डॉ. आर्थर होम्स (१८९०-१९६५) हे विसाव्या शतकातले एक महान भूवैज्ञानिक होते. त्यांनी भौतिकविज्ञानातल्या संकल्पनांचा उपयोग भूविज्ञानातले प्रश्न यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी केला. किरणोत्सर्गीय कालमापनाची पद्धत विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा तर आहेच, पण पृथ्वीच्या अंतरंगातल्या आवरणांपैकी कवचाखाली असणाऱ्या प्रावरणात उष्णतेचे अभिसरण (कन्वेक्शन) सतत सुरू असते या त्यांच्या सिद्धांतामुळे खंडांचे परिवहन (कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट) या सिद्धांताला बळकटी मिळाली.
होम्स यांचा जन्म १४ जानेवारी १८९० रोजी गेट्सहेड, इंग्लंड येथे झाला. त्यांना लहानपणापासून विज्ञानाची, विशेषत: भूविज्ञानाची, आवड होती. त्यांनी लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सायन्समधून (आताचे इम्पिरियल कॉलेज) १९१० मध्ये भूविज्ञान आणि भौतिकविज्ञान हे विषय घेऊन पदवी संपादन केली. पुढे तिथेच त्यांनी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा वापर करून खडकांचे वय शोधून काढण्यासंदर्भात संशोधन सुरू केले. त्यांना भूवैज्ञानिक कालमापनाचे आद्याप्रवर्तकच म्हणायला हवे. १९१३ मध्ये त्यांनी या तंत्रांचा वापर करून पृथ्वीच्या किमान वयाचा अंदाज केला. पुढे या पद्धतीत सुधारणा होऊन पृथ्वीचे वय ४.५ अब्ज (४५० कोटी) वर्षे असल्याचे सिद्ध झाले.
घनरूप असणारे खंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले कसे, हे आल्फ्रेड वेगेनर यांच्या खंडांच्या परिवहनाच्या सिद्धांतात सांगता आले नव्हते. पृथ्वीच्या प्रावरणात सुरू असणारे अभिसरण त्यासाठी कारणीभूत आहे, हे होम्स यांनी दाखवून दिले. भूगर्भातल्या किरणोत्सारी पदार्थांमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे प्रावरणात अभिसरण प्रवाह तयार होतात आणि त्यामुळे खंडांच्या गतीला चालना मिळते हे त्यातून स्पष्ट झाले. नंतरच्या काळात प्रसृत झालेल्या आणि मान्यता पावलेल्या भूपट्ट सांरचनिकीच्या (प्लेट टेक्टॉनिक्स) अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांताचा हे संशोधन पाया ठरले. त्यांच्या संशोधनामुळे पृथ्वीच्या इतिहासाचा आणि पृथ्वीमध्ये होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणे सुलभ झाले.
डरहॅम आणि एडिंबर्ग विद्यापीठात व अन्यत्रही होम्स यांनी अनेक शैक्षणिक पदे भूषवली. त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांपैकी ‘प्रिन्सिपल्स ऑफ फिजिकल जिऑलॉजी’ (१९४४) हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे पाठ्यपुस्तक मानले जाते. त्यांच्या अनेक शोधनिबंधांपैकी ६०हून अधिक शोधनिबंध फक्त किरणोत्सर्गीय कालमापन, खंडांचे परिवहन आणि अभिसरण या विषयांवर आहेत.
होम्स यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. लंडन भूविज्ञान संस्थेचे मर्चिसन पदक (१९५०), त्याच संस्थेचे सर्वोच्च वोलॅस्टन पदक (१९५६) आणि अमेरिकन भूविज्ञान संस्थेचे पेनरोझ पदकाचे (१९५६) ते मानकरी आहेत. ‘भूविज्ञानाचे नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाणारे ‘वेटलेसन पारितोषिक’ त्यांना भूकालानुक्रम आणि भूपट्ट विवर्तनातल्या क्रांतिकारी योगदानासाठी (१९६४) देण्यात आले.
– अरविंद आवटी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org