रासायनिक गुणधर्म या दोन शब्दांबरोबर आम्लधर्मी की आम्लारिधर्मी हे गुणधर्म डोळ्यासमोर येतात. कोणत्याही पदार्थातील आम्लधर्म किंवा आम्लारिधर्म ओळखण्यासाठी साधी चाचणी असते. या चाचणीला सामू तपासणे असे म्हणतात. या चाचणीमध्ये कागदाचे खूप बारीक तुकडे करून ते शुद्ध पाण्यात उकळतात. नंतर हे द्रावण गाळतात. गाळलेल्या द्रावणात वैश्विक दर्शक हे एक विशिष्ट रसायन टाकले जाते. अनेक दर्शकांच्या एकत्रित मिश्रणाला ‘वैश्विक दर्शक’ म्हणतात. वैश्विक दर्शक गाळलेल्या पाण्यात घातल्यावर त्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्यास कागद आम्लधर्मी असतो. कागद तयार करताना वापरलेल्या सल्फेट, क्लोराइडमुळे कागद आम्लधर्मी होतो. आम्लधर्मी कागद जास्त दिवस टिकत नाही. गाळलेल्या पाण्यात वैश्विक दर्शक घातल्यानंतर निळ्या किंवा जांभळ्या रंगाची छटा दिसली तर कागद आम्लारिधर्मी असतो. काबरेनेट किंवा हायड्रॉक्साइडमुळे कागद आम्लारिधर्मी होतो. आम्लारिधर्मी कागद लवकर ठिसूळ होतो. द्रावणाचा रंग फिका हिरवा असेल तर कागद उदासीन असतो. चांगल्या प्रतीचा कागद थोडासा आम्लधर्मी असतो.
रासायनिक गुणधर्मामध्ये कागदामधील राखेचे प्रमाण तपासले जाते. हे तपासताना कागद जाळून कागदाची राख करतात. मूळचा कागद आणि कागदाची राख यांच्या वजनाचे गुणोत्तर काढतात. हे गुणोत्तर कागद तयार करताना वापरले गेलेले न विरघळणारे पदार्थ, विविध रंग यांवर अवलंबून असते. हे पदार्थ कमी प्रमाणात असतील तर त्या कागदाच्या राखेचे वजन कमी असते. कागदामधील हे गुणोत्तर ०.०१ असेल तर तो कागद उच्च प्रतीचा कागद समजला जातो. या कागदाला राखविरहित कागद म्हणतात. हे प्रमाण ०.१ असेल तर तो कागद विशिष्ट प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रातील किंवा प्रयोगशाळेतील काही प्रयोगांसाठी (gravimetric analysis) गाळण कागद म्हणून वापरला जातो. वह्या-पुस्तकांसाठीच्या कागदात राखेचे प्रमाण ८-१०% असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा : गमतीचा खेळ
दुपारची निवांत वेळ, सूर्य ऐन डोक्यावर आणि वारा पडलेला. परिसर तसा नि:शब्द अधूनमधून एखादा पक्षी उगीचच हाक मारतो झालं. पलीकडच्या झाडाच्या सावलीत गुरं शांतपणे रवंथ करीत बसली आहेत. झाडंदेखील स्तब्ध आणि पानं निपचित. घरामध्ये थोरामोठय़ांची निजानीज आणि सवंगडय़ांना त्यांच्या त्यांच्या घरात कोंडलेलं, अशा वेळचा हमखास खेळ. गमतीचा.
समोर लहानशा तलावाचं काळसर शेवाळ धरलेलं पाणी निश्चल असतं. खाली वाकून दगडांचे तुकडे हेरतो. हातात उचलून चाचपून पाहतो. मग उजव्या बाजूला झुकून हातात त्या दगडाचा तुकडा धरतो. अंगठय़ानं जरा घट्ट आणि बोटाच्या टोकानं थोडा हलका धरतो. हात आडवा करून मागे घेतो आणि सर्रकन झपाटय़ानं तो दगड पाण्यात भिरकावतो. दगड वेगानं निसटून पाण्याच्या पृष्ठभागावर आदळून उडी मारतो, एकदा, दोनदा, तीनदा आणि मग पाण्यात बुडतो.
पाण्यातल्या त्या हालचालीने एक बेडूक चटकन किनाऱ्यावर येऊन इकडे तिकडे न पाहता ड्रांव असं म्हणतो आणि पुन्हा सुळकन पाण्यात उडी मारतो.
मग इकडे तिकडे फिरून चपटा जरासा हलका दगड हेरायचा आणि नेम धरून पाण्यावर फेकायचा. दोन, तीन, चार, पाच. हेऽऽ.
मग पुन्हा दगडाची शोधाशोध, पाण्यात तो फेकणे आणि त्याच्या उडय़ा मोजणे, हा खेळ पुन्हा चालू. किती वेळ कोण जाणे? किनाऱ्यावरचे चपटे दगड तरी संपतात नाही तर कुणीतरी ‘कशाला रे एवढय़ा उन्हात एकटाच खेळतोस..’ असं म्हणून बकोट पकडून घराकडे कोंडायला घेऊन जाईपर्यंत.
किती साधा खेळ, कोणाला इजा नाही की दुखापत. अडचण इतकीच की निसर्गात चपटे आटोपशीर दगड मुबलक नसतात. शोधावे लागतात. मातीच्या खापऱ्या वापरता येतात, पण त्याही मिळायला हव्यात ना!
असं वाटतं, अगदी निष्पाप खेळ आहे, थोडा सराव, अचूक कोन आणि वेग यांचं त्रराशिक जमलं की सहा-सात उडय़ा मारण्याचा रेकॉर्ड गाठता येतो.
खेळतं का कोणी असा खेळ आता?
गावोगावची तळी कोरडी पडताहेत, पण दु:ख वाटतंय ते बालपणातल्या आटलेल्या निष्पापतेचं, साध्यासुध्या खेळाचं.
हां, आता कोणी तरी कॉम्प्युटरवर कदाचित तसा सॉफ्ट खेळ लाँच करील, मल्टिमीडियावरून दगडाचा डुबुक.. असा आवाजही अटॅच करील, पण दुपारच्या टळटळीत उन्हात एकटय़ानं खेळलेल्या या भाकरीच्या किंवा बेडकाच्या खेळाची सर नाही येणार.
ल्ल   डॉ.राजेंद्र बर्वे –  drrajendrabarve@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity high quality paper
First published on: 20-02-2014 at 03:29 IST