माल्टा या छोटय़ा द्वीपराष्ट्राचे भूमध्य सागरातील मध्यवर्ती मोक्याच्या स्थानामुळे इतिहासात तिथे अनेकदा सत्ताबदल होत राहिले. माल्टा हे या देशाचे नाव ग्रीक शब्द ‘मेली’ यावरून घेतले असावे. मेली म्हणजे मध्य. माल्टा बेटावरच्या विशिष्ट प्रकारच्या मधमाश्यांपासून मिळणारा उच्च दर्जाचा मध पूर्वी साऱ्या युरोपात प्रसिद्ध होता. माल्टा रोमन वर्चस्वाखाली आले तेव्हा रोमनांनी ‘मेली’ या नावाचा अपभ्रंश ‘मेलीटा’ केले व पुढे त्याचे ‘माल्टा’ झाले! दक्षिण इटलीतील सिसिलीच्या साम्राज्यात माल्टा ११व्या शतकात समाविष्ट झाले. १३व्या शतकात सिसिलीचा राजा फ्रेडरिक द्वितीयने ख्रिस्ती संस्कृतीला प्रोत्साहन देत माल्टातले बहुतांश अरब मुस्लीम माल्टाबाहेर काढले. ज्या मुस्लिमांना माल्टात राहायचे त्यांच्यावर ख्रिस्ती धर्मातराची सक्ती केली. त्यामुळे माल्टाबाहेरची ख्रिश्चन कुटुंबे मोठय़ा संख्येने इथे स्थलांतरित झाली. पुढची पाच ते सहा शतके युरोपातील विविध घराण्यांच्या अंमलाखाली माल्टा राहिला व त्यानंतर १८व्या शतकाअखेरीस १७९८ मध्ये माल्टाचे स्वामित्व नेपोलियनकडे आले. नेपोलियनने माल्टा घेतल्यावर त्याचा मोर्चा पुढे इजिप्त घेण्यासाठी निघाला. त्याने त्याची मोठी फौज आणि लष्करी अधिकारी माल्टात ठेवले. माल्टातल्या या फ्रेंच सैन्याने नेपोलियनची पाठ वळताच तिथे लूटमार सुरू केली. जेत्यांच्या या लुटमारीमुळे त्रस्त झालेल्या माल्टी जनतेने या सैनिकांना प्रतिकार केला. पुढे ब्रिटिश साम्राज्याने माल्टी जनतेला शस्त्रे, दारूगोळा व सैन्यपुरवठा करून फ्रेंचांवर हल्ला करण्यास मदत केली. ब्रिटिशांच्या मदतीने इथल्या जनतेने फ्रेंचांवर चढाई करून त्यांना माल्टाबाहेर काढले. सन १८००मध्ये माल्टातल्या फ्रेंच फौजेने शरणागती पत्करली. माल्टाच्या जनतेने ब्रिटिशांना माल्टाची प्रशासकीय जबाबदारी आणि सार्वभौमत्व स्वीकारण्याची विनंती केली. यासंबंधी काढलेल्या जाहीरनाम्यात माल्टाचे स्वामित्व स्वीकारताना ब्रिटिशांना काही अटी घातल्या होत्या. त्यात प्रमुख अट होती- ब्रिटिश सम्राटाला भविष्यात माल्टाचे सार्वभौमत्व बरखास्त करावयाचे असेल तर माल्टाचे स्वामित्व परस्पर दुसऱ्या एखाद्या सत्तेला हस्तांतरित करण्याचा अधिकार त्यांना नाही. ब्रिटिशांनी ही अट मान्य करून १८१४ साली पॅरिसमध्ये माल्टी जनतेशी करार करून माल्टा ही ब्रिटिशांची वसाहत झाल्याचे जाहीर केले.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com