मराठीत रुळलेले किंवा रुळू पाहणारे इंग्रजी शब्द जेव्हा बोलण्यात किंवा लेखनात येतात, तेव्हा ते कसे लिहायचे, त्यांचे लिंग, वचन आणि सामान्यरूप कसे होते असे प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरे कोशांमध्ये मिळतात का ते पाहण्यासाठी काही प्रातिनिधिक कोशांवर एक धावती नजर टाकू या. या सर्व कोशकर्त्यांनी जास्तीत जास्त मराठी शब्द वापरण्याचा पुरस्कारच केला आहे, पण व्यावहारिक गरज आणि भाषासमृद्धी या हेतूने त्यांनी इंग्रजी शब्दांचा समावेश केला आहे, हे त्यांच्या प्रस्तावनेतून स्पष्ट होते.
वर्ष १९७० मध्ये लिहिलेल्या प्रस्तावनेत ‘आदर्श मराठी शब्दकोश’कर्ते प्र. न. जोशी इंग्रजी शब्दांबद्दल म्हणतात, ‘नव्या अनुभवविश्वातून जन्मास येणाऱ्या शब्दांना जगातील सर्वच प्रगत भाषा स्वीकारतात, मराठीने खळखळ करून चालणार नाही.’ या कोशात ऑफिस, चेक, गॅलरी, प्रोजेक्टर, प्लॉट, बॉडीगार्ड असे अनेक इंग्रजी शब्द लिंग, अर्थ, समानार्थी शब्द आणि कोणत्या भाषेतून आले याच्या नोंदींसह दिले आहेत. मो. रा. वाळंबे यांच्या ‘मराठी शुद्धलेखन प्रदीप’मधल्या शब्दसूचीत काही इंग्रजी शब्द आढळतात. ‘विस्तारित शब्दरत्नाकर’ या वा. गो. आपटे आणि ह. अ. भावे यांच्या कोशात डॉक्टर, गॅरंटी, प्रॉमिसरी नोट, मॅनेजर असे अनेक शब्द असून त्यात त्यांचे लिंग, अर्थ, समानार्थी शब्द आणि कोणत्या भाषेतून आले हे सांगितले आहे.
मराठीच्या व्यवहारक्षेत्रांमध्ये आढळणारे इंग्रजीसह सर्व भाषांमधील शब्द असणाऱ्या मो. वि. भाटवडेकर यांच्या ‘राजहंस व्यावहारिक मराठी शब्दकोश’मध्ये तुलनेने खूपच जास्त इंग्रजी शब्द दिले आहेत. यात शब्दांचे लिंग, अर्थ आणि क्षेत्रही सांगितले आहे. अरुण फडके यांच्या ‘मराठी लेखन कोश’मध्येही इंग्रजी शब्द आढळतात. यात इंग्रजी शब्दांचे लिंग, वचन, सामान्यरूप आणि विभक्तिरूप अशी अधिक तपशीलवार व्याकरणिक माहिती दिली आहे. या व्यतिरिक्तही अनेक कोशांमध्ये इंग्रजी शब्द आहेतच, पण तरीही मराठीत वापरल्या जाणाऱ्या अधिकाधिक इंग्रजी शब्दांच्या व्याकरणिक नोंदीसह विस्तृत माहिती समाविष्ट करण्यासाठी कोश अद्ययावत करण्याची किंवा ऑनलाइन अर्थात आभासी माध्यमातून एखाद्या ई-कोशाच्या निर्मितीची गरज वाटते.
वैशाली पेंडसे- कार्लेकर
vaishali.karlekar1@gmail.com