पाण्याला रंग असतो का? आपल्याला माहीत आहे की पाणी रंगविरहित असते. एका प्रसिद्ध सिनेगीतामध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘पानी रे पानी तेरा रंग कैसा?  जिसमे मिलावे लगे उस जैसा!’- पण हे संपूर्ण सत्य नाही. समुद्राच्या पाण्याला निळा रंग दिसतो, तो का? समुद्रात काही निळा रंग मिसळलेला नसतो. समुद्राचे पाणी हाताच्या ओंजळीत घेऊन त्याकडे बघा अथवा एखाद्या हौदात ते भरून त्याकडे पाहा, ते निळे दिसणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मग निळय़ा रंगाचे आकाश वरती आहे, त्याचे प्रतिबिंब म्हणून समुद्र निळा दिसतो का? तसेही नाही! कारण तसे असते तर सर्व नद्या, तलाव, विहिरी यातदेखील निळय़ा आकाशाचे प्रतिबिंब दिसून तिथे पाणी निळे दिसले असते. समुद्राचे पाणी निळे दिसते याचे कारण समुद्राची प्रचंड खोली आणि प्रकाश किरणांच्या विकिरणांची (स्कॅटरिंग) प्रक्रिया.

सूर्यप्रकाशात सप्तरंग आहेत हे तर आपणास माहीत आहे. सूर्यप्रकाशाचे किरण पाण्यातून जात असताना जेव्हा पाण्याच्या रेणूवर आदळतात, तेव्हा त्यातील अधिक तरंगलांबी असलेले रंग (तांबडा ते हिरवा) रेणूत अंशत: शोषले जातात व कमी तरंगलांबी असलेले रंग (निळा, पारवा व जांभळा) विकिरणाच्या स्वरूपात अंशत: परावर्तित होतात. समुद्राच्या पाण्याची खोली प्रचंड असल्यामुळे प्रकाशकिरण खोलवर प्रवास करतात व पाण्याच्या रेणूंवर अनेक वेळा आदळतात. परिणामत: त्यातील निळा व जांभळा रंग संपूर्णपणे परावर्तित होऊन बाहेर पडतो, बाकीचा प्रकाश पूर्णत: शोषला जातो. आपले डोळे निळय़ा रंगाला अधिक संवेदनशील असल्यामुळे आपल्याला त्यातील निळा रंग दिसतो. नदी अथवा तलावाची खोली तुलनेने अगदी कमी असते म्हणून तिथे हा परिणाम दिसत नाही.

समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला निळा रंग दिसत नाही. याचे कारणसुद्धा तेथील पाण्याचा उथळपणा हेच आहे. ढग म्हणजे पाणीच! पाण्याची वाफ एकत्र येऊन ढग बनतात. सूर्यकिरण ढगातून जाताना त्यांचे या पाण्याच्या रेणूंवरून विकिरण होते व त्यातून खाली येणारा प्रकाश अधिकाधिक क्षीण होत जातो. ढगांची उंची वाढते, तशी त्यातून पलीकडे येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होत जाते. ढगांची उंची जेव्हा खूप जास्त असते, तेव्हा त्यातून पृथ्वीकडे प्रकाश येत नाही. असे ढग आपल्याला काळे दिसतात व त्यातून पाऊस पडतो. मात्र काळय़ा ढगांच्या कडेवरून विकिरण होऊन बाहेर पडणारे किरण सर्व बाजूंना विखुरतात. त्यातला काही प्रकाश खालच्या दिशेनेदेखील येतो. म्हणून काळय़ा ढगांना रुपेरी कडा असते. 

– सुधीर पानसे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity water color sea water blue color palm of the hand tank reflection sky ysh
First published on: 17-03-2022 at 00:02 IST