विजेचा दिवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सर्वत्र सहजपणे दीर्घकाळासाठी वापरता येईल असा विजेचा दिवा जरी १८७०च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकी शास्त्रज्ञ थॉमस एडिसनने विकसित केला असला, तरी या दिव्याची जन्मकथा त्याआधी कित्येक दशके सुरू होते. १८०९ साली ब्रिटिश शास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही याने कार्बनच्या काडय़ांचा वापर करून ‘आर्क लॅम्प’ बनवला. यात दोन कार्बनच्या काडय़ांमधल्या लहानशा फटीतील हवेतून विद्युत मोचन (डिसचार्ज) होऊन डोळे दिपवून टाकणारा प्रकाश निर्माण व्हायचा, पण तो अल्पकाळच टिकून राहायचा. काही काळ अगोदर याच हम्फ्री डेव्ही याने प्लॅटिनमच्या पट्टीमधून विद्युतप्रवाह पाठवून, त्याच्या विद्युतरोधामुळे (रेझिस्टन्स) निर्माण होणाऱ्या उष्णतेद्वारे प्रकाश निर्माण करण्याची सूचना केली होती. १८२० साली इंग्लंडच्या वॉरेन दे ला ऱ्यू याने प्लॅटिनमच्या तारेचे वेटोळे निर्वात नळीत ठेवले आणि त्यातून विद्युतप्रवाह पाठवून अशा प्रकारचा विजेचा दिवा तयार केला. परंतु हा दिवा त्यातील प्लॅटिनममुळे अत्यंत महागडा ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानंतरच्या काळात दिव्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक वेगवेगळे पदार्थ वापरून पाहिले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात निर्वातीकरणासाठी वापरण्यात येणारे पंप फारसे प्रगत नव्हते. त्यामुळे अशा काचगोळ्यांमध्ये हवा राहायची आणि हे प्रकाश देणारे विविध पदार्थाचे धागे अल्पावधीतच जळून खाक व्हायचे, शिवाय या काचेला आतून काजळीचा थरही बसायचा. १८६४ साली हर्मान स्प्रेंगेल याने लंडनमध्ये चांगल्या प्रतीचा, पाऱ्याचा वापर करणारा पंप बनवला आणि कार्बनवर आधारलेले धागे दिव्याच्या बल्बमध्ये वापरणे सुलभ झाले. सन १८७९ च्या सुमारास अमेरिकी संशोधक थॉमस एडिसन आणि त्याच्या सहकाऱ्यांनीही विविध प्रकारचे कार्बनयुक्त तंतू वापरून हजाराहून अधिक दिव्यांच्या चाचण्या घेतल्या. त्यातील कापसाच्या तंतूंपासून बनवलेला दिवा सुमारे साडेचौदा तास चालला. त्यानंतर एडिसनने

यात आणखी बदल करत अखेर बांबूच्या तंतूंपासून दिवा तयार केला. या दिव्याचे आयुष्य बाराशे तासांचे होते! १९००-१० या दशकात दिव्यातील कार्बनची जागा त्याहून टिकाऊ , परंतु स्वस्त असणाऱ्या टंगस्टन धातूने घेतली. पुढे निर्वातीकरणाऐवजी काचगोळ्यात नायट्रोजनसारखा उदासीन वायूही वापरात आला. अशा रीतीने अनेक समस्यांवर मात करीत तयार झालेला हा आद्य विद्युतदीप आजही क्वचित कुठे मंद सोनेरी प्रकाश देत तेवत असलेला दिसून येतो.

 सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electric lamp thomas edison resistance abn
First published on: 23-09-2019 at 00:07 IST