दुसऱ्या महायुद्धात जर्मन आघाडीने केलेल्या बॉम्बफेकीमुळे माल्टाचा आणि प्रामुख्याने राजधानी व्हॅलेटाचा मोठा विध्वंस झाला. माल्टी जनतेने ब्रिटिशांना युद्धातही चांगली मदत केली. पुढे युद्ध संपल्यानंतर १९५०, १९६० च्या दशकात ब्रिटिशांच्या अनेक वसाहती स्वतंत्र होऊ लागल्या आणि माल्टातही आपले स्वयंशासन असावे असे जनमत तयार होऊ लागले. माल्टी नेत्यांच्या ब्रिटिश सरकारशी वाटाघाटी होऊन ब्रिटिश पार्लमेंटने १९६४ साली माल्टा स्वातंत्र्य  कायदा मंजूर केला आणि २१ सप्टेंबर १९६४ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने माल्टाची ब्रिटिश वसाहत बरखास्त करून त्यांना स्वातंत्र्य दिल्याचे जाहीर केले. जॉर्ज ऑलिव्हर हे पंतप्रधानपदी नियुक्त होऊन राणी एलिझाबेथ द्वितीय ही माल्टाची औपचारिक राष्ट्रप्रमुख झाली. पुढे डिसेंबर १९७४ मध्ये माल्टामध्ये प्रजासत्ताक राजव्यवस्था येऊन निर्वाचित राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख झाला. १९७९ पर्यंत या नवदेशाची संरक्षण व्यवस्था ब्रिटनकडेच होती. १९८९ मध्ये माल्टात अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि सोव्हिएत नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्यात महत्त्वाची परिषद झाली, त्यात या दोन महासत्तांमध्ये अनेक  वर्षांपासून चाललेल्या शीतयुद्धाचा या परिषदेत शेवट झाला. माल्टा सध्या युरोपियन युनियनचा सदस्य आहे. राबर्ट एबेला हे प्रजासत्ताक माल्टाचे सध्याचे निर्वाचित पंतप्रधान आहेत.

सव्वा पाच लाख लोकवस्तीच्या या देशात नव्वद  टक्के लोकवस्ती ख्रिश्चन धर्मीय  आहे. ख्रिस्ती धर्माचा उगम झाल्यानंतर, पहिल्या दुसऱ्या शतकात माल्टात या धर्माचा प्रसार झाला. माल्टावर गेल्या दोन सहस्राकांमध्ये कार्थेजियन, रोमन, ग्रीक, अरब, फ्रेंच, ब्रिटिश सत्तांचा अंमल झाल्यामुळे या सर्व संस्कृतीच्या विविध पाऊलखुणा सध्याही दिसून येतात. चर्चची मोठी संख्या असलेल्या माल्टामध्ये इस्लामी स्थापत्याचा प्रभाव असलेल्या अनेक जुन्या इमारती आहे. माल्टाची स्थानिक भाषा माल्टीचे सिसिलियन, अरबी भाषांशी बरेच साम्य आहे. माल्टी ही तेथील प्रमुख राजभाषा आणि इंग्रजी ही दुय्यम भाषा असली तरी माल्टी जनतेत इटालियन भाषा प्रचलित आहे. माल्टाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, सुएझ कालव्याकडून येणाऱ्या जहाजांना इंधन भरण्याची व्यवस्था आणि चित्रपटांचे चित्रीकरण यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com