सतराव्या शतकात इटालीच्या इंड्रिआ सिसलपोनो (१५१९- १६०३), स्विस बोहीन बंधू (१५६०- १६२४), ब्रिटिश जॉन रे आणि ट्राँनफोर्ट यांचा वनस्पती वर्गीकरणात मोलाचा वाटा आहे. अठरावे शतक प्रामुख्याने कार्ल लिनिअस (१७०७-१७७८) यांचे ठरले. लिनिअस एका स्वीडिश धर्मगुरूचा मुलगा होता. लिनिअसला वर्गीकरण क्षेत्राचा जनक म्हणून संबोधले जाते. खरे तर वैद्यकशास्त्राचा अभ्यासक असूनही फार त्याने कमी काळ त्या क्षेत्रात काम केले, बाकी पुढचे संपूर्ण आयुष्य नॅचरल हिस्ट्री अभ्यासासाठी दिले. लिनिअसने सर्व प्रथम वनस्पतींच्या जननविशेषतेला परमोच्च महत्त्व दिले आणि लिंगभेदावर आधारित वर्गीकरण पद्धती सादर केली. त्यांनी फुलातील पुंकेसराची संख्या, एकत्रीकरण व उंची यावर आधारित चोवीस भागांत वनस्पतींचे वर्गीकरण केले. सर्व प्रथम लिनिअसने सातत्याने द्विमान पद्धतीचा वापर वनस्पतींच्या नामकरणासाठी केला आणि आजमितीस याच पद्धतीचा वापर वनस्पतीच्या नामकरणासाठी जगभर केला जात आहे. लिनिअसचे काम १७५३ मध्ये ‘स्पिसीज प्लॅट्म म्हणून प्रसिद्ध झाले. त्याच्या कामाची दखल आणि आठवण म्हणून ‘लिनियन सोसायटी ऑफ लंडन’ प्रस्थापित झाली आणि लिनिआ नावाची विज्ञान पत्रिका निघाली. लिनिअसचे वर्गीकरण क्षेत्रातील काम इतके मोठे आहे की, ते आजन्म विसरता येणार नाही.
नंतरच्या काळात नैसर्गिक बाबींवर आधारित वर्गीकरणाची पद्धत फ्रान्सच्या डी जेस्यू (१७४८-१८३६) आणि कुटुंबीयांनी मांडली. सारखे गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा संच एका ठिकाणी ठेवण्यात आला आणि म्हणून ही पद्धत नैसर्गिक वर्गीकरण म्हणून मान्य झाली.
डी जेस्यूचे समकालीन एक वनस्पती अभ्यासक कुटुंब म्हणजे डी केंडोल (१७४८-१८३६) यांच्याही वर्गीकरण पद्धतीने नैसर्गिक असल्याचा मान मिळविला.
सर्वात आधुनिक आणि मान्य नैसर्गिक वर्गीकरण पद्धत दोन ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जॉर्ज बेंथम (१८००-१८५४) आणि जोसेफ डॉल्टन हुकर (१८१७-१९००) यांनी मांडली. त्यांनी जगभरातल्या वनस्पती संग्रहालयातील वनस्पती नमुन्यांचा आधार घेत ‘जेनेरा प्लॅटरम’ या पुस्तकात मांडली. अजूनही अनेक देशांमध्ये त्यांची वर्गीकरण पद्धत त्याच्या व्यावहारिक मूल्यांमुळे सर्वोत्तम समजली जाते.
डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगराख्यान – अशीही पार्लमेंट!
लंडन शहर ही लोकशाहीची जननी, जन्मभूमी! युनायटेड किंगडमच्या लंडनमधील आदर्श पार्लमेंटमध्ये म्हणजे कायदे मंडळात कामकाज कसे चालते, हे अभ्यासण्यासाठी बऱ्याच देशांमधले राजकारणी, समीक्षक लोकांचा लंडनच्या पार्लमेंट हाऊसमध्ये नियमित राबता असतो.
पार्लमेंटचे कामकाज सुरू झाले तेव्हा- साधारणत: सोळाव्या-सतराव्या शतकात – तत्कालीन पार्लमेंटमधील दृश्य मोठे मनोरंजक होते. या जुन्या पार्लमेंटच्या प्रवेशदारीच प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च होते. त्यामुळे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रवेश करताना आणि तेथून परत जाताना प्रत्येक सदस्याने मान लववून अभिवादन करण्याचा प्रघात होता. ‘कॉमन्स’च्या बठकीला प्रारंभही प्रार्थनेने होई. काही वेळा पार्लमेंटचे सदस्य कामकाज चालू असताना आपल्या लहान मुलांनाही आणून आपल्याजवळ बसवीत. बिस्किटे, फळे आत आणून खाण्याची मुभा होती. त्यामुळे खाद्यपदार्थाचे तुकडे संसद भवनात जमिनीवर इतस्तत: विखुरलेले असत. साहजिकच उंदरांचे येणे-जाणे तिथे चालत असे. अर्थातच मांजरांचेही तिथे फावत असे! संत्री, मोसंबी विकणाऱ्या बायका पार्लमेंटच्या बाहेर आसपास फिरत असत. या फळविक्रेत्या, सभासदांच्या व्हरांडय़ातसुद्धा येत. त्यातली मेरी मर्लिन्स नावाची स्त्री विशेष देखणी होती. ती आली की, सभागृहातली चर्चा अर्धवट सोडून अनेक जण तिच्याशी बोलायला व्हरांडय़ात जमा होत. पार्लमेंटमध्ये अठराव्या शतकापर्यंत अशा भोंगळ पद्धतीने कामकाज चालत असे. ऑक्टोबर १८३४ मध्ये पार्लमेंटच्या इमारतीस आग लागली. आग विझवायला उशीर झाला, कारण सुरक्षा अधिकारी कादंबरी वाचनात दंग होता! बंबवाले, लष्कराला उशिरा निरोप मिळाला त्यामुळे आगीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. बंबवाले येण्यापूर्वी स्वत: पंतप्रधान मेलबोर्न, छपरावर चढून पाणी मारू लागले होते!
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of plants classification
First published on: 06-01-2016 at 01:50 IST