कोणतेही पीक काढायचे असेल तर शेतकरी सहसा बाजारात जाऊन त्याचे बियाणे खरेदी करतो. धान्य असो वा डाळी, कडधान्य असो वा तेलबिया, फळभाज्या असोत वा पालेभाज्या या विविध पिकांसाठी मुबलक वेगवेगळ्या प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत. यांच्यातून योग्य बियाणांची निवड कशी करायची, त्याकरिता कोणते निकष लावायचे, यासाठीचे अचूक मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळायला हवे. त्याच्या शेतजमिनीची गुणवत्ता, तेथील हवामान व पाऊसमान, पाऊस न पडल्यास पाण्याची पर्यायी व्यवस्था, पाण्याची उपलब्धता या सर्वाची अचूक माहिती त्याला असणे गरजेचे आहे. अनुभवाने यांतील काही बाबतीत शेतकरी सजग असतो. एकदा बियाणे खरेदी केल्यावर पेरणी करताना दोन रोपांमधील अंतर तसेच दोन रांगांमधील अंतर यांचेही ज्ञान त्याला असणे आवश्यक आहे. भातासारखे पुनर्लावणी केले जाणारे पीक असेल तर याचा वापर पुढील टप्प्यांवर केला जातो. पण उत्पादनाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा घटक आहे. याचबरोबर पिकाला पाणी किती व केव्हा द्यायचे, पाऊस योग्य पडला तर केव्हा द्यायचे, कमी पडला तर केव्हा द्यायचे, नाही पडला तर केव्हा द्यायचे अशा सर्व बाजूंचा विचार होऊन तसे मार्गदर्शन शेतकऱ्याला मिळायला हवे. त्याचबरोबर खते कोणती, किती, केव्हा द्यायची याचीही माहिती हवी. यासाठी माती परीक्षण केले असेल तर खूप सोयीचे ठरते. खताची मात्रा आवश्यक तेवढीच म्हणजे मर्यादित ठेवता येते. खर्च कमी व्हायला मदत होते. रासायनिक खते असतील तर खते कमी लागतील व पाणीही कमी लागेल. म्हणजे खर्च आणखी कमी होऊ शकतो. तणांचे नियंत्रण कसे करावे, त्यासाठी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे यांसारख्या बाबीही महत्त्वाच्या आहेत. अन्यथा मुख्य पिकाबरोबर तणही फोफावले तर उत्पादनावर दुष्परिणाम होणार हे नक्की. कीड नियंत्रणासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात, कोणत्या वेळी कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करावी, त्याचे प्रमाण काय असावे अशी सगळी माहिती शेतकऱ्यांना हवी. सरतेशेवटी तोडणी केव्हा व कशी करावी, शेतमाल बाजारात कशा स्वरूपात न्यावा, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
–  दिलीप हेल्रेकर    
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..:    शब्दप्रभु
‘‘सर्वसामान्य माणसे माझ्या शब्दांनी मोहित होतील; परंतु अधिकारी व्यक्तीच केवळ त्यातील मतलब समजतील,’’ असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. मी शब्दांमध्येच गुरफटलो; परंतु या शब्दांमुळे मला व्यवहार आणि विज्ञानाचा (म्हणजे प्रपंचाचा) थोडाफार अर्थ समजला हेही न झाले थोडके. युद्धभूमीचे वर्णन करताना तिथे उडलेल्या धुरळ्याचा उल्लेख ज्ञानेश्वर करीत नाहीत त्यांची दृष्टी इतरत्र आहे. एवढा सारा शंखध्वनी। आकाशाचीही बसली कानठळी।। असे ते म्हणतात तेव्हा काहीतरी विपरीत होणार आहे याची ती नांदी असते. कानठळ्या कानाच्या बसतात. आकाश ध्वनीचे वाहक आहे तेव्हा इथे काहीतरी उलटे होते आहे, असे ध्यानात येते, तसेच आकाश सर्वत्र असते असे असूनही ‘आकाशही तुटण्याची। वेळ आली।।’ अशी एक भीतिदायक कल्पना चितारली जाते. पुढे  – उलथेल काय ही पृथ्वी। आणि पडेल नक्षत्रांचा सडा। असा विस्मय झाला। आदिपुरुषाला।। असे म्हणत ते एक नवल कथा आपल्याला सांगतात. युद्धाचे स्वरूप अर्जुन आपल्याला सांगतो चार शब्दांत। हे झुंज नव्हे प्रमादू।। (हे युद्ध नव्हे पाप आहे) आणि आपल्या गुरूंचे वर्णनही चार शब्दांतच करतो। मी पार्थु द्रोणाचा केला। (द्रोणाने पार्थाला घडवला) पण ज्ञानेश्वर एक अतिशय सूचक विधानही करतात। येणे धनुर्वेद मज दिधला।। (मला यांनी धनुर्विद्या शिकवली) याचा अर्थ केवळ धनुर्विद्याच माणसाला पुरत नाही. त्यासाठी गुरू लागतो. त्यांच्याबद्दल म्हणजे निवृत्तीनाथांबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात, ‘‘मज हृदयी सद्गुरू। जेणे तारिलों हा संसार पूरूं। म्हणउनी विशेषे अत्यादरू। विवेकावरी।।’’ ‘माझे गुरू हृदयात आहेत म्हणून विवेकाच्या आधारे हा संसाराचा पूर मी तरलो,’ असे ज्ञानेश्वरांना म्हणायचे आहे.
 विवेक या शब्दाला खरे तर इंग्रजीत पारिभाषिक शब्द नाही. ऊ्र२ू१ी३्रल्ल असा एक शब्द आहे, पण त्याला विवेक या शब्दाची अर्थघनता नाही.
अर्जुनाचे ज्ञानेश्वरांनी (गीतेवर आधारित) केलेले वर्णन हल्ली इंग्रजीत ज्याला ढंल्ल्रू फीूं३्रल्ल म्हणतात त्याचे हुबेहूब चित्र आहे.
मला उरले नाही भान। मन बुद्धीचे हरवले ठिकाण। तोंडाला पडली कोरड। इंद्रियात उरले नाहीत प्राण।। अंगावर भीतीचा काटा। मनामध्ये भयाचा बावटा। हात झाला लुळा थोटा। निसटले धनुष्य बाण।।
या पाश्र्वभूमीवर श्रीकृष्ण नावाचा महाभारतातला राजा आणि मुत्सद्दी आणि इंग्रजीत ज्याचे वर्णन फडटअठळकउ ऌएफड असे करता येईल तो गीतेमध्ये ब्रह्मस्वरूप होऊन अर्जुनाला उपदेश करतो तेव्हा त्याला गोळाबेरीज सांगतो, मीच जर आहे अकर्ता। तर तू कोठला व्हायला कर्ता।।
श्रीकृष्णाबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस     :मनोविकार : भाग – १
मनाचे सत्त्व, रज, तम हे गुण नुसते घटपटादि तात्त्विक चर्चेचा भाग नसून, वैद्य डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांच्या तक्रारीत त्यांचे प्रतिबिंब बऱ्याच वेळा स्पष्ट उमटलेले दिसते. रुग्ण शारीरिक तक्रार करीत असतो. त्याचा इतिहास, कारणे, रोगाचा प्रवास,  सभोवतीचे वातावरण, कौटुंबिक स्थिती, कामाचे स्वरूप यांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला असता बऱ्याच रोगांना मनोविकाराची झालर आहे असे लक्षात येते. काहीवेळेस तर शारीरिक तक्रार ही मानसिकारामुळेच असते. इथे एका प्रसिद्ध इंग्रजी लेखकाची व मराठीतील सर्वश्रेष्ठ नाटककार कै. राम गणेश गडकरी यांच्या वचनाची आठवण येते. इंग्रजी लेखक असे म्हणतो की ‘एव्हरीवन इज मॅड, ओनली डिग्री व्हेरीज’ राम गणेश गडकरी यांचे ‘वेडय़ांचा बाजार’ हे नाटक तर प्रसिद्धच आहे.
मन व मनाचे विकार यावर अधिकारवाणीने लिहिणे अवघड आहे. मन अनाकलनीय आहे. मनाचे व्यापार वायुतत्वाने नियंत्रित आहेत. वायूच्या वेगावर जसे नियंत्रण राहू शकत नाही. तसे मनाच्या भरारीवर ताबा ठेवणे अवघड आहे. एकवेळ दारे खिडक्या लावून घरात वायूपासून संरक्षित राहाता येईल. पण मनाची कवाडे बंद करून स्थिर चित्त राहणे, भल्याभल्या योगीराजांनाही अवघड जाते. तरीपण काही रुग्णांनी मला संधी दिली. शरीराचा फार कमी संबंध असलेले, मनाचा जास्त संबंध असलेले त्यांचे रोग आम्ही हाताळले. या संमिश्र यशातील फार मोठा वाटा स्वत: रुग्णांचा व योगासने, सूर्यनमस्कार, आश्वासन, खेळ या पारंपरिक उपचार पद्धतींचा आहे हे मी मानतो. मी नाममात्र आहे याची जाणीव आहे. बऱ्याचवेळा रुग्णांना प्रसिद्ध शैलीकार लेखक श्री. म. माटे यांच्या ‘अडगळीची खोली’ या मनासंबंधीच्या लेखासंबंधीची व अष्टांगहृदय सूत्रस्थान अ१४/३४ या सूत्रासंबंधीची माहिती मार्गदर्शक ठरते असा अनुभव आहे.
अचिन्तया हर्षणेन ध्रुवं सन्तर्पणेन च।
स्वप्न प्रसङ्गच्च कृशो वराह इव पुष्यति ।।
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २५ मे
१८९५>  इतिहासकार भास्कर रामचंद्र भालेराव यांचा जन्म. त्यांनी ‘मराठय़ांचे श्रेष्ठत्व’, ‘मराठय़ांचा देशाभिमान अर्थात मराठेशाही बुडाल्याची मीमांसा’ या ग्रंथांशिवाय महादजी शिंदे यांच्या कवितांचे संशोधन करून त्या प्रकाशित केल्या.
१८९५> साक्षेपी इतिहासकार  त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म. नानासाहेब पेशवे (१९२६), दत्तोपंत आपटे: व्यक्तिदर्शन (१९४५), पानिपत : १७६१ (इंग्रजी १९४६; मराठी १९६१) निजाम-पेशवे संबंध (१९५९) तसेच नागपूर दप्तरातील कागदपत्रांचे संपादन (पहिला खंड १९५४, दुसरा ५९) ही पुस्तके त्यांनी १९६३ पर्यंतच्या हयातीत लिहिली. शिवचरित्राचे काम होण्याआधीच ते गेले, परंतु ‘श्री शिवछत्रपती : संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने’ हा ग्रंथ १९६४ साली प्रकाशित होऊन साहित्य अकादमी पुरस्कार विजेता ठरला. ‘निवडक शेजवलकर’चे दोन खंड प्रकाशित झाले. एम. ए. साठी त्यांनी केलेल्या अभ्यासाचा ‘मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव’ हा ग्रंथ १९९८ साली इंग्रजीत आला .
१९९८ > शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांची भाषांतरे करणारे वामन शिवराम आपटे यांचे निधन.
– संजय वझरेकर