भारतात १९७०च्या दशकात झालेल्या हरितक्रांतीत डॉ. आ. भ. जोशी यांचा महत्त्वाचा वाटा होता. जागतिक अन्न संघटनेच्या विनंतीवरून इंडोनेशिया, पेरू, नेदरलँड्स, बांग्लादेश, टांझानिया इत्यादी देशांचे धान्योत्पादन वाढविण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. १९१६ साली जबलपूरला जन्मलेले आ.भ.जोशी यांचे शिक्षण रायपूर, नागपूर, दिल्ली व केम्ब्रिजमध्ये झाले. पेशीशास्त्र हा त्यांचा मूळ विषय. १९३७ पासून १९७७ पर्यंत त्यांनी इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च (१९६६-७७ उपमहासंचालक) व इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये (१९६५-६६ व १९७२-७७ संचालक) काम केले. १९७७-८० या काळात ते राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते.
भारतभरात कोणती पिके घ्यायची, एखाद्या पिकाची कोणती जात कोठे घ्यायची हे ठरविणाऱ्या राष्ट्रीय समन्वयक समितीचे ते अध्यक्ष होते. पीक उत्पादन वाढावे, त्यांची किंमतही कमी राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पिकांना होणारी रोगराई कमी करण्यासाठी औषध फवारणी करण्याऐवजी त्यांनी पिकातच तशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल, अशी योजना केली. त्यामुळे पिकावर पडणारी कीड २० ते ३० टक्क्यांवरून दोन ते तीन टक्क्यांवर आली. त्यांनी भारतभर शेतकऱ्यांमध्ये याचा प्रचार-प्रसार केला. हे पाहून इतर शास्त्रज्ञांनीही याबाबत संशोधन सुरू केले. डॉ. जोशींच्या सल्ल्यामुळे गहू, मका, वरी, तांदूळ, कापूस, एरंडी, शेंगा, सोयाबिन, ताग, डाळी, तीळ, जनावरांसाठी चारा इत्यादी पिकांच्या उत्पादकतेत वाढ झाली.
जगात पिकांच्या मूळ जातींपासून नवनवीन जाती निर्माण होत आहेत. नवीन जातीत काही दोष निर्माण झाले, तर पुन्हा मूळ जातीचे संशोधन करून त्यांच्यातून हे दोष काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी पिकांची सगळी मूळ वाणे जतन केली पाहिजेत, हा डॉ.जोशींचा सल्ला जागतिक अन्न संघटेनेने मान्य केला व तशी यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली. हे काम डॉ.जोशींनी पूर्ण केले. जिनिव्हातील जागतिक अन्न संघटनेची सल्लागार समिती जिनिव्हातूनच शेतीसंदर्भात सल्ले देण्याचे काम करीत असे. पण शेतकऱ्याला त्याच्या शेतावर जाऊन सल्ला दिला पाहिजे, असे डॉ.जोशींनी त्यांना सुचविले.  २०१० मध्ये वयाच्या ९४व्या वर्षी डॉ.जोशी यांचे पुणे येथे निधन झाले.
– अ. पां. देशपांडे    
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. :    दंभ
मी चौथ्या मजल्यावर राहतो. इमारतीला उद्वाहक किंवा लिफ्ट आहे. मी किती फिट आहे हे दाखविण्यासाठी आणि आजमावण्यासाठी बहुतेक वेळा जिने चढतो. कधी कधी ‘तू आज दमला आहेस’ असे स्वत:ला सांगत लिफ्ट वापरतो. अनेक वेळा एखादी व्यक्तीही माझ्याच बरोबर वर जात असते. बहुतेक वेळा ही दुसरी व्यक्ती लिफ्टचे दार लोटले जाण्याच्या आधीच आतला पंखा सुरू करते. मग लिफ्ट चढू लागली की, आरशात बघते आणि केस पुढे मागे करते. मी दोन्ही गोष्टी करीत नाही. एक तर मला एवढे उकडत नाही. लिफ्टचा प्रवास दहा सेकंद चालतो तो पंख्याचा परिणाम होण्याआधीच संपतो. शिवाय पंखा बंद करायची आठवण ठेवावी लागते. जगाचा भार माझ्या डोक्यावर असल्यामुळे असली बटणे बंद करणे वगैरे मला भारी जाते. मी आरशातही बघत नाही. सकाळी दाढी करताना बघितलेला चेहरा फारसा किंवा बिलकूलच बदलत नाही याची मला केव्हाच खात्री पटली आहे. एकदा एक व्यक्ती एवढी आरशात बघत बसली की, स्वत:चा मजला आला तरी भान हरपली मग मी खाकरलो तेव्हा दचकली आणि माझ्याकडे बघू लागली. मी लिफ्टचे दार उघडेन, अशी अपेक्षा असणार. मी तसाच मख्खासारखा मुद्दामच तिच्याकडे बघत बसलो. मग तिच्या लक्षात आले, आपल्यालाच दार उघडावे लागणार. मग घुश्श्यात तिने म्हणजे त्या व्यक्तीने दार खाडकन उघडले. ते बंद मलाच करावे लागले. ते बंद करण्याआधी मी त्या व्यक्तीला म्हटले तुम्ही छान दिसता. तेव्हा ती आणखीनच भडकली. ही व्यक्ती आमच्या सहनिवासाची सभासद नसल्यामुळे मला विचारू लागली की, तुमच्या सोसायटीचा सेक्रेटरी कोण? मी जेव्हा मीच सेक्रेटरी असे सांगितले तेव्हा तिला तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न पडला. मग तिने जिथे जायचे होते त्या सदनिकेची घंटा वाजवली, तोवर उद्वाहक माझ्या मजल्यापर्यंत पोहोचला होता.
हा प्रसंग सांगण्याचे कारण दहा सेकंदासाठी पंखा लावणे, सारखे आरशात बघणे आणि आपण बाहेर पडल्यावर लिफ्टचा बाहेरचा दरवाजा न बंद करणे हे हल्लीच्या भारतातल्या आधुनिकतेची मसालेदार लक्षणे आहेत. दहा सेकंदासाठी पंखा लावणे शक्य तितका भोग घेण्याचे, आरशात बघणे दंभाचे आणि दार बंद न करणे आत्मकेंद्रितपणाचे लक्षण आहे, असे मला वाटते. दंभ या शब्दाचा अर्थ सोंग किंवा ढोंग असा दिला आहे. मी प्लास्टिक सर्जन असल्यामुळे अनेक सोंगे माझ्याकडे येणे स्वाभाविक आहे, पण त्यांनी किती परिसीमा गाठली आहे त्याबद्दल नंतर लिहीनच, पण आधी सुखलोलुपता, दंभ आणि आत्मकेंद्रितपणाविषयी लिहितो.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

world longest hair woman do-you know-smita srivastava of up guinness book of world records know about her
सर्वात लांब केस असण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या स्मिता श्रीवास्तव आहेत तरी कोण? गिनीज बुकमध्ये कसे मिळवले स्थान
India Mauritius, Chagos Islands, dispute, america, britain
विश्लेषण : भारत-मॉरिशस विरुद्ध ब्रिटन-अमेरिका… भारताने मॉरिशसला पाठिंबा दिलेल्या शॅगोस बेटाचा वाद काय आहे?
Indian Army, para commandos, terrorists, Jammu valley, intelligence bureau
जम्मू खोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराची युद्धपातळीवर मोहिम, ५०० पॅरा कमांडो तैनात
Loksatta explained Why are students protesting in Bangladesh
विश्लेषण: बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन का करत आहेत?
RSS linked magazine echoes Opposition on delimitation flags concern about regional imbalance
“…तर दक्षिणेतील राज्यांचे महत्त्व कमी होईल”; संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ने मिसळला विरोधकांच्या सुरात सूर
british pm keir starmer marathi news
विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!
How Sierra Leone plans to stop child marriage
पाहुणे, वऱ्हाडी, वाजंत्री सगळ्यांनाच होणार शिक्षा! ‘या’ देशाने बालविवाह बंदीसाठी केलेला कठोर कायदा का आला चर्चेत?
Supriya Sule
“लोकसत्ताक देशात पोलिसराज प्रस्थापित करण्यासाठी…”, नव्या फौजदारी गुन्ह्यांवरून सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; म्हणाल्या, “संसदेत…”

वॉर अँड पीस : निद्रानाश : भाग १
आयुर्वेदात औषधांचे वर्गीकरण करताना अनेक प्रकार केले आहेत. भूक लागणारी, जुलाब थांबवणारी, जुलाब करवणारी, खोकला थांबवणारी, तापावरचे, असे अनेक औषधांचे गुण किंवा गट आहेत. मात्र झोपेवर म्हणून असा खास झोपेच्या औषधांचा वर्ग सांगितलेला नाही. त्याचे कारण फारच सोपे आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ याप्रमाणे प्रत्येक रोगाप्रमाणे झोप न येण्याची, कमी येण्याची, खंडित होण्याची, वेगवेगळी कारणे, परंपरा व त्यानुसार उपचार, औषधे असतात.
अ‍ॅलोपॅथीशास्त्रात असणारी, गुंगी आणणारी किंवा अंमल आणणारी औषधी द्रव्ये आयुर्वेदात नाहीत असे नाही. केवळ ‘झोप आणण्याकरिता औषध’ असा आयुर्वेदशास्त्र विचार करीत नाही. यापेक्षा सखोल विचार करून, तारतम्याने मूळ कारण दूर करून साध्यासोप्या उपायांनी झोप कशी आणता येते, याकरिता वानगीदाखल पुढील उदा. पुरेसे आहे. काही वर्षांपूर्वी एक वृद्ध गृहस्थ वय वर्षे ८०, निद्रानाश या तक्रारीकरिता आले. इतिहासामध्ये इतर कोणताच विशेष आजार दिसत नव्हता. खाल्ल्याबरोबर पोट डब्ब होण्याची तक्रार होती. त्यांना ‘रात्री काही खाऊ नका. औषधांची गरज नाही’ असे मी सुचविले. ते काहीच पटवून घेईनात. त्यांचे मत मी औषध द्यावयाची टाळाटाळ करत होतो.  त्या वृद्धांनी माझा वेळ खूपच खाल्ला. त्यांना पोटातील वायू कमी होण्याकरिता व त्यांच्या समजुतीकरिता म्हणून पिप्पलादि काढा व शंखवटी जेवणानंतर घ्यावयास सांगितले व पुन्हा एकदा रात्री कटाक्षाने जेवण न घेण्याबद्दल विनवले. झोपण्यापूर्वी रात्री १५ मिनिटे फिरून यावयास सांगितले. त्या गृहस्थांनी त्या दिवशी औषध न घेता खरोखरीच रात्री न जेवण्याचा प्रयोग केला. त्या दिवशी उशिरा का होईना, त्यांना उत्तम झोप लागली. दुसऱ्या दिवशी ही वार्ता सांगावयास ते आले. यातच या साध्या, सोप्या सल्लामसलतीचे यश सुरू झाले. बऱ्याच वेळा औषधोपचारांपेक्षा कॉमनसेन्स उपयोगी पडतो. निद्राविकारात तर तो अवश्य उपयोगी पडतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ११ मार्च
१९१२> आधुनिक जाणिवांचे दर्शन घडवून नावलौकिक संपादन करणारे सामाजिक नाटककार शंकर गोविंद साठे यांचा जन्म. ‘ससा आणि कासव’ हे त्यांचे नाटक गाजले आणि पुढे सई परांजपे यांनी त्यावर  ‘कथा’ हा चित्रपटही (शंगो यांना श्रेय देऊन) केला.
‘धन्य मी, कृतार्थ मी’, ‘छापील संसार’, ‘स्वप्नीचे धन’ ही नाटके, ‘चिंचा आणि बोरे’ हा काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या आदी साहित्य त्यांचे आहे.
१९५९> इतिहासकार आणि पुराणवस्तुसंशोधक यशवंत राजाराम गुप्ते यांचे निधन. कऱ्हाडचे वर्णन व काही पुस्तके त्यांनी लिहिली होती.
१९७९> नाटककार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे चिरंजीव आणि ‘नवाकाळ’चे  १९२९ ते ३८ या काळात संपादक यशवंत कृष्ण खाडिलकर यांचे निधन. ‘आजकाल’, ‘संसारशकट’, ‘सदानंद’ या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या.
१९९३ > कलंदरपणाचा साठोत्तरी मराठी साहित्यातील अर्क ठरलेले कवी ‘मन्या ओक’ म्हणजेच मनोहर शंकर ओक यांचे निधन. ‘आयत्या कविता’ हा काव्यसंग्रह त्यांच्या हयातीत, तर ‘मन्या ओकच्या कविता’ निधनानंतर निघाला. ‘चरसी’ आणि ‘अन्तर्वेधी’ या कादंबऱ्याही त्यांच्याच.
– संजय वझरेकर