scorecardresearch

जे आले ते रमले.. : महात्मा गांधी, कावसजी आणि ब्रिटिश

गांधीजींना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जाताना दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारसपत्रे आवश्यक होती.

जे आले ते रमले.. : महात्मा गांधी, कावसजी आणि ब्रिटिश

ब्रिटिशराज काळात सीआयडीमध्ये नियुक्त होऊन कावसजी पेटीगारा त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर वरच्या पदांवर भराभर बढती मिळवत गेले. पुढे १९२८ साली ते ‘डीसीपी’ म्हणजे मुंबईचे स्पेशल ब्रँचचे पोलीस उपआयुक्त झाले. या उच्चपदावर नियुक्त झालेले ते पहिले बिगर युरोपियन- पारशी समाजातले!

आश्चर्य म्हणजे ब्रिटिशराज काळातील एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी असूनही कावसजी पेटीगारांची, स्वातंत्र्य चळवळीच्या पुढाऱ्यांशीही जवळीक होती. महात्मा गांधींची स्वातंत्र्य आंदोलन काळात चले जाव चळवळ जेव्हा ऐनभरात होती तेव्हा ब्रिटिश सरकार तसेच महात्मा गांधी आणि इतर पुढारी या दोघांचाही कावसजी यांच्यावर भरवसा होता हे विशेष! जेव्हा जेव्हा गांधीजींना अटक होण्याचा प्रसंग येई त्या प्रत्येक वेळी कावसजींनी आपल्याला अटक करावी अशी गांधींची इच्छा असे. कावसजी हे केवळ त्यांचे कर्तव्य बजावतात हे त्यांना माहीत होते. दुसऱ्या बाजूला कावसजी आपले कर्तव्य चोख बजावतीलच, याबद्दल ब्रिटिशांना खात्री असे!

गांधीजींना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जाताना दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारसपत्रे आवश्यक होती. गांधीजींनी त्यापैकी एक कावसजींचे घेतले! आजही हे पत्र मणिभवनमध्ये ठेवलेले आहे. मुंबईचे तत्कालीन प्रसिद्ध सर्जन डॉ. गिल्डर हेही सच्चे गांधीवादी. गांधींच्या प्रत्येक अटकेवेळी तिथे हजर राहून त्यांच्याबरोबर स्वतलाही अटक करून घेत. एकदा कावसजींवरच डॉ. गिल्डर उपचार करीत असताना गांधीजींच्या अटकेची बातमी आली. डॉक्टरांनी गांधीजींना चिठ्ठी पाठवली की माफ करा, मी कावसजी पेटीगारांवरच उपचार करतोय!

विशेष म्हणजे कावसजींचे गांधीजींशी जवळचे संबंध गांधीजींच्या मृत्यूनंतरही संपले नाहीत! कावसजींचा मुलगा नोशिरवान, गांधी हत्येच्या खटल्याच्या स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटरचा प्रमुख सहायक सॉलिसिटर होता! ब्रिटिश सरकारचा भरवसा आणि जनतेचा आदर मिळवणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याच्या १९४१ साली झालेल्या निधनानंतर लोकांनी वर्गणी जमवून त्यांचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा मुंबईत धोबी तलाव येथे उभारला आहे!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-04-2018 at 02:01 IST

संबंधित बातम्या