मुंबईत नोकरी करणाऱ्यांना गावच्या निसर्गाची भुरळ पडणे स्वाभाविक आहे. गोविंद चाळके मुंबईत नोकरी करत होते. अचानक काही कारणाने त्यांची नोकरी धोक्यात आली. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाला ते कंटाळले होते. रत्नागिरी जिल्ह्य़ातील संगमेश्वर तालुक्यातील आपल्या कर्ली या गावी जाऊन फळबाग करायची हे त्यांनी निश्चित केले. सख्खे, चुलत मिळून १५ भावंडांचा चाळके परिवार. सगळे मुंबईला नोकरी करतात. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन २५ एकर माळरानाची जमीन ६१ वर्षांसाठी लीजवर घेतली. त्यातील २० एकर जमीन लागवडीयोग्य आहे. आधी या माळरानावर फक्त रानटी झाडे होती.
सन २००० मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत कृषी विभागाच्या सहकार्याने चाळके बंधूंनी फळबागेची लागवड केली. शेततळ्यासाठीही कृषी विभागाकडून अनुदान मिळाले. आंबा, काजू, नारळ याव्यतिरिक्त आवळा, चिकू, दालचिनी हीदेखील झाडे आहेत. फळबागेला लागून निवे धरणाचा जलाशय असल्याने झाडांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नच नव्हता. फळांमध्ये काजू हे मुख्य पीक ठेवले. काजूसाठी शेतातच नर्सरी तयार केली. इतर झाडे कोकणातील विविध ठिकाणांहून आणली. फळे प्रक्रिया करून बाजारात नेली तर त्यांना जास्त भाव मिळतो, हे समजल्यावर २००४ मध्ये कृषी विभागाच्या साहाय्याने प्रक्रिया उद्योग सुरू केला. आता या फळबागेतून उत्पन्न मिळू लागले आहे. प्रक्रिया केलेल्या काजूंची गुणवत्ता चांगली असल्याने ग्रांहकांकडून चांगली मागणी आहे.
फळबागा आणि निसर्गसौंदर्य यांचा उपयोग करून चाळके कृषी पर्यटन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्यांनी कोकणी पद्धतीचे कॉटेज आणि एक हॉल बांधला आहे. फळबागेत मधमाशी संगोपनाचा प्रकल्पही राबवला आहे. या मधुमक्षिका पालन प्रकल्पाचे वैशिष्टय़ म्हणजे हे जिल्ह्य़ातील खादी व ग्रामोद्योग महामंडळाची मान्यता असलेले पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. या सर्व प्रकल्पांकडे मिलिंद आणि गोिवद चाळके लक्ष पुरवतात. गोविंद चाळके फळबागेच्या विकासासाठी गावातच राहातात. कुटुंबातील अन्य सदस्य शक्य तेव्हा मदतीसाठी येतात. चाळके परिवाराची ही फळबाग समूहशेतीचे एक अनुकरणीय उदाहरण आहे.
-अनघा वक्टे , मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
जे देखे रवी.. – वेदान्त
हा आजार काय आहे किंवा कसा उद्भवला, हे शोधल्याशिवाय आदमास पंचे उपाय करता येत असतीलही; परंतु ते शास्त्रशुद्ध वैद्यक नव्हे. विश्वाच्या बाबतीतही तेच आहे. ही काय भानगड आहे. हे कळल्याशिवाय तिथे वागणार कसे? मागच्या पिढय़ांनी सहन केलेल्या ठेचा कोणालाच परत नको असतात.
मूळ प्रश्न असा की, हे विश्व चैतन्य आहे की वस्तू? वस्तुवादाचे उत्तम उदाहरण कणाद ऋषींचा परमाणुवाद आहे. हे विश्व कणांचे बनले आहे. वस्तू किती कणांची आहे आणि ते एकत्र कसे येतात यावर त्या वस्तूचा स्वभाव ठरतो, असे त्या ऋषींनी संदिग्धपणे सांगितले आणि त्याचे स्पष्टीकरण तर्काच्या आधाराने देता आले. कारण गौतम नावाच्या ऋषीने तोवर तर्कशास्त्र सांगितले होते; परंतु वस्तूमधली अणू-परमाणूंच्या एकत्रीकरणाची किंवा विभक्त होण्याची जी क्रिया आहे ती आली कोठून या प्रश्नावर जेव्हा गाडे अडले तेव्हा जडवाद्यांनी प्रत्येक वस्तूत हालचाल करण्यासाठी एक स्वतंत्र एजंटच नेमून टाकला तेव्हा मात्र गाडे हलण्याऐवजी आणखीनच रुतले.
मग शेकडो वर्षांच्या काळाच्या ओघात वेदांत्यांनी जडवाद्यांना वस्तूच्या निरीक्षणाचे कौतुक करीत त्याचे ऋण मान्य केले आणि मग असा प्रश्न विचारला की, चैतन्याचा स्रोत एकच धरू या आणि तो सर्व वस्तूंत पसरतो असे समजू या. एवढेच नव्हे तर चैतन्यच वस्तुरूप होऊ शकते, असेही मानले तर? आणि मग ते गाडे जे हलले ते अजून मोठय़ा दिमाखाने कालक्रमणा करीत आहे.
या तत्त्वज्ञानाला आई-बाप नाहीत, एक उद्गाता नाही, एक धर्मसंस्थापक नाही याला देव लागत नाही. त्या ऊर्जेच्या स्रोताचे संपूर्ण स्पष्टीकरण देता येत नाही ही कबुली वेळोवेळी देण्यात आली आहे. याबद्दल प्रतिपादन करता येते, पण ते खरेच असते, असे नाही म्हणूनच ज्ञानेश्वरीत वेदप्रतिपाद्या एवढाच शब्द येतो. हा खेळ एका जुन्या (आद्या) बळाचा (आत्मा) आहे आणि या बळातून निर्जीव (!) सजीव (!) गोष्टी (रूपे) निर्माण होतात, असे एक अंधूक पण तरीही तेजस्वी भाकीत करताना आत्मरूपा हा शब्द अवतरतो. शेवटी हा आत्मरूपा आद्या किती किती तरी जुना तो स्वत:तच मश्गूल म्हणून स्वसंवेद्या; परंतु माणूस जात मोठी विलक्षण आहे. ऊर्जेचे रूपांतर वस्तूत होते त्याचप्रमाणे वस्तूचे रूपांतर ऊर्जेत होते ही प्रमेये त्याने सिद्ध केली म्हणूनच बॉम्बस्फोट वस्तूतून होतो आणि युरोपमधल्या एका भुयारात एक ना एक तऱ्हेने प्रचंड ऊर्जेचा झंझावात निर्माण करून त्यातून एक वस्तूसदृश कण निर्माण करण्यातही माणसाला यश आले आहे. त्याला देवकण असे नाव ठेवून त्याचे नुकतेच बारसेही झाले. माणसानेच देवाला जन्माला घातले हेच खरे.
सोप्या भाषेतला वेदान्त उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – नाडी परीक्षा- एक अभ्यास (२)
चांगले आरोग्य असणाऱ्या व्यक्तीच्या नाडी व श्वासाचे एक ठराविक प्रमाण असते. एक श्वास पूर्ण होतो, तेवढय़ा अवकाशात नाडी चार वेळा चालते. मेहनत, कसरत करताना नाडी व श्वासोच्छ्वासही याच प्रमाणात वाढतात. हे प्रमाण कधीकधी रोगामुळे बदलते. खूप थंडीच्या दिवसांत नाडीच्या ठोक्यांची सरासरी थोडी कमी, उन्हाळय़ात थोडी अधिक असते. सामान्यपणे नाडीचे ठोके ७०-७२ असतात. उंच माणसांची नाडी ५०-६० अशी बऱ्याचदा आढळते. प्रसिद्ध नेपोलियन बोनापार्ट यांच्या नाडीची गती नेहमी ४० असे. इतके असूनही ते निरोगी, सशक्त व साहसी होते, हे सर्वानाच माहीत आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांची नाडी अत्यंत धीरगामी असे, अशी लोकवार्ता आहे.
नाडी निद्रेत अति मंद असते. खूप विश्रांती, उदासीनता, खूप थंड हवामान, यामुळे व काही कफविकारांमुळे ती ३०-४० पर्यंत खाली आली तरी घाबरण्यासारखे काही नसते. गर्भाशयात असताना बालकाचे ठोके खूप असतात असा तज्ज्ञांचा सांगावा आहे. जन्म झाल्याबरोबर दर मिनिटाला हृदयाचे आकुंचन नाडी १३०-१४०च्या आसपास असते. बालकांची ही नाडी दरवर्षी क्रमाक्रमाने १५/२० या हिशेबाने कमी होत चौदा-पंधराव्या वर्षी ८०/९० पर्यंत खाली येत असते. भर जवानीतील तरुणांच्या हृदयाचे आकुंचन ६० पासून ८०, लहान बालकाचे एका मिनिटात १०० ते १४० पर्यंत प्राकृत समजले जाते. पूर्ण वाढ झालेल्या पुरुषाचे ठोके दर मिनिटास ७० असू शकतात. व्यायाम किंवा तापात हे ठोके वाढतात. स्त्रियांच्या हृदयाचे ठोके पुरुषांपेक्षा आठ-दहा अधिक असू शकतात. आपल्या दिनचर्येतील शीतोष्ण हवामान, आपल्या कामाचे स्वरूप यामुळे नाडीच्या ठोक्यात फेरफार होऊ शकतो. सकाळी ६०/६५ ठोके असणारी नाडीची गती दुपापर्यंत वाढते. ही सायंकाळपर्यंत ७०/७५ पर्यंत सामान्यपणे येते. रात्री उतरत उतरत ५०/५५ पर्यंत खाली येते. नाडीच्या ठोक्यात विविध रोग, आहार, शारीरिक श्रम, कमी-अधिक भीती यामुळे फरक पडू शकतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ८ ऑक्टोबर
१८८८ > कवी, प्राचीन भारतीय वाङ्मयाचे अभ्यासक व षड्दर्शनज्ञ महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. ‘षड्दर्शन चिंतनिका’ आणि ‘व्हिसिटय़ूडस ऑफ आर्यन सिव्हिलायझेशन इन इंडिया’ या ग्रंथांमुळे जगात (विशेषत युरोपात) त्यांचा नावलौकिक झाला. याशिवाय, ‘राजा शिवाजी’ मराठी साहित्यात आणण्याचा प्रयोग त्यांनी केला. ‘ऋषी’ या ७७० ओळींच्या काव्यातून चार हजार वर्षांपूर्वीचे आर्यजीवन त्यांनी चितारले होते.
१८९१ > उद्योगासोबत साहित्याचाही वारसा तेवढय़ाच ताकदीने सांभाळणारे शंकरराव वासुदेव किलरेस्कर यांचा जन्म. ‘किलरेस्कर खबर’चे त्यांनी ‘किलरेस्कर’ मासिकात रूपांतर केले, त्यासाठी खास छापखाना उभारला. ‘स्त्री’, ‘मनोहर’ नियतकालिकांची सुरुवात केली. विक्रीशास्त्राच्या पदवीपूर्वी चित्रकलेचाही शास्त्रशुद्ध अभ्यास केलेल्या शंकररावांच्या चित्र-गद्याचे पुस्तक ‘शंवाकिंची चित्रकला’ या नावाने प्रसिद्ध झाले, तर ‘शंवाकिनी’ हे आत्मचरित्र आणि ‘यात्रिकाची यात्रा’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. १ जानेवारी १९७५ रोजी त्यांचे निधन झाले.
१९८० > श्रीपाद शंकर खानवेलकर यांचे निधन. ‘तथागत’, ‘योगमाया’, या कादंबऱ्या व ‘बुद्धधर्म आणि संघ’, ‘श्री गुरुदत्तयोग’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
– संजय वझरेकर