सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

उत्तर युरोपातील बाल्टीक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यालगत असलेल्या तीन देशांच्या समूहाला बाल्टीक देश किंवा बाल्टीक्स म्हटले जाते. हे तीन आहेत एस्तोनिया, लातविया आणि लिथुनिया. या देशांना बाल्टीक देश म्हटले जाते ते त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे. या तिन्ही देशांमधील जनतेत वांशिक आणि सांस्कृतिक भिन्नता आहे. या देशांपैकी एस्तोनिया हा उत्तरेकडील देश सर्वात कमी क्षेत्रफळाचा आणि तसेच कमी लोकसंख्येचा! एस्तोनियाच्या उत्तरेस फिनलॅण्डचे आखात, पश्चिमेस बाल्टिक समुद्र (बाल्टीक समुद्राच्या पलीकडे पश्चिमेला स्वीडन आहे), दक्षिणेस लातविया तर पूर्वेस रशिया आणि पीपस सरोवर अशा याच्या चतु:सीमा आहेत. ४५ हजार चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला एस्तोनिया त्याच्या केवळ साडे तेरा लाखांच्या लोकवस्तीमुळे युरोपीय संघातला सर्वात छोटा देश बनला आहे. रशियाच्या सान्निध्यात आणि प्रभावाखाली राहिलेल्या या देशातील ६५ टक्के लोक कोणताही धर्म न मानणारे आहेत, ३४ टक्के लोक ख्रिस्ती आहेत. येथील भिन्न वंशीय लोकवस्तीपैकी ७० टक्के मूळचे एस्तोनियन, २४ टक्के रशियन आणि उर्वरितांमध्ये युक्रेनियन, तसेच बेलारूसीयन आहेत. एकल संसदीय गृह असलेली प्रजासत्ताक राज्यव्यवस्था येथे असून तालीन ही एस्तोनियाची राजधानी आणि सर्वांत मोठे शहर आहे. सोव्हिएत युनियनचा एक घटक देश असलेला एस्तोनिया २० ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडून एक सार्वभौम बहुपक्षीय प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. एस्तोनियन लोक हे फिनलॅण्डमधील फिन्स वंशीय लोकांचे वंशज असून यांची एस्तोनियन भाषा फिनिश भाषेशी बरीच मिळतीजुळती आहे. सध्या प्रजासत्ताक एस्तोनिया हा युनायटेड नेशन्स, नाटो, युरोपियन युनियन, युरोझोन या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे. उच्च सकल अर्थव्यवस्था असलेला हा युरोपातील एक विकसित देश असून त्याचा मानवी विकास निर्देशांकही उच्च गटात येतो. एस्तोनियाच्या अर्थव्यवस्थेच्या वेगवान वृद्धीमुळे या देशाला ‘बाल्टीक टायगर’ या नावानेही संबोधले जाते. जहाज बांधणी, अन्न आणि मत्स्य प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक्स, लाकूड, वस्त्रोद्योग आणि रासायनिक उद्योग या व्यवसायांवर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे.