भारताच्या दृष्टीने कापसाखालोखाल महत्त्वाचा नैसर्गिक तंतू आहे ताग. या तंतूला सोनेरी तंतू म्हणण्याची दोन कारणे आहेत. एक त्याच्या अंगभूत स्वभावानुसार, त्याचा रंगच सोनेरी आहे. दुसरे कारण आहे, तागापासून मिळणारे आíथक उत्पन्न हे सोन्याइतके मूल्यवान आहे. तागाचे उत्पादन मुख्यत्वाने आशिया खंडातील देशातच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात जगातील एकूण ताग उत्पन्नाच्या ८०% उत्पादन भारतात होत होते. फाळणीनंतर पूर्व बंगाल पाकिस्तानात गेल्यामुळे हे प्रमाण खूपच घटले. गेल्या ५०-६० वर्षांत बंगालबरोबरच आसाम, ओरिसा, बिहार या पूर्वोत्तर राज्यांत ताग लागवड वाढल्याने हे प्रमाण थोडे वाढले त्यामुळे ते सध्या ४०% वर आले आहे.
तागाचे तंतू जाडेभरडे असतात. त्यांचा उपयोग अंगावर घालण्याच्या वस्त्रामध्ये कदाचितच होतो. मुख्यत्वेकरून इतर प्रकारच्या वस्त्रांकरिताच तागाचा उपयोग जास्त होतो.
सेवा देणारी वस्त्रे असे तागापासून बनलेली वस्त्रांचे वर्गीकरण करता येईल. या वस्त्रांची प्रमुख उदाहरणे म्हणजे- पोती, गोणपाटे, अस्तराचे कापड, लिनोलिअम, गालीच्यांकरिता आधारवस्त्र, जाडाभरडा धागा या वस्त्रांकरिता वापरतात. ताग हे पावसाळी पीक आहे. वर्षांतून एकदाच हे पीक घेता येते. तागाचे तंतू तागाच्या झाडाच्या खोडापासून मिळतात. तागाचे सोनेरी तंतू खोडापासून काढले जातात, तर कापसाचे तंतू बोंडांपासून काढले जातात.
हे तंतू खोडापासून वेगळे करण्याकरिता तागाची झाडे कुजवली जातात. ही कुजवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तंतू झाडापासून वेगळे होऊ शकतात. तंतूंला ग्राहकाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेल्या वस्त्रांसाठीचे गुणधर्म कुजवण्याची प्रक्रिया बहाल करते. या प्रक्रियेची सर्व परिमाणं जितकी जास्त काळजीपूर्वक जपता येतील तेवढे हे तंतू गुणवान निघतील. त्यांचे उपयुक्त गुणधर्म त्यांच्यापासून निघणाऱ्या धाग्यांमध्ये सकस उतरतील. तागाच्या पिकाला पाणी भरपूर लागते, त्यामुळेच गंगा नदीच्या खोऱ्यात तागाचे अधिकाधिक उत्पादन होते.
– प्रा. सुरेश द. महाजन, इचलकरंजी
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर – महादजी शिंदे : सेनानी आणि प्रशासक
शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्यानंतर मराठा साम्राज्यातील सर्वोत्तम युद्धकुशल सेनानी म्हणून महादजी िशदे ओळखले जातात. ब्रिटिश इतिहासकार महादजींचा उल्लेख ‘दि ग्रेट मराठा’ असा बहुमानाने करतात. पानिपतच्या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठा साम्राज्याला परत उभारी देण्याचे महत्त्वाचे कार्य महादजींनी केले.
स्वत युद्धकुशल असलेल्या महादजींनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बेनॉ डी बोईन या फ्रेंच युद्धतज्ञ आणि सेनानीस आपले सनिकी सल्लागार म्हणून नियुक्त केले. बेनॉने ग्वाल्हेर राज्याचे सन्य तत्कालीन युरोपियन पद्धतीने प्रशिक्षित करून नवीन, आधुनिक युद्ध सामुग्रीने सुस केले. त्यांनी आग्रा येथे तोफांचा कारखाना सुरू करून सात हजार बंदूकधाऱ्यांची वेगळी फौज तयार केली. उत्तर भारतातील सर्वाधिक प्रबळ राज्य म्हणून दरारा असलेल्या ग्वाल्हेरच्या फौजांनी प्रथम भरतपूरवर कब्जा करून अल्पावधीतच जोधपूर, जयपूर, घोलपूर या मोठय़ा राज्यांना मराठय़ांचे अधिपत्य मान्य करावयास भाग पाडले. महादजींनी मोगलांच्या अखत्यारीत असलेल्या मथुरेवर मराठय़ांचा अंमल सुरू करून तेथल्या अनेक मंदिरांचे जिर्णोद्धार केले.
महादजींनी मथुरा हे संस्कृतच्या अध्ययनाचे केंद्र व्हावे म्हणून तिथे संस्कृतच्या पंडितांना प्रोत्साहन देऊन अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या. ते स्वत हिंदी, संस्कृत, पार्शियन भाषा तज्ञ होते. स्वतच्या आणि राज्याच्या जमाखर्चाचे तपशील स्वत लिहिणारे महादजी शिंदे हे एकटेच भारतीय संस्थानिक होत.
मोगल बादशाह शाह आलम द्वितीय याने १७८४ साली महादजींना वकील-उल-मुतलक आणि अमीर-उल-उमरा हे बहुमानाचे किताब दिले होते. पुण्याजवळ वानवडी येथे विषमज्वरामुळे (टायफॉइड) महादजींचे निधन झाले. ते वर्ष होते इ. स. १७९४.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com