डॉ. जया विकास कुऱ्हेकर
डॉ. हरगोविंद खुराना यांचा जन्म ९ जानेवारी १९२२ या दिवशी सध्या पाकिस्तानात असलेल्या रायपूर या ठिकाणी झाला. लाहोरच्या पंजाब विद्यापीठात त्यांनी बी.एस्सी. आणि एम.एससी.चे शिक्षण पूर्ण केले. १९४५ साली भारत सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पीएच.डी. करण्यासाठी ते ब्रिटनमधील लिव्हरपुल विद्यापीठात दाखल झाले. पीएच.डी. संपादन केल्यावर ते मायदेशी परतले खरे, पण दिल्ली विद्यापीठात त्यांचा अर्जदेखील विचारात घेतला गेला नाही. १९५९ साली कॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात असताना डॉक्टर खुराना जगाला माहिती झाले, ते त्यांच्या ‘को-एंजाइम’च्या शोधामुळे!
पेशीतील बऱ्याच प्रक्रियांसाठी हे रसायन अत्यंत आवश्यक असते. तेथून त्यांनी अमेरिकेच्या व्हिस्कोंसीन्स विद्यापीठातील ‘एन्झाइम रिसर्च संस्थेत’ प्रस्थान केले आणि १९७० साली एमआयटीमध्ये प्रोफेसर ऑफ बायॉलॉजी आणि केमिस्ट्री या पदावर रुजू झाले. १९७६साली तयार केलेला कृत्रिम जनुक (जीन) त्यांनी इश्चेरीशीया कोलाय या जिवाणूत कार्यरत करून दाखवला.
त्यांच्या अनेक उल्लेखनीय शोधांचा वापर मानव कल्याणासाठी झाला. त्यांचे मुख्य योगदान म्हणजे न्यूक्लिक अॅसिड आणि आनुवंशिक संकेतांचे (कोड) विश्लेषण! यामुळे कृत्रिम जनुकांचा विकास होऊ शकला. आनुवंशिक संकेत (कोड) वाहून नेणाऱ्या आणि प्रथिनांचे संश्लेषण नियंत्रित करणाऱ्या न्यूक्लिक अॅसिडमधील न्यूक्लियोटाइड्सचा क्रम सर्वप्रथम त्यांनी शोधून काढला. आरएनएच्या माध्यमातून, प्रथिनांचे संश्लेषण करण्याची यंत्रणा शोधून काढण्यात त्यांनी सहकार्य केले. पॉलिमरेझ चेन रिएक्शन या तंत्राचा विकास केला. १९७२मध्ये सजीवांच्या कार्यात्मक जनुकांचं एकूण संश्लेषण पूर्ण करणारे जगातील ते पहिले संशोधक होते. त्यांनी पॉलिमरेझ व लायगेझ संप्रेरक वापरून, डीएनएचे तुकडे एकत्र केले. जैविक प्रयोगशाळांमध्ये अनुक्रमण, क्लोनिंग आणि अभियांत्रिकीसाठी ही कृत्रिम जनुके वापरली जातात.
२००७ नंतर, खुराना यांनी त्यांच्या संस्थेमार्फत काही अमेरिकी विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अमेरिका आणि भारतातील सामाजिक शास्त्रज्ञ, उद्याोगपती आणि उद्याोजकांचा एकत्रित समुदाय तयार करणे, हा संस्थेचा उद्देश होता.
भारतीय-अमेरिकी जैवरसायनशास्त्रज्ञ म्हणून १९६६मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. त्यांना संशोधनातील अनेक सन्मान मिळाले. १९६८ मध्ये शरीरविज्ञान आणि वैद्याकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित केले गेले. भारत सरकारने, १९६९मध्ये त्यांना पद्माविभूषणाने सन्मानित केले. १९८७मध्ये त्यांना अमेरिकेचे राष्ट्रीय विज्ञान पदक मिळाले. ९ नोव्हेंबर २०११ रोजी कॉनकॉर्ड, मॅसॅच्युसेट्स येथे वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
– डॉ. जया विकास कुऱ्हेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org