूत एन- नायट्रोसोनिकोटिन (ठठठ) एन-नायट्रोसोनबेसिक (ठअइ) एन-नायट्रोसोअनाटॅब्बाईट (ठअळ) आणि ४ (मिथाईल नायट्रोसो)-१- (३ पायरीडिल -१ ब्युटेनॉन (ठठङ) ही ती विषारी रसायने होत. ई-सिगारेट्मध्ये तर यांच्या व्यतिरिक्त फॉर्मोल्डिहाइड, ‘असिटाल्डिहाइड आणि अक्रोलिन यांसारखी कबरेलीन संयुगे आढळली आहेत. या ई-सिगारेटमधून उत्सर्जति होणारी ग्लिसरॉल आणि प्रोपिलिन ग्लायकोल ही बाष्परूपातील रसायने फारशी अपायकारक नसतात, पण त्यातून बाहेर पडणाऱ्या कॅडमियम, शिसे आणि निकेल या धातूंच्या वाफा संशोधकांना चिंताजनक वाटतात. साधारण सिगारेटमध्ये ही रसायने नसतात. त्यातच ई-सिगारेटमधून बाहेर पडणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवणारे कायदेकानून अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील नाहीत. भविष्यातला धोका ई-सिगारेटचाही आहे.

मनमोराचा पिसारा: लागा चुनरी में दाग..
लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे.. हे मन्नादांच्या असंख्य लोकप्रिय गाण्यांपैकी एक.   त्यांचं स्वच्छ शब्दोच्चारण, दाणेदार ताना आणि अखेरचा तराणा यानं मन्नादांची विलक्षण प्रतिमा सिद्ध होते. कितीही वेळा ऐकलं तरी पुन:पुन्हा ऐकावंसं वाटतं आणि दिवसभर मनात रुंजी घालतं.
पडद्यावर एक नर्तिका छानपैकी नाचते, तिचा घुंगरू शेवटी तुटतो तरी गाण्याची अखेर होत नाही, असं नाटय़ चित्रित केलंय. अर्थात शम्मीची रांगडी स्टायलिश अ‍ॅक्टिंग मनावर अधिक ठसते, हेही तितकंच खरंय.
गाण्याच्या बोलातला गर्भितार्थ कवीनं अधिक रहस्यमय ठेवला असता तर बरं झालं असतं. ‘मोरी चुनरिया आतमा मोरी, मैल है माया जाल..’ असं म्हणून कवीनं सगळंच सांगून टाकलंय. त्यामुळे गाण्यातलं मर्म उलगडून दाखवायला स्कोप राहिलेला नाही. तरीदेखील या गाण्यावर मनापासून विचार करावासा वाटतो, याचं कारण ‘बाबुलसे नजरें मिलाऊ कैसे? घर जाऊँ कैसे?’ या शब्दांची भुरळ पडते आणि एकूणच या गाण्यांमध्ये सहजपणे निरागसता जाणवू लागते. जीवनावर या गाण्यानं सुरेख भाष्य केलंय.
इथली चुनरी म्हणजे आत्मा असं मानलं तरी खऱ्या अर्थानं चुनरी म्हणजे आत्म्याचं देहरूप. देह म्हणजे मनातल्या दोन प्रमुख भावना- कमालीची आसक्ती आणि टोकाची भीती. देहरूपानं जगताना मनात भिनलेल्या या दोन भावना म्हणजे आत्म्यावर पडलेले डाग आणि हे डाग मुळीच अच्छे नसतात. चुनरी मलीन होते आणि आपलं चैतन्याचं हे प्रकटरूप डागाळतं.
आपण जन्माला येतो ते विशुद्ध चेतस म्हणून. क्षणोक्षणी विकसित होणारं हे चैतन्य हा आपला बाबुल- ‘कॉस्मिक एनर्जी’कडून मिळालेली ‘देन’ असते.
जीवनाचं मायावी रूप न उलगडल्याने चैतन्याची निर्मलता विरूप होते. असं विस्कटलेलं रूप घेऊन मी कोणत्या तोंडानं निर्मिकाला सामोरं जाऊ. हे तर माझ्या अज्ञानीपणानं, अडाणीपणानं ओढवलेलं पाप आहे. या पापाची मला आता लाज वाटत्येय. माझ्या अनमोल ठेव्याला मी माझ्या कर्मानं बाटवलं असं मला वाटतं.
गाण्यामधल्या बोलामधून विचारांची मालिका सुरू झाली आणि माझ्यापाशी येऊन थांबली..
.. मला नवीन जीवनदृष्टी मिळाली. मला जाणवलं की ही कॉस्मिक ऊर्जारूपी, सौरशक्ती मला स्वच्छ प्रकाश दाखवते. तरी जगाचं खरं स्वरूप मला उलगडत नाही, कारण मीच आंधळा असतो. डोळे उघडून पाहिलं तेव्हा हे जाणवलं.
आता प्रार्थना एकच, या चुकणाऱ्या पाडसाला क्षमा करून आपलंसं करावं..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: माणसामाणसांत पंक्तिप्रपंच करतो, तो धर्म कसला?
‘‘धर्मातरासाठी आम्ही जर आतुर असतो आणि अस्पृश्यतानिवारण्याचा प्रश्न स्वत:पुरता व स्वत:च्या भावी पिढीपुरताच आम्हांस सोडवायचा असता, तर आम्ही तसे यापूर्वीच केले असते. पण शक्यतो हिंदुधर्मात राहायचे आणि अखिल बहिष्कृत वर्गाच्या दृष्टीने विचार करायचा अशीच आमची इच्छा असल्यामुळे आम्ही आमचे सत्याचे प्रयत्न चालवले आहेत. तथापि, कोणत्याही एका व्यक्तीच्या काय किंवा एखाद्या वर्गाच्या काय, सहनशीलतेला मर्यादा ही असायचीच.. आम्ही तुमच्या लाथा खाऊ पण तुमच्या धर्मात राहू, असे आम्ही का म्हणावे? तुमचा आमचा धर्म जर एक, तर तुम्हांला आम्हांला हक्क सारखेच. माणसामाणसांत जो धर्म पंक्तिप्रपंच करतो, कोटय़वधी लोकांना त्यांचा स्वत:चा अपराध नसता गुन्हेगारांपेक्षा वाईट रीतीने वागवितो; विशिष्ट वर्गातल्या लोकांना पिढय़ान् पिढय़ा इहलोकाच्या नरकयातना भोगावयास लावतो, माणूस असून त्यांना जनावरांनाही मिळणाऱ्या सवलती मिळत नाहीत तो धर्म कसला?’’
धर्मातराच्या विचारावर स्पृश्य हिंदूूंनी टीका केल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर  (संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर)  प्रतिवाद करताना म्हणाले –
‘‘‘यतोऽभ्युदये नि:श्रेयससिद्धि: स धर्म:’ ही धर्माची व्याख्या. ज्याच्या योगाने अभ्युदय (ऐहिक उन्नती) व मोक्ष यांची प्राप्ती होते तो धर्म. आधी अभ्युदय व मग मोक्ष. अभ्युदय म्हणजे संसारातील उत्कर्ष किंवा उन्नती हे धर्माचे पहिले साध्य. अस्पृश्यतेमुळे अभ्युदयाचा मार्ग बंद झाला आहे. मोकळे वावरता येत नाही. घाणेरडय़ा वस्तीत राहावे लागते. शिक्षण घेता येत नाही. प्रतिष्ठित धंदे करता येत नाहीत. मग अभ्युदय कसा व्हायचा? नि:श्रेयस म्हणजे मोक्ष. तो मार्ग सर्वाना मोकळा ठेवला आहे. तो पाहिला आहे कोणी नि कुठे? त्रिवर्णिकांची सेवाचाकरी करण्यानेच शूद्रांना नि अतिशूद्रांना सद्गती मिळेल असे धूर्त शास्त्रकारांनी लिहून ठेवले आहेच. अस्पृश्यता ही एक गुलामगिरी आहे. गुलामगिरी नि धर्म एके ठिकाणी नांदूच शकत नाहीत. ती जोडी असंभाव्य आहे.’’  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Curiosity cigaret smoke