तुम्ही सुपरमार्केटमध्ये खरेदीवेळी वस्तू स्कॅन केल्या जात असल्याचे नक्कीच पाहिले असेल. स्कॅन करताच त्या लेबलवर असणाऱ्या उभ्या जाड आणि बारीक काळ्या रेषांमध्ये दडलेली माहिती जशी वस्तूचे नाव, किंमत, ब्रँड, अगदी शिल्लक नगदेखील क्षणार्धात कॅशियरच्या संगणकावर झळकते. या रेषांना आपण बारकोड म्हणतो. सुपरमार्केटमधील हा बारकोड प्रत्येक वस्तूची ओळख निर्माण करतो.

जैवविविधतेने नटलेल्या निसर्गात प्रत्येक सजीवाच्या अनेक प्रजाती आहेत. वेगवेगळ्या प्रजातींची ओळख आपण कशी पटवायची? रंग, आकार, गंध यावरून? की त्यांच्या विशिष्ट जीन्स म्हणजेच जनुकांवरून? अनेक वेळा दोन फुलपाखरं, जिवाणू, बुरशी दिसायला अगदी सारखी वाटतात, पण त्यांची प्रजाती वेगवेगळी असते. अशा वेळी डीएनए बारकोडिंग वापरून त्या दोघांमध्ये सूक्ष्म जनुकीय फरक शोधता येतो आणि त्यांची अचूक ओळख पटवता येते.

कॅनेडियन संशोधक पॉल हेबर्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २००३ मध्ये, प्रमाणित डीएनए अनुक्रम वापरून सजीवांची ओळख एका विशिष्ट जनुकाद्वारे पटवण्याची एक क्रांतिकारक संकल्पना जगासमोर ठेवली. जसे प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात, तसेच प्रत्येक सजीवाचा डीएनएही वेगळा असतो.

डीएनए हा चार न्युक्लिओटाईड- ‘ए’, ‘टी’, ‘जी’ व ‘सी’च्या विशिष्ट अनुक्रमातून बनलेला असतो. या डीएनए तुकड्यातील न्युक्लिओटाईडचा अनुक्रम बोटांच्या ठशांसारखा काम करू शकतो. डीएनए बारकोडिंगमध्ये, प्रत्येक सजीव गटासाठी ठरावीक जनुक निवडले गेले आहे. प्राण्यांची ओळख पटवण्यासाठी ‘ CO1’ (सायटोक्रोम सी ऑक्सिडेज १) हे मायटोकॉन्ड्रियल जनुक वापरले जाते, तर वनस्पतींसाठी ‘ matK’आणि ‘ rbcL’ही दोन हरितलवकांतील जनुके निवडली जातात. बुरशीसाठी रायबोसोमल डीएनएमधील ‘ ITS’ भाग उपयुक्त ठरतो. प्रजातीचा नमुना घेऊन त्यातील डीएनए वेगळा केला जातो व त्या डीएनएतील न्युक्लिओटाईड्सचा अचूक अनुक्रम निश्चित केला जातो. या अनुक्रमाचे रूपांतर करून एक बारकोड तयार केला जातो, अगदी सुपरमार्केटमधील वस्तूंप्रमाणे!

हा बारकोड BOLD (बारकोड ऑफ लाइफ डेटा सिस्टीम) या जागतिक डेटाबेसमध्ये संग्रहित केला जातो. भविष्यात अनोळखी सजीवांची ओळख पटवण्यासाठी याच डेटाबेसचा आधार घेतला जातो. डीएनए बारकोडिंगचा उपयोग प्रजाती ओळखण्यासाठी, जैवविविधतेचे दस्तावेजीकरण करण्यासाठी आणि अज्ञात जीवांचे वर्गीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. खाद्यापदार्थांमध्ये असलेले खरे किंवा भेसळयुक्त मांस ओळखणे, आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलेले वनस्पती घटक पडताळण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती ओळखण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठीही डीएनए बारकोडिंग उपयुक्त ठरते.

– डॉ. विनायक पांडुरंग सुतार, मराठी विज्ञान परिषद.

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org