विविध शिखर परिषदा भरविणारे शहर म्हणून स्वित्र्झलडमधील जिनेव्हा शहराची ख्याती आहे. स्वित्र्झलडमधील प्रमुख शहर असलेले जिनेव्हा, एक ग्लोबल सिटी म्हणूनही मान्यता पावलंय. लीग ऑफ नेशन्स, रेड क्रॉस, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांसारख्या २० जागतिक संघटनांची प्रमुख कार्यालये असलेल्या या शहराला त्यामुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय. सेल्टीक वंशाच्या अलोब्रोज या जमातीने सध्या जिनेव्हा शहराला लागून असलेल्या जिनेव्हा सरोवराच्या काठाशी इ.स.पूर्व १००० मध्ये वस्ती केल्याची नोंद आहे. इ.स.पूर्व १२२ मध्ये रोमन लोकांनी जिनेव्हावर कब्जा करून ते रोमन साम्राज्यात सामील केले. जिनेव्हाच्या मध्यवर्ती भौगोलिक स्थानामुळे मध्ययुगीन काळात इथे अनेक वेळा आक्रमणे आणि सत्तांतरे होत राहिली. ४०० साली जिनेव्हा ख्रिश्चनधर्मीय होऊन इथे बिशपची नियुक्ती झाली. १०३२ साली जिनेव्हा जर्मन साम्राज्याच्या नियंत्रणाखाली येईपर्यंत बग्रेडियन जमात, मेरोव्हिंजियन घराणे, कार्लोव्हिंजियन साम्राज्य यांच्या सत्तेखाली होते. पंधराव्या शतकात जिनेव्हामध्ये नियमित होणाऱ्या व्यापारी मेळाव्यांमुळे युरोपातील अनेक देशांच्या व्यापाऱ्यांचे इथे येणे-जाणे वाढले. जर्मनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रियातील आक्रमणांनंतर १५३५ साली जिनेव्हात प्रजासत्ताक राज्य स्थापन झाले तरीही दक्षिणेतील प्रबळ सॅव्हायच्या सरदाराचे आक्रमण आणि वर्चस्व कमी होत नव्हते. १६०२ मध्ये जिनेव्हा सॅव्हायच्या वर्चस्वातून मुक्त झाले. पुढे सतराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपात प्रोटेस्टंट ख्रिश्चन पंथविरोधी लाट उसळली, अनेक प्रोटेस्टंटना ठार मारले गेले. या काळात पूर्ण युरोपातून प्रोटेस्टंट निर्वासित जिनेव्हा आणि स्वित्र्झलडच्या इतर शहरांत आश्रयाला आले. जिनेव्हातील जॉन कॅल्व्हीन या नेत्याने या निर्वासितांसाठी उत्तम व्यवस्था केली. प्रोटेस्टंट पंथीयांची संख्या जिनेव्हात त्यामुळे एवढी वाढली की त्या शहराला ‘प्रोटेस्टंट रोम’ असे नाव पडले. या निर्वासितांनी जिनेव्हात घडय़ाळे बनविणे, दागिने बनविणे असे लहानसहान उद्योग सुरू केले. त्यातूनच आजचा स्विस घडय़ाळांचा मोठा उद्योग उभा राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

चायनीज एव्हरग्रीन

चायनीज एव्हरग्रीन म्हणजे शास्त्रीय भाषेत अ‍ॅग्लोनेमा कम्युटॅटम ही कमी प्रकाशात वाढणारी लहान वनस्पती आहे.

‘फायटोरेमेडिएशन’ म्हणजे वनस्पतीद्वारे प्रदूषण नियंत्रण करणे, हे आजचे प्रचलित शास्त्र आहे. घरातील प्रदूषण रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या कमी प्रकाशात वाढणाऱ्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. ‘अ‍ॅग्लोनेमा कम्यूटॅटम’ ही रुंद, जाड पानाची हिरवीगार वनस्पती आहे. या झुडपाचे देठ लहान असते, तर पानांचा पृष्ठभाग मोठा असतो. खोड आखूड असते. खोडाद्वारे पुनरुज्जीवन होते. हे झुडुप जवळजवळ एक मीटपर्यंत सहज वाढते. देखभाल कमी करावी लागते. यावर कीडही पडत नाही. घरातील प्रदूषण रोखण्यास ही अत्यंत प्रभावी आहे. बंद घरात लावण्यात येणाऱ्या डासांवरील उदबत्तीमधून येणारा धूर हा माणसाच्या आरोग्याला धोकादायक आहे. ही उदबत्ती आठ तास जळते. एका उदबत्तीच्या धुरातून होणारे प्रदूषण जवळजवळ ७५-१३७ सिगारेट्सच्या धुरातून येणाऱ्या प्रदूषकाएवढे असते. त्यामुळे श्वसनाचे आजार उद्भवतात. कधी कधी मेंदू, मज्जासंस्थेवरही परिणाम होतो.

डासांना पळवून लावणाऱ्या उदबत्तीच्या विषारी धुराचा वनस्पतींवर काही परिणाम होतो का? या संशोधनामध्ये अनेक प्रकारच्या, घरात वाढवता येणाऱ्या वनस्पती अभ्यासल्या गेल्या. त्यात ‘अ‍ॅग्लोनेमा कम्युटॅट्म’ ही वनस्पती अत्यंत प्रभावीपणे प्रदूषण शोषते असे सिद्ध झाले आहे. हे विषारी प्रदूषक शोषूनही ही वनस्पती निरोगी राहते, प्रदूषणाचे अंतर्बाह्य़ परिणाम या वनस्पतीवर दिसत नाहीत. जी.एल.सी. तंत्रज्ञानाद्वारे विषारी प्रदूषक या वनस्पतीने शोषले हेही सिद्ध झाले आहे. म्हणून घरातील प्रदूषणावर ही वनस्पती प्रभावी ठरू शकते.

संशोधनात असेही आढळले की, प्रत्येक ९ चौरस मीटर (१०० चौरस फूट) जागेत अशी २ ते ३ झाडे १५ ते २० सेमी (६ ते ८  इंच) परिघाच्या कुंडीत ठेवल्यास पुरेशी परिणामकारक ठरतात.

ही वनस्पती कमी प्रकाशात, सोप्या पद्धतीने, घरात वाढवता येते. या वनस्पतीची प्रदूषण रोखण्याची क्षमता बघता आपणही ही वनस्पती घरात लावावी.

डॉ. सीमा घाटे (पुणे)

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geneva city
First published on: 25-07-2016 at 03:34 IST