जुन्नरजवळच्या बोरी बुद्रुक गावातील आधुनिक शेतकरी मधुकर जाधव हे राहुरी, अहमदनगरच्या डॉ. अरुण देशमुख यांच्या लेखाने प्रेरित झाले. भारतीय लाल सिंधी गायींविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकांचे संदर्भ त्यांनी विचारले. आपल्या शेतीत दुग्ध प्रकल्प राबवण्यासाठी दहा ते पंधरा लाल सिंधी गायींची जोपासना करण्याची इच्छा व्यक्त केली.
डॉ. क. कृ. क्षीरसागर यांच्या लेखांतून प्रमोद देर्देकरांसारख्या वाचकांनी कोद्रा, सावा, कोदी अशा अज्ञात धान्यांची कूळकथा समजल्याबद्दल आवर्जून कळवले. श्री. अ.पां. देशपांडे यांचा डॉ. आ. भ. जोशी या शेतीतज्ज्ञावरील लेख वाचून वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी त्यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीच्या स्मृती जागवल्या. इंदूरचे प्रयोगशील शेतीतज्ज्ञ डॉ. अरुण डिके यांच्या ‘रंगवासा जैविक ग्राम’ संस्थेला भेट देण्याची इच्छा डोंबिवलीच्या मीनाक्षी चौधरी यांच्यासारख्या अनेक वाचकांनी व्यक्त केली.
स्वप्निल पाटील या वाचकाने प्रतिसादादाखल वेगळीच वस्तुस्थिती पुढे आणली. ब्राझील, मेक्सिको, कोलंबिया यांसारखे देश भारतीय गायींची जोपासना करून, त्यांच्यात विकास करून मुबलक दुग्धोत्पादन करतात. आपण मात्र युरोपीय गायींशी संकर करून दुग्धोत्पादन वाढवतो. डॉ. भास्कर गायकवाड यांच्या पशुपालनावरील लेखांवर एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीच्या पत्रकाराने कार्यक्रम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली.
भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षांचा अभ्यास करणारा अमित पाटील, लांजा (रत्नागिरी) येथील प्रशांत कांबळे, लेखातील त्रुटीबाबत सजग वाचक केशव बापट, रेशीम शेती करू इच्छिणारा अमेय हासे, आफ्रिकेतून परतलेले रामू माने, पर्जन्य संधारण करू इच्छिणारे रवींद्र मराठे, बटेर पालनविषयी उत्सुकता दाखवणारे रशियातील श्रीयुत पाटील अशा अनेकांचे प्रतिसाद आले. काहींनी यापुढे जाऊन लेखकांकडून मार्गदर्शनही मिळवले. पशुवैद्यक डॉ. शरद आव्हाड या नियमित वाचकाने तर स्वत: काही उत्तम लेख लिहून या सदरास हातभार लावला.
जळगावच्या चोपडा येथील एक शिक्षक उमेश बाविस्कर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शेतीतील सामान्य ज्ञान देण्यासाठी हे सदर खूप उपयुक्त ठरत असल्याचे कळवले. काही ठिकाणी या लेखांची कात्रणे काढून त्यांचा संग्रह करत असल्याचे कळले. अनेकांनी लेखांची कात्रणे कुठे मिळू शकतील, अशी विचारणा केली.
अनेक जिल्ह्यांतून असे आणखी अनेक प्रतिसाद ‘कुतूहल’ला मिळाले.
-प्रतिनिधी,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस – सांसर्गिक रोग : आयुर्वेदीय उपचार भाग- ५
एचआयव्ही- एड्स- शोष- १९८१ साली फुफ्फुसाच्या न्यूमोनियाने मृत झालेल्या व्यक्तीच्या तपासणीत असे आढळले की हा जंतू सामान्यत: निरुपद्रवी मानल्या जाणाऱ्या न्यूमोसिस्टिस कॅरिनी या गटाचा होता. अशा व्यक्तीच्या रक्तातील ‘टी- ४ लिंफोसाईट्स’ या पेशीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. १९८२ साली जागतिक आरोग्य संघटनेनी या व्हायरसला ‘एचआयव्ही’ असे नाव दिले. हा रोग झालेल्या व्यक्तीच्या रक्तात, वीर्यात, लाळेत, योनीस्रावात हे जंतू असतात. हे जंतू शरीराबाहेर फार काळ जिवंत राहात नसल्यामुळे हवेतून, पाण्यातून वा अन्नातून याचे संक्रमण होत नाही. दुसऱ्या शब्दात, संक्रमणासाठी निकटचा शारीरिक संबंध वा रक्त संक्रमण हीच कारणे होत.
गेली २५ वर्षे मी पुणे महापालिकेकरता डॉ. कोटणीस गाडीखाना हॉस्पीटलमध्ये दर शुक्रवारी, एचआयव्हीबाधित रुग्णांना नि:शुल्क आयुर्वेदीय उपचार सल्लासमलत देत असतो. संबंधित रुग्णांना विविध लक्षणांनुरूप औषधे देत असतो. या लक्षणांचे रुपांतर न्यूमोनिया, फुफ्फुस विकृती, अन्नवह स्रोतस दृष्टी किंवा एड्स या विकारात होऊ नये याकरिता पुढील उपचार नेटाने करत असतो. १) मूत्रेंद्रियाच्या स्वास्थ्याकरिता चंदनादि व चंदनगंधादि गोळ्या. २) चंदनाचे गंध घेणे. ३) धनेपूड, नारळपाणी घेणे. ४) सर्दी, कफ यांचा उपद्रव वाढून न्यूमोनिया होऊ नये म्हणून पुदीना, आले, लसूण, ओली हळद, तुळशीची पाने यांचा सुयोग्य वापर. ५) अकाली वजन घटू नये म्हणून चंद्रप्रभा, लाक्षादिगुग्गुळ, आस्कंद. ६) उष्णता कमी व्हावी म्हणून उपळसरीचूर्ण, ७) मूत्रपिंडाच्या स्वास्थ्याकरिता गोक्षुरादिगुग्गुळ, रसायन. ८) वारंवार जुलाब होऊन ‘शोष’ विकारात रूपांतर होऊ नये याकरिता कुटजवटी, शमनवटी, संजीवनीवटी अशी  उपाययोजना करतो. काहींना च्यवनप्राश, गाईचे दूध घ्यावयास सांगतो. हिम्मत हारलेल्या कृश व्यक्तींना कोहळ्याच्या वडय़ा, कुष्मांडपाक, मूगलाडू, ताडगोळे, सफरचंद, खजूर घ्यावयास सांगतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत –   ३० डिसेंबर
१८८२ > अध्यात्मपर पुस्तकांचे लेखक बळीराम जनार्दन आचार्य यांचा जन्म. वेदांतविषयक अध्यात्म विचाराचे विवेचन करणारा मनोविलास हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध.
१८८६> चरित्रलेखक रामकृष्ण गोपाळ भिडे यांचा जन्म. त्यांनी पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी आदींची चरित्रे लिहिली.
१९०१> पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म. वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनर्दशन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुद्ध पूर्वार्ध  हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.
१९७४> गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी, लेखक शंकरराव दत्ताराम देव यांचे निधन. ‘दैव देते पण कर्म नेते’ हे त्यांचे आत्मचरित्र गाजले.
१९८१> शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांचे निधन.  ‘ताराबाईकालीन कागदपत्रे’ याचे चार खंड त्यांनी प्रसिद्ध केले.
१९४१>लेखक, चरित्रकार, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव  पवार यांचा जन्म.     त्यांच्या नावावर जीवनाभिमुख विज्ञान, मानवजातीचा इतिहास, मराठा साम्राज्याचा उदय-अस्त, क्रांतिसिंह नाना पाटील,  मानवी संस्कृती आणि इतिहास आदी ३० ग्रंथ आहेत.
– संजय वझरेकर

जे देखे रवी..  -कळावे, लोभ असावा..
म्हणता म्हणता वर्ष संपले. हा स्तंभ सुरू झाला तेव्हा पहिल्या तीनी- e-mails जर्मनी, अमेरिका आणि जपानहून आल्या होत्या. संगणकाचा ट की ठ माहीत नसलेल्या मला ते मोठे अप्रूप होते.
अगदी सुरुवातीला मी वाहवतो आहे असे वाटल्याने, एरवी घणाघाती संपादकीय लिहिणाऱ्या गिरीश कुबेर यांनी तितक्याच प्रेमळपणाने मार्गदर्शन केले. मी Good Boy असल्यामुळे ते मी ऐकले.  दररोजची स्तंभाची देखभाल अभिजीत ताम्हणे याने केली अशा तऱ्हेने हे दोन तरुण मित्र मिळाले.  संगणकमित्र ५०० ते १००० असणार, बहुतेक भले होते. त्यांनी भलामणच केली. एकीने दररोज स्तंभाचे परीक्षण पाठवले. अनेकांनी संवाद साधले. काही घरी येऊन भेटून गेले आणि भाषणांची निमंत्रणेही आली.
टीका तर झालीच. हिंदू देवदेवतांचा अपमान करू नका, तुमच्या असल्या लेखांनी बदफैली माजेल, तुम्ही ढोंगी आहात, तुम्ही डॉक्टर असून डॉक्टरमंडळींबद्दल इतके वाईट कसे लिहिता. ज्ञानेश्वरींच्या ओव्यांची चिरफाड करू नका. भाषा Grotesque  म्हणजे विरूप, विचित्र किंवा विंद्री आहे, असे अधूनमधून शालजोडीतलेही मिळाले.
आजचे वर्तमानपत्र शेवटी उद्याची रद्दी होते. याचे खरे इंगित ‘वायूचे स्फुरण ठेले काय जाहले काय निमाले’ किंवा ‘निंदा आणि स्तुती शेवटी त्याच शब्दांची उत्पत्ती’ या ओव्यांमध्ये आहे (एक मात्र नक्की : छापील माध्यमांचा प्रभाव आणि आवाका आजमितीला प्रचंड आहे हे ध्यानात आले)  
मी कोणालाही कधीही तिखट प्रतिक्रिया दिली नाही. तुमचे म्हणणे मी समजू शकतो असे लिहिले. जवळजवळ सगळ्या संगणकपत्रांची उत्तरे लगेचच दिली. अनेकांनी त्यांनी लिहिलेल्या गोष्टी पाठवल्या. त्या सगळ्या वाचल्या. शेवटी, प्रत्येकात एक लेखक लपलेला असतो हे वाक्य आठवले. मर्यादित शब्दांत आशय सांगण्याची कला बाणायला हवी हे लक्षात आले.
सर्वात महत्त्वाचे जो पत्रव्यवहार झाला त्यावरून जातीधर्म वा सर्व स्तरांमधल्या, सर्व वयाच्या मराठी माणसाच्या मनातली धग अगदी सारखी आहे हे कळून फार फार बरे वाटले.
 या लिखाणामुळे खूप वाचले, खूप मित्र मिळाले आणि मी समृद्ध झाल्याचा अनुभव आला. प्रोत्साहनामुळे धरणाचे दार उघडावे तसे शब्द वाहिले. टंकलेखन अनिल कापकरने केले. संगणकीय पत्रव्यवहार संदीप ओकने विनातक्रार आणि प्रेमळपणाने केला.
 थोडीफार तक्रार करत पण प्रेमळपणे आणि समजूतदारपणे जिने माझ्यासारख्या नादी माणसाबरोबर पन्नास वर्षे संसार केला ती माझी बायको उद्या स्फोटक लिहिणार आहे.  कळावे लोभ असावा ही विनंती.
तुमचा,
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com