पहिल्या महायुद्धात जर्मनांशी लढण्यासाठी सत्ताधारी रशियनांनी कझाख लोकांना रशियन सैन्यात भरती होण्याचा आदेश काढला. त्यापूर्वी रशियन झार सरकारने अनेक कझाखांच्या जमिनी घेऊन त्यांना विस्थापित केल्यामुळे सर्वत्र असंतोष पसरला होताच आणि आता सैन्यभरतीमुळे रशियन अधिकाऱ्यांना सशस्त्र विरोध सुरू झाला. १९१६ च्या अखेरीस रशियन सैनिकांनी हा विरोध दडपण्यासाठी केलेल्या कारवाईत हजारो कझाख लोक मारले गेले, तर हजारो शेजारच्या चीन आणि मंगोलियात पळून गेले. हे प्रकरण १९२० पर्यंत चालले. पहिले महायुद्ध आणि रशियन क्रांती झाली आणि रशियन झार साम्राज्याचा अस्त झाला. यानंतर रशियात सत्तेवर आलेल्या बोल्शेविक कम्युनिस्ट पक्षाने १९२० च्या अखेरीस कझाखांच्या प्रदेशात कझाख अटोनॉमस सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लिक हे कम्युनिस्ट सरकार सत्तेवर आणले. पुढे हे कझाख प्रजासत्ताक सोव्हिएत युनियनचा एक घटक देश बनले. सोव्हिएत युनियनच्या घटक देशांमध्ये कझाकस्तान क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९२९ ते १९३४ या काळात सोव्हिएत युनियन प्रमुख जोसेफ स्टालीन याने कझाकस्तान, युक्रेन वगैरे सोव्हिएत देशांमध्ये सामूहिक शेती आणि औद्योगिकीकरण यांच्या धडक योजना अत्यंत निष्ठूरपणे राबविल्या. सामूहिक शेती योजना बहुतेक शेतकऱ्यांना नको असताना तिची सक्ती केली गेली. यामध्ये शेतकऱ्यांवर हलाखीची परिस्थिती ओढवली जाऊन उपासमार झाली. स्टालीनच्या या धोरणाविरोधात निदर्शने करीत शेतकऱ्यांनी स्वत:च्या गुरांची कत्तल करून ती खाल्ली. या काळात उपासमारीने आणि सरकारी दडपशाहीमुळे साधारणत: दहा लाख माणसे मृत्यू पावली आणि देशातील ८० टक्के पशुधनाची कत्तल केली गेली. ही घटना युरोपात ‘होलोडोमोर’ या नावाने ओळखली जाते. होलोडोमोर म्हणजे उपासमार करून मारणे. इतिहासकार याला मानवी दुष्काळ म्हणतात. ऑगस्ट १९३७ मध्ये स्टॉलीनने राजकीय विरोधकांचा खातमा करण्यासाठी त्यांना देशद्रोहाच्या आरोपात अडकवून विनाचौकशी तुरुंगात डांबण्याचे आदेश काढले. अशा हजारो ‘देशद्रोह्यांपैकी’ ३० हजार जणांचा तुरुंगात मृत्यू झाला. अनेक राजकीय नेत्यांच्या पत्नी व जवळच्या नातेवाईक स्त्रियांची रवानगी देशद्रोही म्हणून तुरुंगात झाली. अशा पद्धतीने तुरुंगवास घडलेल्या १८ हजार स्त्रियांचा तुरुंगवास १९५३ साली संपला. तुरुंगात त्यांच्यावर अत्याचार, बलात्कार झाले, सुटका झाली तेव्हा त्यापैकी १५०७ स्त्रिया गरोदर होत्या! – सुनीत पोतनीस

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holodomor human famine akp
First published on: 21-10-2021 at 00:10 IST