कुतूहल : प्रभावी करमरकर अल्गोरिदम

करमरकरांच्या बहुपदी रीतीचा प्रभाव इष्टतमीकरण आणि संलग्न अशा क्षेत्रात पडल्यामुळे त्या त्या क्षेत्रांचे रूप पालटले.  

दिलेले लाकूड, मनुष्यबळ व वेळ अशा संसाधनांच्या मर्यादेत राहून किती खुर्च्या आणि कपाटे तयार करावीत ज्यामुळे कमाल नफा मिळेल असे प्रश्न व्यवस्थापकाला पडतात. अमेरिकेच्या वायुसेनेसाठी त्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी रेषीय प्रायोजन (लिनिअर प्रोग्रामिंग) हे व्यापक गणिती प्रारूप १९४७ साली मांडले गेले. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ‘सिम्प्लेक्स पद्धत’ विकसित करण्यात आली, जी संगणक वापरासाठीही चपखल आहे. सदर पद्धतीत उत्तर मिळण्यासाठी लागणारा वेळ खुर्च्या आणि कपाटे यांसारख्या निर्णय घेण्याच्या चलांच्या संख्येवर अवलंबून असतो. मात्र प्रचंड संख्येत चल असलेले महाकाय रेषीय प्रायोजन प्रारूप सोडवण्यासाठी सिम्प्लेक्स पद्धत संगणकावरही दीर्घ काळ घेते.  टेलिफोन्सच्या प्रचंड गुंतागुंत असलेल्या जाळ्याचा इष्टतम वापर किंवा आंतरराष्ट्रीय विमान सेवा आखताना असे प्रश्न पडतात. त्यामुळे मूळचे भारतीय अभियंता व गणितज्ञ डॉ. नरेंद्र करमरकर यांनी त्यासाठी एक सर्वस्वी नवी गणिती पद्धत विकसित केली. ती ‘करमरकर रीत (अल्गोरिदम)’ म्हणून जगप्रसिद्ध झाली. तिचा वापर अनेक उद्योग व सेवा क्षेत्रांमध्ये कळीचा ठरला आहे.

करमरकर १९७८ मध्ये आय. आय. टी. मुंबई, येथून बी. टेक. आणि १९८३ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. झाले. अमेरिकेत ए.टी. आणि टी. बेल लॅबोरेटरीमध्ये कार्यरत असताना त्यांनी आपली अत्यंत मूलगामी कार्यपद्धती म्हणजेच रीत प्रसिद्ध केली (१९८४). ती सिम्प्लेक्स पद्धतीपेक्षा लक्षणीय प्रमाणात कार्यक्षम असल्याचे त्यांनी गणितीरीत्या सिद्ध केले. याला कारण म्हणजे करमरकरांची रीत चलांच्या संख्येनुसार बहुपदी वेगाने वेळ (पॉलिनॉमिअल टाइम) घेणारी आहे, तर सिम्प्लेक्स पद्धत घातांकात वेळ (एक्स्पोनेन्शिअल टाइम) घेणारी अशी आहे. करमरकरांच्या बहुपदी रीतीचा प्रभाव इष्टतमीकरण आणि संलग्न अशा क्षेत्रात पडल्यामुळे त्या त्या क्षेत्रांचे रूप पालटले.   

या कार्यासाठी करमरकरांना अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली. जशी की, ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिकेचे फ्रेडरिक डब्लू. लॅन्चेस्टर प्राइझ (१९८४), अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी आणि मॅथेमॅटिकल प्रोग्रॅमिंग सोसायटी यांचे संयुक्त फल्कर्सन प्राइझ (१९८८), भारत सरकारचे श्रीनिवास रामानुजन जन्मशताब्दी पारितोषिक (१९९९) आणि असोसिएशन ऑफ कॉम्प्युटिंग मशिनरी या संस्थेचे पॅरिस कॅनेल्लकिस अवॉर्ड (२०००). एम.आय.टी. (१९९१) आणि प्रिन्स्टन (१९९६) येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केल्यावर नरेंद्र करमरकर १९९८-२००५ दरम्यान टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्राध्यापक होते. सध्या ते अत्युच्च संगणन (सुपरकॉम्प्युटिंग) या विषयात संशोधन करून अधिक प्रगत महासंगणकाच्या निर्मितीसाठी नवीन गणिती संकल्पना विकसित करत आहेत.

–  निशा पाटील

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Effective karmarkar algorithm zws

Next Story
कुतूहल : दूषित पाणी प्यायल्यामुळे प्राण्यांना होणारे रोग
ताज्या बातम्या