नत्रयुक्त रासायनिक खते उदा. युरिया, अमोनियम सल्फेट, नायट्रेट बऱ्याच प्रमाणात पाण्यात विरघळून वाहून किंवा झिरपून जातात. ती पिकांना संपूर्णपणे मिळत नाहीत. हे टाळण्यासाठी नत्र खताची मात्रा पिकांना विभागून देतात. शेतकऱ्यांना यासाठी मजुरीचा खर्च करावा लागतो. हीच खते एक-दोन ग्रॅम वजनाच्या गोळीच्या रूपात (सुपर ग्रॅन्यूल) पिकाच्या मुळाजवळील क्षेत्रात रोवून दिली असता ती पिकांना चांगली लागू पडतात. त्यांचा प्रवाही गुणधर्म कमी होतो. ऱ्हासामुळे होणारे नुकसान टळते. शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात बचत होते. भातपिकाची रोपणी झाल्यानंतर १० ते १५ दिवसांनी असे गोळी खत देता येते. गहू, ज्वारी, बाजरी पिके पेरणीनंतर १५ दिवसांची झाल्यावर त्यांना गोळी खत देता येते.
  नत्र खत युरियाच्या ब्रिकेट्स अथवा गोळ्या तयार करण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. यात खताच्या भुकटीवर दाब देऊन मोठी गोळी बनविली जाते. त्यासाठी विशिष्ट यंत्राची गरज भासते. युरिया खताबरोबर डी-एपी स्फुरद खत मिसळून ब्रिकेट्स बनविण्याचे ‘क्रांती ब्रिकेटर’ यंत्र डॉ. नारायण सावंत या शास्त्रज्ञाने विकसित केले. त्यात तयार होणाऱ्या गोळ्यांना ‘क्रांती ब्रिकेट्स’ नाव पडले. या यंत्राच्या साह्याने बनविलेल्या युरिया-डीएपी ब्रिकेट्सचे वजन २.५ ग्रॅम असते. ते दिल्यावर पिकांना लागणारे नत्र आणि स्फुरद अपेक्षित मात्रेत व वाढीच्या काळात पुरविले जाते.
    गोळीखत पिकांना देताना पाच ते सात सेंमी खोलीवर मातीत हाताने किंवा अवजाराच्या साह्याने टोबून (रोवून) दिले जाते. पिकांच्या दोन ओळींमध्ये त्याच्या मुळाच्या जवळपास त्याची टोबनी होईल याची काळजी घेतली जाते. ब्रिकेट्स देताना खोवल्या ठिकाणी मातीत छिद्र राहिले, तर ते हाताने त्यावर माती लोटून बंद केले जाते. गोळीपद्धतीचा खत देण्यासाठी वापर केला असता खतातील नत्र ऱ्हास पावत नाही. स्फुरदाची स्थिर होण्याची क्रिया कमी होऊन ते पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे पिकांच्या वाढीच्या पूर्ण काळापर्यंत एक-दोन महिने ही अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. खताच्या मात्रेत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
– डॉ. विठ्ठल चापके
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस :  डोळ्याचे विकार : भाग २  
माणसाच्या जन्मापासून डोळय़ाच्या विकारांच्या अनेक कथा ऐकत व वाचत आलेलो आहोत. महाभारतातील राजा धृतराष्ट्र व गांधारीची कथा प्रसिद्ध आहे.  प्रत्यक्षात तुम्हा आम्हाला पुढीलप्रमाणे लक्षणे होऊ लागल्यास आयुर्वेदशास्त्रदृष्टय़ा काय करावे न करावे हे सांगण्याचा अल्प प्रयत्न या लेखमालेत आहे.
१) डोळय़ांना लाली येणे, आत सिरा लाल होणे, उजेड सहन न होणे. २) डोळय़ांच्या कडांना बारीक मोहरीहून लहान फोड येणे, खाज सुटणे, पापणीचे केस गळणे, पू येणे.  ३) डोळय़ांच्या कडांशी डाळीच्या दाण्याएवढी किंवा थोडी लहान गाठ येणे, टोचणे, शौचास साफ न होणे. ४) डोळय़ांतून सतत किंवा थांबून थांबून पाणी येणे. डोळय़ाचे जास्त काम सहन न होणे. ५) डोळे चिकटणे, लाल होणे, संसर्गाने दुसऱ्या व्यक्तीला हाच त्रास होणे. ६) लांबचे न दिसणे, कमी दिसणे. ७) डोळय़ाच्या बुबुळावर पांढरे आवरण हळूहळू येणे, सारवल्यासारखे दिसणे, चष्म्याचा नंबर सारखा बदलणे, काही काळाने जवळची हाताची बोटेही न दिसणे. ८) डोळय़ाच्या बुबुळावर पांढरा ठिपका फुलासारखा येणे. दृष्टी अजिबात जाणे किंवा थोडी जाणे. ९) चष्म्याचा नंबर वाढणे. १०) डोळय़ात शुष्कता जाणवते. ११) डोळय़ांतून वारंवार चिपडे येणे. १२) अश्रूमार्ग बंद होणे. १३) डोळय़ांच्या खाली काळेपणा वाढणे.
नेत्रविकारांचे अचूक ज्ञान होण्याकरिता आता खूप श्रेष्ठ दर्जाची उपकरणे उपलब्ध आहेत. तरीही सामान्यपणे डोळय़ाच्या कडांची लाली, फोड, लहान गाठ, सिराजाल, बुबुळावरील पांढरे आवरण, तेजोहीनपणा, डोळा पाणीदार खोल निष्प्रभ, चंचलता, स्थिरता याचा अभ्यास करावा. डोळय़ास पित्तापासून की कफापासून त्रास होतो, उजेड सहन होतो का नाही, याची निश्चिती करून पित्त वा कफाला धरून उपचार ठरवता येतात. डोळय़ांकरिता बाहय़ोपचारार्थ तर्पण, स्त्रावण, पादपूरण, धावन, अंजन, बाहय़लेपन, नेत्रबस्ती करावे अन्यथा मूलभूत धातूंचा विचार करावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

How To Make Raw Banana Chivda
Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या
Five common eye infections you should be aware of this monsoon season
पावसाळ्यात डोळ्यांना होऊ शकतो ‘या’ ५ प्रकारचा संसर्ग? कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
How to protect your skin from common infections during monsoon Tips
पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या त्रास देऊ शकतात; ‘या’ उपायांनी मिळवा लगेच आराम
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
Monsoon foods: Which ones should you eat and which ones should you avoid
Monsoon foods : पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत? डॉक्टरांकडून घ्या जाणून….
how to take steam correctly
चेहऱ्यावर वाफ घेताना आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; नाहीतर डोळ्यांना होऊ शकते इजा! लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….

जे देखे रवी.. :     रिकामटेकडा
१९६० साली मी एमबीबीएस पास झालो आणि ज्याला इंटर्नशिप म्हणता तो काळ सुरू झाला. परीक्षेनंतर मी अकोल्यात गेलो. कारण वडील तेव्हा तिथे सिव्हिल सर्जन होते आणि मी पास झाल्याचे अकोल्यालाच कळले. अकोल्याला असताना माझ्या आयुष्यातल्या दोन अविस्मरणीय घटना घडल्या. एक म्हणजे गोव्यावर भारताने स्वारी केली आणि पोर्तुगीजांना हुसकावून लावले. त्याआधी तिथे समाजवादी मंडळींनी सत्याग्रह केला होता आणि त्यात माणसे मेली होती. समाजवादी मंडळी म्हणजे एक अव्यवहारी; परंतु निष्कलंक मनाची विरळा जात आहे. त्या काळात सुधा जोशी नावाच्या बाईसुद्धा त्या सत्याग्रहात होत्या. या सत्याग्रह करीत होत्या तेव्हा त्यांचे यजमान (पं. महादेवशास्त्री जोशी) भारतीय संस्कृती कोश नावाचा एक अद्वितीय ग्रंथ लिहीत होते. प्रत्येक मराठी माणसाने हा ग्रंथ वाचावा. असली माणसे असतात म्हणून देश तग धरून राहतो.
दुसरी घटना होती ती म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमधल्या शेवटच्या चेंडूवर बरोबरीत सुटलेला सामना. त्या काळी दूरदर्शन तर नव्हतेच, परंतु रेडिओ ऑस्ट्रेलियासुद्धा अस्पष्ट ऐकू येत असे, पण तो सामना मी कानात मन घालून ऐकला. वेस्ट इंडिजचा कर्णधार होता फ्रँक वॉरेल. तो वेस्ट इंडिजचा पहिला कृष्णवर्णीय कर्णधार. ही मालिका संपली तेव्हा त्या दोन्ही संघांची क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच जाहीर मिरवणूक काढण्यात आली होती. असो. सुटी संपवून मी मुंबईला परत आलो आणि पदवी मिळविण्याआधीची उमेदवारी सुरू केली. पुढे काय करायचे याची हुरहुर आणि प्रचंड कंटाळा या दोन अगदी विरोधी भावनांनी माझे मन त्या काळात बेचैन झाले होते. मी २२ वर्षांचा होतो. उत्साही होतो. मला भरपूर वेळ मिळाला; परंतु हा वेळ कसा कारणी लावता येईल याचे मार्गदर्शन करायला कोणी भेटलेच नाही.
आपल्या शिक्षण पद्धतीत हा एक मोठा दोष होता आणि आहेही. ते वर्ष निर्थक हमाली करण्यात वाया गेले. त्या वेळेला मी मनात एक खूणगाठ बांधली होती की, काहीतरी करीत बसायचे किंवा वाचायचे किंवा शोधत बसायचे. कंटाळा या शब्दाचा मूळ शब्द खंत असा आहे. मन कामात किंवा कशातही गुंतवून ठेवले तर ते खंत करीत नाही, असा एक साधा नियम आहे. या जगात खंत होण्याजोगे काहीही घडत नाही आणि जरी घडत असले तरी खंत करून बदलत नाही. ज्ञानेश्वर एक ओवी सांगतात की, तुमच्या मनात उमटलेले भाव हे परिस्थितीजन्य नसतात तर ते तुमच्या मनाच्याच उपाधी असतात. शेक्सपियरही तेच म्हणतो- ‘या जगात चांगले-वाईट काही नसते, तुम्ही ठरविता म्हणून ते तसे भासते.’
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत : २९  मार्च
१८७४ > मराठीतील आद्य लेखिकांपैकी काशीबाई शामराव हेर्लेकर यांचा जन्म. बडोदे येथील टीचर्स ट्रेनिंग स्कूल मध्ये मिस् मेरी भोर यांच्यासह शिक्षिकेचे काम करून बालवाङ्मय तसेच ‘संसारातील गोष्टी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले होते .
१९०५ > साहित्यसमीक्षक, संतवाङ्मयाचे  अभ्यासक आणि कवी पुरुषोत्तम मंगेश लाड यांचा जन्म. ‘आकाशवाणी’चे ते सचिव होते. मधुपर्क (काव्यसंग्रह),कृत्तिका, आकाशगंगा (लेखसंग्रह) तसेच तुकोबांच्या गाथेचे पुर्नसपादन ही त्यांची ग्रंथसंपदा.
१९२६ > विनोदी कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, प्रवासवर्णनकार पांडुरंग लक्ष्मण गाडगीळ ऊर्फ बाळ गाडगीळ यांचा जन्म. तब्बल ३० पुस्तके लिहिणाऱ्या गाडगीळ यांना १९६१ सालचा राज्य सरकारी वाङ्मय पुरस्कार (विनोदी लेखन) ‘लोटांगण’ या पहिल्याच कथासंग्रहासाठी विभागून मिळाला, तेव्हा सहविजेते होते पुलंचे ‘अपूर्वाई’! २०१० मध्ये त्यांचे निधन झाले.   
१९४८ > विद्यमान (२०१२-१३) साहित्य संमेलनाध्यक्ष नागनाथ बापूजीराव कोत्तापल्ले यांचा जन्म. दोन काव्यसंग्रह, तीन कथासंग्रह व तितकेच दीर्घकथासंग्रह, दोन कादंबऱ्या व समीक्षेची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली असून प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक आहे.
– संजय वझरेकर