तळण प्रक्रिया संपेपर्यंत तेलात अनेक बदल होत असतात. तेल तापत ठेवल्यावर उकळ येण्याआधीच तेलातून धूर यायला सुरुवात होते, त्या तापमानास तेलाचा ‘धूम्रांक’ असे म्हणतात. धूम्रांकाला तेलातील मेदाचे विघटन होण्यास सुरुवात होते. शिवाय गरम तेलात टाकलेल्या पदार्थातील पाण्यामुळे तेलाचे वेगवेगळ्या घटकात विघटन होते. त्यातील काही घटक एकत्र येऊन नवीन पदार्थ म्हणजेच पॉलिमर तयार होतो. कित्येक वेळा कढईतील तेलावर प्लॅस्टिकसारख्या पदार्थाचे गोल वर्तुळ तयार झालेले दिसते ते या पॉलिमरमुळेच. तेलातील मेद ग्लिसरॉल व मुक्त मेदाम्लात रूपांतरित होऊ लागतात. ग्लिसरॉलपासून अँक्रोलीन तयार होते. वेगवेगळ्या तेलाचा धूम्रांक वेगवेगळा असतो. शिवाय एकाच तेलाचा धूम्रांक कायम राहत नाही. तेल अनेक वेळा तापविल्यास त्यातील मेदाम्लाचे प्रमाण वाढते, त्यामुळे तेलाचा धूम्रांक कमी होतो. आपणाकडे वापरात असलेल्या तेलापकी शेंगदाण्याच्या तेलातून २१६ ते २२१ अंश सेल्सिअसला, तर सनफ्लावर व सोयाबीनच्या तेलातून २२७ ते २३२ अंश सेल्सिअसला धूर बाहेर येऊ लागतो. खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल यांचा धूम्रांक कमी असतो. तिळाच्या तेलाचा धूम्रांक २३२ अंश सेल्सिअस आहे. साधारण ३१६ अंश सेल्सिअसला तेलातून वाफा येतात, ज्या पेट घेऊ शकतात. ३७१ अंश सेल्सिअसला तेल पेटू शकते.
तेल तापवले की त्यातील मेदाम्लाचे रेणू मुक्त झाल्याने कमी तापमानालाही तेलातून धूर यायला लागतो. अगदी ताज्या तेलामध्ये जर तळायला सुरुवात केली, तर ते जास्त चिकट नसल्याने त्याचा पृष्ठीय ताण जास्त असल्याने त्यातून येणारे बुडबुडे छोटे असतात. जसजसे तेल तापल्यामुळे तेलाचे विघटन होत जाते तसतसा त्याचा पृष्ठीय ताण कमी झाल्याने बुडबुडे मोठे होत जातात. उच्च धूम्रांक असलेले तेल तळण्यासाठी वापरणे चांगले असते. कमी तापमानास जास्त वेळ तळलेल्या पदार्थाना रंग व स्वाद कमी असतो व तेलाचे शोषण जास्त होते. पदार्थाला वरून रवा, पावाचा चुरा, इ. लावून तळल्यास पदार्थातील पाण्याचा अंश त्यात शोषला जातो व पाण्याचा अंश तेलात न उतरल्यामुळे तेलाचे तापमान कमी होत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमोराचा पिसारा: देकार्तची चिंतने
माझी आणि देकार्तची भेट झाली ती फ्रिटजॉफ काप्रा यांच्यामार्फत. त्याआधी मानसशास्त्राची ओळख करून घेत असताना देकार्त भेटला होता. त्याचे विचार क्रांतिकारी वाटले होते. ‘आय थिंक देअरफर आय अ‍ॅम’ हे त्याचे सुवचन जागोजागी आढळले. आधुनिक (मुख्यत: युरोपियन) तत्त्वज्ञान शाखेचा जनक म्हणून देकार्तची ओळख करून देतात. त्यानं माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानेंद्रियामार्फत मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या संवेदनांपेक्षा मेंदूनं तर्काने जाणलेल्या विचार आणि ज्ञान यांना अधिक महत्त्व दिलं.
माणसाच्या अस्तित्वाचं मर्म त्याच्या विचारप्रवण शक्तीमध्येच पूर्णत: सामावलेलं असतं, हा देकार्तचा सिद्धांत मनोमन पटला. एक प्रकारे ज्ञानेंद्रियामार्फत होणारी जाणीववजा माहिती चंचल असते आणि कालानुरूप परिस्थितीनुरूप बदलते म्हणून तिच्यावर विसंबून राहता येत नाही. उलट ‘सुनिश्चित’ कल्पना स्थिर आणि अपरिवर्तनीय असतात म्हणून त्याच खऱ्या. म्हणून आधुनिक विज्ञानाच्या विचारपरंपरेचा पाया त्यानं घातला. उदा. मेण वितळलं की त्या पदार्थाचा आकार व घनता बदलते. घट्ट पदार्थ प्रवाही होतो. वाहत असलं तरी ते ‘मेण’च आहे हे मानवी तर्कबुद्धीतून उद्भवलेल्या विचाराला कळून चुकतं. पाण्यात बुडवलेली काडी डोळ्यांना मोडलेली दिसते पण प्रत्यक्षात ती सरळ असते, याचे विचारामुळे आकलन होते. ते सिद्ध करता येते. ही उदाहरणे प्राथमिक वाटली तरी देकार्तच्या काळी म्हणजे १७व्या शतकात त्यांनी बऱ्याच गोष्टींना हादरवून सोडलं.
मुळात मानवी जीवनाचा अभ्यास स्वतंत्रपणे धर्मशास्त्राचा आधार न घेता करता येतो, केला पाहिजे, याचा आग्रह त्यानं धरला. मात्र पुस्तकाद्वारे ते विचार मांडण्याचा धीर त्याला झाला नाही. गॅलिलिओच्या गोष्टी त्याच्या कानावर आलेल्या होत्या.
इतकं सगळं असूनही देकार्तविषयी माझ्या मनात सूक्ष्म अढी होती. याची दोन कारणं. पहिलं म्हणजे मन आणि शरीर यांचा द्वैतवाद. मन ही संपूर्ण काल्पनिक गोष्ट असते तर शरीर पार्थिव असल्याने खरं आणि विश्वसनीय असं त्याचं मत. दुसरं म्हणजे देकार्तनं कोणत्याही वस्तूचा (शरीर धरून) अभ्यास करायचा असल्यास त्याचे लहान लहान तुकडे करावे, तिला सूक्ष्म करावं असं म्हटलं.
देकार्तनं मांडलेल्या या सिद्धांतांना कार्टेझियन मॉडेल अथवा रिडक्शनिझम असं म्हणतात. या कार्टेझियन मॉडेलचा आधार घेऊनच आधुनिक विज्ञानाने सूक्ष्मातील सूक्ष्म कणांचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. त्यात प्रचंड प्रगती केली. शरीर आणि मन यांचं द्वैत संकल्पून त्यांची फारकत केली आणि शरीराचा सूक्ष्म अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. इथे माझं आणि देकार्तचं द्वैत निर्माण झालं. या कार्टेझियन मॉडेलला पुढे रुदरफोर्ड, हायसेनबर्ग आणि नंतर आईन्स्टाईनपासून फेनमनपर्यंत हादरे बसले. परंतु देकार्तच्या सिद्धांताच्या मर्यादांचा सांगोपांग अभ्यास आणि खंडन काप्रा यांनी केला. त्यांनी अद्वैतवाद हा सिद्धांत मांडला.
मला देकार्त भेटला तो या वळणावर आणि वाटलं मानवी शरीराकडे यांत्रिकपणे बघण्याचा वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनाची नाळ देकार्तच्या विचारांशी जोडलेली आहे. मनाच्या अस्तित्वाबद्दल खात्री, परंतु त्याची शरीरापासून फारकत झालेली असते. या विचारांचा विज्ञान आणि वैज्ञानिकांवर अजून पगडा आहे. आता सेंद्रिय-संपूर्णात्मक मॉडेलचा स्वीकार मनोविज्ञानशास्त्रानं केला आहे. जडवाद्यांना अजूनही हे पचवणं जड जातं. तरी देकार्तबद्दल विलक्षण कुतूहल वाटतं. दिसायला बेताचा, मोठं नाक, सैन्यातली नोकरी सोडून एकटेपणानं जगणारा, विक्षिप्त देकार्तविषयी आदर वाटतो. गंमत म्हणजे देकार्तनं आपल्या सिद्धान्तांना ‘मेडिटेशन’ असं नाव दिलं आणि त्याला या सर्व सिद्धांतांची स्फूर्ती स्वप्नामधून मिळाली. देकार्तच्या इतक्या जटिल आणि गुंतागुंतीच्या विचारांचा परिचय त्याच्यावरील लहानशा ग्राफिक (छायाचित्रात दाखवलेल्या) नॉव्हेलवरून करता येतो.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity smoke point of oil
First published on: 19-07-2014 at 02:42 IST