सेल्युलोज नायट्रेटबाबत १८४६ सालची गोष्ट. जर्मनीच्या ख्रिश्चन श्योनबाईन यांच्या हातून नायट्रिक आम्लाची बाटली कलंडली आणि त्यातील आम्ल जमिनीवर सांडले. त्यांनी जवळच्याच एका वाया गेलेल्या अ‍ॅप्रनने ते आम्ल पुसून घेतले आणि तो लांब ठेवून दिला. आश्चर्य म्हणजे थोडय़ा वेळाने त्या अ‍ॅप्रनचा अचानक स्फोट झाला. यामुळे काही हानी तर झाली नाहीच, पण सेल्युलोज नायट्रेट या रसायनाचा शोध लागला. त्यांचा अ‍ॅप्रन हा सुती म्हणजे ‘कॉटन’चा होता. त्यामुळे हे रसायन ‘गनकॉटन’ आणि नंतर कालांतराने नायट्रो सेल्युलोज किंवा सेल्युलोज नायट्रेट या नावाने ओळखले जाऊ लागले. या रसायनात जर नायट्रेटचे प्रमाण १४ टक्के वाढवले की त्याचे एका ज्वालाग्राही-स्फोटक पदार्थात रूपांतर होते. त्याचा उपयोग नाविक दलातील क्षेपणास्त्रांसाठी होतो. अ‍ॅसिटोनमध्ये २५% गनकॉटन विरघळवले तर एक चमकदार पदार्थ तयार होतो. मोटार आणि विमानातील काही भाग बनवण्याकरिता आणि वाद्यवृंदामधील काही वाद्यांना चकाकी यावी म्हणूनही ते वापरतात.
रसायनशास्त्रामधील ‘क्रोमॅटोग्राफी’ तंत्रात सुलभता आणण्यासाठी ‘नायट्रो सेल्युलोज मेम्ब्रेन’चे खास तक्के तयार केलेले आहेत. तसेच त्यापासून कोलोडायोन नामक पदार्थ तयार होतो. डायलिसिस प्रक्रियेकरिता तो उपयुक्त ठरला आहे. काही वेळा रॉकेटच्या उड्डाणासाठी प्रॉपेलंट आणि एक  प्रभावी ऑक्सिडंट म्हणून सेल्युलोज नायट्रेट वापरतात.
पूर्वी बिलियर्ड या खेळाचे चेंडू हस्तिदंतापासून बनवीत असत. पण ते दुर्मीळ होत चालल्याने सेल्युलोज नायट्रेटचे बनवण्याचा प्रघात पडला. िपगपाँगचे चेंडूदेखील सेल्युलोज नायट्रेटचे तयार होत असत; परंतु क्वचित त्याचा स्फोट झाल्याने सेल्युलोजमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण कमी केले गेले. मग असे सुरक्षित रसायन चेंडूंसाठी वापरले जात आहे. कापूर हा घटक वापरून त्याची फोटोग्राफीची उत्तम फिल्म बनते. कारण ती काचेसारखी पारदर्शक असते. इस्टमन कोडॅक यांनी प्रथम छायाचित्रणासाठी उपयुक्त फिल्म १८८५ साली बनवली. एक्स-रे आणि सिनेमाची फिल्म बनवण्यासाठी त्याचा भरपूर उपयोग केला गेला. मात्र ही फिल्म ज्वालाग्राही असल्याने आगीमध्ये टिकत नाही.
प्रबोधन पर्व: कोणालाही निराश होण्याचें कारण नाही
कवी भासाची नाटके त्याच्या काळी जाळली गेली, असे मानले जाते. त्याविषयी शि. म. परांजपे लिहितात- ‘‘भासा, तुझे ग्रंथ कां जळले गेले? तुझ्या शत्रुंनीं तुझीं काव्यें जाळलीं किंवा एखाद्या राजाचा तुझ्यावर प्रकोप झाला? उदार मनाचे राजे लाभण्याच्या कामांत तुझ्या वेळचे लोक भाग्यवान् होते. मग तुझ्यावर हा प्रसंग कां आला? किंवा तुझ्या अनेक नाटकांपैकीं उत्कृष्ट नाटक कोणतें याची परीक्षा पाहण्याकरितां अग्नीचें दिव्य करण्याच्या कल्पनेचा हा परिणाम आहे? कसली ही दिव्याची कल्पना! ह्य़ा कल्पनेच्या पायीं, भासा, तुझें स्वप्नवासवदत्त हें एक नाटक चांगल्यांत चांगलें ठरलें असेल; पण बाकीचीं अजीबात जळून गेलीं, त्याची वाट काय? अग्नींत टाकलेल्या सीतेप्रमाणे तुझी वासवदत्ता शुद्ध म्हणून अग्नींतून जशीच्या तशी बाहेर आली, ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे खरी; परंतु ती एक चांगली ठरविण्यासाठीं तुझ्या परीक्षकांनी- नव्हे तुझ्या जन्मांतरींच्या वैऱ्यांनीं- तुझी बाकीचीं सर्व नाटके जाळून टाकली. आपलें ग्रंथ लुप्तप्राय होण्याचा हा पुत्रशोकवत् दुर्धर प्रसंग तुझ्यावरच आलेला आहे, असें नाहीं. पुष्कळांनीं हीं दु:खें सहन केलीं आहेत.. इतक्या लोकांच्या ग्रंथांची होळी पेटलेली पाहिली असतां मग आपले ग्रंथ नष्ट झाल्याचें कांहींच वाटत नाहींसें होतें, असें तुला वाटत नाहीं काय!  परमेश्वर या जगांत जोंपर्यंत हयात आहे, तोंपर्यंत दुष्ट लोकांनीं कितीही अपकार केले, तरी कोणालाही निराश होण्याचें कारण नाहीं. ज्यानें बुडणारी श्रति मत्स्यरूपानें तारली, ज्यानें ज्वाळांमध्यें प्रविष्ट झालेली सीतादेवी प्रत्यक्ष अग्नीच्याही हातून श्रीरामचंद्राच्या हातीं आणून दिली, आणि ज्यानें तुकारामाच्या अभंगांची गाथा श्रीपांडुरंगाच्या रूपानें इंद्रायणीच्या डोहांतून कोरडीच्या कोरडी वर काढून आणली, तोच परमेश्वर तुझ्याही कवितेच्या पाठीमागें उभा आहे! तो पहा! तो या जगांतील जरुरीची अशी कोणतीही चांगली गोष्ट नाहींशी होऊं देणार नाहीं!’’
मनमोराचा पिसारा: मोहे अंग लगा लो
सखीर रे बिरहा के दुखडे सेह सेहकर, जब राधे बेसुध सी हो ली, तो एक दिन अपने मनमोहनसे यू बोली..
अशी निवेदनात्मक सुरुवात होऊन गुरुदत्तच्या ‘प्यासा’मधलं ‘आज सजन मोहे अंग लगा लो..’ या बाऊल गीताचे सूर कानी पडतात. पडद्यावरच्या गुलाबो (वहिदा रेहमान) सारखे आपणही चमकतो. गुलाबो ही विजय (गुरुदत्त) ची प्रेयसी, साधेशी, गरीब. ती चमकते कारण तिला आपल्या प्रियकराबद्दल अगदी तशाच भावना मनात दाटून आलेल्या असतात. आपण चमकतो कारण पडद्यावरील गाणारी सेवादासी (बाऊल स्त्री) जोगी वेशात असते, तन्मयतेनं गाणं गाते आणि गुलाबो त्या मानानं छचोर, कपाळावर बटा, गडद वस्त्र, अंगावर चार खोटे दागिने अशा रूपात दिसते; परंतु दोघी परस्परविरोधी रूपात असल्या तरीही एकाच विरहवेदनेनं व्याकूळ झालेल्या असतात.
बाऊल हे बंगाली संस्कृतीमधले वैष्णव (मधुरा) भक्त. फकिरी वृत्ती, नि:संगपणे भटकणारे सूफी गूढत्वानं भारलेले आणि कृष्णरूपी ईशचिंतनात्मक गाणी गाणारे अनागर गायक. एकतारा आणि गळ्यातला ढोलक वाजवीत ते मान हलवीत, झुलत-झुलत गातात. बंगाली वळणाच्या चित्रपटात अनेकदा दिसतात. उदा. ‘देवदास’.
मुळात बाऊल शब्दाची व्युत्पत्ती वातुल (बातुल) म्हणजे (वातानं) वेडावलेले किंवा ब्याकुल म्हणजे विरहानं व्याकूळलेले. म्हणजे ‘उत्कट प्रणयानं, विरहानं झपाटलेले कृष्णभक्त’.
गुरुदत्तनं गुलाबो आणि विजय यांच्या अस्फुट प्रेमाच्या स्वरूपातला या गाण्यानं वेगळाच आयाम दिला आहे. खरं पाहता, साहिर (लुधियानवी) च्या खास पठडीतलं हे गाणं नव्हे, पण साहिर गाणी लिहायचा तेव्हा त्याचा कलाम त्याची विफल आशिकी असायचा, प्रेमाच्या शाईनं तो आयुष्याच्या ‘कागज’वर शायरी रेखाटीत असे. त्यामुळे बाऊल गीताचा आत्मा त्यानं अचूक हेरला. साध्या शब्दांना गीता दत्तनं विलक्षण आर्तपणे सादर केलंय. बाऊल संगीत तर बर्मनदांना त्यांच्या श्वासाइतकं आपलं वाटावं, असं.
आपल्या कृष्णरूपी प्रियकरावर आत्मार्पण करणं, त्याच्या प्रेमात अवघं जीवन ओवाळून टाकणं म्हणजेच खरी भक्ती असल्याचं बाऊल गीतात जाणवतं आणि हे प्रेम मानसिक तितकंच शारीरिक. कृष्णाविषयी दैहिक ओढीच्या संवेदना जाणवणं म्हणजे आसक्ती नव्हे. ती वासनाही नव्हे, तर भक्तीचा तो पूर्ण अनुभव. खराखुरा तो सच्चेपणा हीच आध्यात्मिकता आहे. या गाण्यात आतुरता आहे, त्यात हृदयकी पीडा आहे तशी देहकी अग्नी आहे. सावरियाँ, तुझ्याशी होणाऱ्या मिलनातल्या प्रेमरसाच्या वर्षांवात मला सचैल न्हाऊन निघायचंय, असंच राधा (गुलाबो) म्हणते. तू मिळालास तरच या जनम की दासीच्या विरह वेदना मिटतील!
गाण्यामधली ही व्याकूळ आळवणी अतिशय भावते. त्यात उत्स्फूर्त आर्तता आहे, उत्कट आवेग आहे. गाण्यानं मी मंत्रमुग्ध होतो. गुरुदत्तची दृश्य आणि ध्वनी माध्यमावरील अद्वितीय हुकूमत होती. त्याचा प्रत्यय येतो. गाणं ऐकावं, बघावं आणि जगावं असं.
डॉ.राजेंद्र बर्वे