व्यवहारात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमध्ये लो डेन्सिटी पॉलिथिलिन (एलडीपीई), हाय डेन्सिटी पॉलिथिलिन , पॉलिव्हीनाइल क्लोराईड, पॉलिकाबरेनेट पॉलिस्टायरीन (पीएस), पॉलियुरेथीन (पीयू), पॉलिलीप्रॉपीलीन (पीपी), पॉलिथिलीन-टेरेथेलेट (पेट) हे प्रकार येतात. अनेक पॉलिमरमध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतो. पीव्हीसीमध्ये क्लोरीन असतो. नायलॉनमध्ये नायट्रोजन असतो. टेफ्लॉनमध्ये फ्लोरिन असतो. पॉलिस्टर आणि पॉलिकाबरेनेटमध्ये ऑक्सिजन असतो. ज्या मोनोमरपासून पॉलिमर बनवतात त्यातील बरीच मोनोमर कर्करोगजन्य असतात.
पॉलिमर बनवताना त्यात वेगवेगळे गुणधर्म आणण्यासाठी इतर रसायने घालतात. उदा. लवचीकपणा, विविध रंग इत्यादी. ही इतर रसायने पॉलिमराबरोबर पूर्णपणे एकरूप होत नसल्याने त्याचे काही धोके जाणवतात. भारतातील एकूण प्लास्टिकपकी ५२ टक्के प्लास्टिक पॅकेजिंगसाठी वापरले जाते. याचाच अर्थ असा की ते एकदा वापरून फेकून दिले जाते आणि कचऱ्याच्या डब्याची धन करते. पण हे प्लास्टिक बऱ्याच वेळा पुन्हा वापरले जाते. असे झाले तरी प्लास्टिक ३ ते ४ वेळेपेक्षा जास्त वेळा वापरता येत नाही. मोठय़ा कंपन्या प्लास्टिकचा वापर पुन्हा पुन्हा करीत नाहीत आणि छोटय़ा कंपन्यांकडे फार चांगली सोय नसल्याने ही पुनर्चक्रित प्लास्टिक गुणवत्तेत कमी पडतात. अशी प्लास्टिक्स वापरून झाल्यावर रस्त्यांवर, रेल्वे रुळांच्या कडेकडेने, एस. टी. धावते त्या रस्त्यांवर पडून राहते. मग पावसाच्या पाण्याबरोबर या प्लास्टिकमधील रसायने जमिनीत झिरपून जमिनीखालच्या पाण्यात मिसळतात आणि ते पाणी प्रदूषित होते.
अनेक ठिकाणी प्लास्टिक जाळले जाते, त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. प्लास्टिक पाण्यात फेकल्याने ते गाई-म्हशींच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवावर उठते. पावसाळ्यात रस्त्यावर फेकलेले प्लास्टिक सांडपाण्याच्या नळात जाऊन बसते आणि रस्त्यावर पाणी तुंबून राहते. आपण प्लास्टिक वापरतो आणि त्यावर प्रक्रिया करताना हानिकारक वायू हवेत गेल्याने प्रदूषण होतेच, पण त्याचा कामगारांनाही उपद्रव होतो.
(आपण सध्या कुतूहलमधून दैनंदिन जीवनातील रसायनांची विविधांगी माहिती करून घेत आहोत. आपल्या शरीरातदेखील रासायनिक घडामोडी होत असतात. त्यातही हल्ली आपण डीएनए,जीन्स हे शब्द वरचेवर वाचत असतो. पण म्हणजे नेमकं काय ते आपण यापुढील काही भागांतून जाणून घेणार आहोत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा: युवास्यात
युवास्यात् साधु युवा, अध्यायक:
आशिष्ठो, दृढीष्ठो वसिष्ठ:
तस्येयाम् पृथ्वी वित्तस्य पूर्ण स्यात
स एको मनुष: आनंद:
उपनिषदामधील अनेक श्लोकांमध्ये मानवी जीवनामध्ये उद्दिष्ट काय? माणसानं का जगावं? ‘माणूस’ म्हणून आपण कोण, अशा गहन आणि गंभीर विषयावर चर्चा केली आहे.
परंतु, हे सर्व विचार प्रत्यक्ष जीवनाकडे पाठ फिरवीत नाहीत. त्यामुळे या श्लोकांवर चिंतन करताना पोट भरल्यावर आरामखुर्चीत बसून तत्त्वज्ञान चघळावे अशा वृत्तीने त्यांचा विचार करता येत नाही. उलट आपलं जीवन अधिकाधिक ‘अर्थ’पूर्ण कसं करावं? व्यक्ती आणि समष्टी या जीवनरूपी नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत, याची जाणीव होते. प्रस्तुत श्लोकामध्ये समाजाचे आर्थिक जीवन, आनंदमय समाज आणि नेतृत्व यांचा अत्यंत सुंदर मिलाफ आढळतो. किंबहुना नेता कसा असावा हे सांगताना, समाज कसा असावा आणि नेत्याकडे कोणती जबाबदारी असावी, यावर नेमक्या शब्दात भाष्य केलेलं आहे.
नेत्याची सहा प्रमुख लक्षणं इथे मांडलेली आहेत. नेत्यामध्ये तरुणाची ऊर्जा असावी. कारण अशा ऊर्जेशिवाय, ‘पॅशन’शिवाय समाजामध्ये अभिसरण होत नाही. नेतृत्वाच्या जबाबदारीमध्ये निरलस परिश्रम करावे लागतात, त्यासाठी अखंड ऊर्जेची आवश्यकता असते. अशक्त, आजारी अथवा खंतावलेल्या पुढाऱ्याकडे पुरेशी शक्ती नसते.
शक्तिमान असलेल्या व्यक्तीमध्ये अहंभाव निपजतो. आपल्या ताकदीचा गर्व निर्माण होतो. त्यामुळे असा शक्तिमान नेता सुस्वभावी असावा. त्याचं वागणं, बोलणं यातून सद्भावाचा पडताळा यावा.
सद्वर्तनी, शक्तिमान नेता सुशिक्षित असावा. शिक्षणाच्या आधारे जगामधल्या घडामोडींचा अभ्यास करता येतो. विद्याभ्यासामुळे इतरांच्या अनुभवाच्या परिशीलनातून शहाणपणा अथवा प्रज्ञा जागृत होते.
सद्वर्तनी, सशक्त, सुविद्य नेत्यामध्ये आणखी तीन गुणांची जोपासना होणे गरजेचं असतं.
अशा त्रिगुणसंपन्न नेत्याच्या मनात सदैव ‘आशा’ पल्लवित असली पाहिजे. आशादायी व्यक्ती प्रयत्नशील असते.
समाजपरिवर्तनाकरिता समाजाला आशावादी करणं, हे नेत्याचं कार्य असतं. आशावादी समाज उद्यमशील असतो. ही आशा नेत्याच्या बोलण्यातून, वावरण्यातून समाजाला प्रतीत झाली की समाज विकासकार्याला कटिबद्ध होतो. आशावादी व्यक्ती कधीकधी आरंभशूर ठरतात. एखाद-दुसऱ्या अपयशानं, कळतनकळत घडलेल्या चुकांमुळे आशावादाचा फुगा फुटतो. आशावाद जिवंत ठेवण्यासाठी दृढनिश्चय महत्त्वाचा ठरतो. दृढनिश्चयी स्वभावामुळे नेता हार मानत नाही आणि समाजविकासाकडे वाटचाल करीत राहातो.
असा गुणसंपन्न नेता, सुदृढ असावा. तो ठणठणीत असावा. त्यानं आपल्या शरीर वमनाची प्रकृती उत्तम ठेवावी. अशा नेत्याकडे समाजाने आपला अर्थव्यवहार सोपवावा. कारण समाजाच्या उन्नतीकरिता लागणाऱ्या ‘वित्ता’चे व्यवस्थापन भोळसट आदर्शवादावर चालत नसतं, त्याला चतुर, चाणाक्ष आणि चतुरस्र व्यवस्थापन लागतं. अशारीतीने जो समाज आणि नेता वावरतो, तो सर्वत्र आनंदी, प्रसन्न आणि सुखदायी जीवन फुलवतो.

प्रबोधन पर्व: समाजशास्त्र, इतिहास ही शास्त्रें निरुत्साह उत्पन्न करत नाहीत
‘‘इतिहास, समाजशास्त्र इत्यादि शास्त्रें वाचलीं असतां, मनुष्याचे सामथ्र्य मर्यादित आहे, राज्यें उदयास येतात व अस्तास जातात.  खाल्डिअन्, असिरिअन संस्कृतींप्रमाणें संस्कृतीच्या संस्कृति नामशेष होतात, इत्यादि गोष्टी कळून मनुष्य निरुत्साह होईल असें पूर्वपक्षाचें म्हणणें होतें, तें थोडेंसें खरें आहे.. मनुष्याची किंवा समाजाची सुधारणा झाली, तरी मनुष्याप्रमाणें समाजालाहि मरण येण्याचा संभव असतो, इत्यादि गोष्टी समाजशास्त्रावरून कळल्या, तरी शक्य तेवढी सुधारणा करण्याचा प्रयत्न करूं नये, असें ठरत नाहीं; समाजाची सुधारणा हळूहळू होते, अनेक लोकांनीं अनेक रीतींनीं अनेक वर्षें सतत प्रयत्न करावा लागतो, या तत्त्वाचा निष्कर्ष न्यायत: पाहिलें तर असाच निघतो कीं, प्रत्येकानें आपल्या परीनें आपल्या प्रयत्नांची शिकस्त करावी. एक वर्षांत स्वराज्य मिळविण्याची आशा समाजशास्त्र नष्ट करील, पण स्वराज्य मिळविण्याची खटपट करूं नये असें कोणतें समाजशास्त्र शिकवील? भलत्या आशा व आकांक्षा यांना इतिहासादि शास्त्रांकडून पायबंद पडेल, पण यांत वाईट कांहींच नाहीं. उलट आशा-आकांक्षा प्रथमपासूनच शक्य कोटींतल्या ठेवण्यास या शास्त्रांनीं शिकविल्यामुळें निराशेचें दु:ख व त्यामुळें येणारा निरुत्साह या आपत्ति टळतील.’’ समाजशास्त्र, इतिहास यांच्याकडे कसे पाहावे हे सांगून या शास्त्रांमुळे कोणते अपाय होत नाहीत, याविषयी वा. म. जोशी लिहितात – ‘‘देश, समाज, संस्कृति यांचा पुढें केव्हांतरी अध:पात होणार असला तरी आजचें आपलें कर्तव्य आपण करूं नये असें होत नाहीं. उलट आपण ती आपत्ति शक्य असल्यास टाळण्याचा आटोकाट यत्न केला पाहिजे, हेंच खरें अनुमान त्यावरून निघतें. बरें पूर्वी अनेक देशांचा, समाजांचा व संस्कृतींचा नाश झाला म्हणून पुढेंहि असाच होणार, हा सिद्धांतहि निश्चित नाहीं. उलट समाजाच्या वगैरे अध:पाताची कारणें अधिकाधिक कळूं लागल्यामुळें ही आपत्ति टाळणें पुढेंमागें शक्य होईल, अशी आशा बाळगण्यास जागा आहे. कसेंहि पाहिलें तरी, इतिहासादि शास्त्रें नैराश्य किंवा निरुत्साह उत्पन्न करतील, असें मानण्यास तर्कदृष्टय़ा मुळींच आधार नाहीं.’’  
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity hazards of plastic
First published on: 16-05-2014 at 03:05 IST