फुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करीत असते. रक्तातील तांबडय़ा रक्तकणिकांमध्ये असणारे हे प्रथिन चार ग्लोब्युलीन प्रथिन-शृंखलांचे बनलेले असते. प्रत्येक शृंखलेत हिम नावाचे पोरफायरीन हे लोहयुक्त संयुग असते. या संयुगामुळेच रक्त लाल दिसते. हिम संयुगामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वहन शक्य होते. हिमोग्लोबिनमुळेच तांबडय़ा रक्तकणिका त्यांचा आकार टिकवून ठेवतात.

हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम/ डेसिलिटरमध्ये मापले जाते. एक डेसिलिटर म्हणजे १०० मिलिलिटर. प्रत्येक १०० मिलिलिटरमध्ये किती ग्रॅम हिमोग्लोबिन आहे यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना करण्यात येते. हिमोग्लोबिनचे प्रमाण वयाप्रमाणे, लिंगाप्रमाणे आणि आहाराच्या सवयीनुसार बदलते.

नुकत्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरात १७ ते २२, बालकांच्या शरीरात ११ ते १३, प्रौढ पुरुषांत १४ ते १८ तर प्रौढ स्त्रियांत १२ ते १६ ग्रॅम/ डेसिलिटर इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. मध्यमवयीन आणि वृद्धावस्थेत हे प्रमाण थोडेफार उतरते. विशेषत: भारतीय स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण नेहमीच कमी आढळते. कुपोषण, गरोदरपण, प्रसूती आणि पाळी येण्याच्या प्रक्रियेने हे प्रमाण घटलेले असते.

पर्वतीय प्रदेशांत राहणाऱ्या लोकांच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उंचावरती हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण विरळ असल्याने शरीराला आवश्यक तितका ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी या मंडळीत नसíगकरीत्याच हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त असते.

सतत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्येदेखील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले दिसून येते. ज्या वेळी रोग्याला काही कारणाने निर्जलीकरण होते, तेव्हाही शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. अर्थातच असे वाढीव प्रमाण फसवे असते; कारण धूम्रपान किंवा निर्जलीकरण या दोन्ही बाबी आरोग्यास केव्हाही हानीकारकच आहेत. फुप्फुसांच्या काही रोगांत तसेच काही प्रकारच्या अर्बुदांमुळे हिमोग्लोबिन वाढलेले दिसते. खेळाडूंनी जर उत्तेजक द्रव्ये प्राशन केली, तर त्यामुळेही अशा प्रकारचे बदल हिमिग्लोबिनच्या प्रमाणात होताना दिसतात.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे.

-डॉ. नंदिनी नेरुरकर- देशमुख,  मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत – आशापूर्णादेवी (१९७६) बंगाली

आशापूर्णादेवी या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पहिल्या लेखिका आहेत. ज्ञानपीठाचा १९७६ चा साहित्य पुरस्कार त्यांना त्यांच्या ‘प्रथम प्रतिश्रुती’ या बांगला कादंबरीसाठी प्रदान करण्यात आला. ही कादंबरी १९६० ते १९६९ या कालावधीत भारतीय भाषेत प्रकाशित सृजनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती म्हणून घोषित करण्यात आली आहे.

आशापूर्णादेवींनी बंगाली स्त्री जीवनाची खरीखुरी ओळख करून दिली आहे. मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातील स्त्रीच्या व्यथा, घुसमट, सुख-दु:खाचे जे प्रांजळ, प्रामाणिक सूर त्यांच्या कथा-कादंबऱ्यातून उमटले, त्यात स्त्रियांच्या समस्यांनाच प्राधान्य लाभलेले आहे. त्यांच्या साहित्यसर्जनाचा आदिम उद्गारच मुळी बालमनाला भंडावून सोडणाऱ्या अवहेलनेबद्दल बंड पुकारणारा होता, पण हा बंडखोरपणा वैचारिक होता.

एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात कलकत्ता येथे ८ जानेवारी १९०९ मध्ये आशापूर्णादेवींचा जन्म झाला. वडील हरेंद्रनाथ गुप्त हे चित्रकार होते. आईला वाचनाचे खूपच वेड होते. कर्मठ आजीच्या हट्टामुळे घरातील मुलींना शाळेत घातलं नसलं तरी अक्षरओळख करून दिली होती. त्यामुळे त्यांना फक्त बंगाली भाषाच अवगत होती. इंग्रजी वा इतरही भाषा त्या जाणत नव्हत्या. आईमुळे आशापूर्णादेवी आणि त्यांच्या बहिणींना वाचनाची गोडी लागली. बंकीमचंद्र चंटोपाध्याय हे त्यांचे आवडते लेखक होते. आईच्या वाचनवेडामुळेच त्यांना साहित्याची गोडी लागली. घरामध्ये कधी दांडगाई केली की, शिक्षा म्हणून उंच खिडकीच्या तक्तपोशीवर बसवलं जायचं, पण आशापूर्णादेवींना ही शिक्षा वाटायचीच नाही. कारण तिथे वर बसून निवांतपणे एखादं कवितेचं पुस्तक वाचायला मिळायचं. ही त्यांच्यासाठी फार मोठी पर्वणीच वाटायची.  मनमुराद वाचन, निरीक्षण या छंदातून त्यांच्या मनातील विचारांना शब्दरूप येत गेलं आणि त्या लिहीतच राहिल्या. वयाच्या १३ व्या वर्षी ‘देवी ओ मानवी’ नावाची कविता त्यांनी लिहिली. वयाच्या १५ व्या वर्षी आशापूर्णादेवींचा विवाह कृष्णनगरच्या कालिदासबाबू नाग यांच्याशी झाला.  अर्थात पतीची साथ मिळाली, म्हणूनच त्या पुढेही विपुल साहित्यनिर्मिती करू शकल्या.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com