सूक्ष्मजीवशास्त्र व हवामानशास्त्र या दोन शाखांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. हवामानातील प्रक्रिया व बदल यांमध्ये सूक्ष्मजीव अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच हवेचे घटक सूक्ष्मजीवांच्या निर्मिती आणि वाढीला कारणीभूत असतात. समुद्रातील प्लवकांचा मेघनिर्मितीवर परिणाम होतो. मेघ तयार होण्यासाठी पाणी आणि केंद्रक आवश्यक असते. पाण्याचे कण एकमेकांशी जोडले जाऊ शकत नाहीत. त्यांना आर्द्रताग्राही मेघसंक्षेपण केंद्रकांची आवश्यकता असते. केंद्रके हवेतील बाष्प आकर्षून घेतात व त्या बाष्पाचे घनरूप होऊन मेघनिर्मिती होते.
काही प्लवके त्यांच्या चयापचयाचा भाग म्हणून सूर्यप्रकाश शोषून डायमिथाइल सल्फाइड आणि आयसोप्रिन या वायूंचे उत्सर्जन करतात. वातावरणातील रासायनिक प्रक्रियेने या वायूंचे रूपांतर सूक्ष्मकणांमध्ये होते. हे सूक्ष्मकण (एरोसोल्स) मेघ तयार होण्यामध्ये संक्षेपण केंद्रकांची भूमिका बजावतात.
रोझिओबॅक्टर, एसएआर ११, सायक्रोबॅक्टर, कोक्कोलिथोफोर, डायटम आणि डायनोफ्लॅजिलेट ही प्लवके डायमिथाइल सल्फाइड या वायूचे उत्सर्जन करतात. बॅसिलस सटिलिस, रोडोबॅक्टरस्फिरॉइड, अर्थोबॅक्टर, नोकार्डिया आणि रोडोकॉक्कस ही प्लवके आयसोप्रिन या वायूचे उत्सर्जन करतात. दुसरा प्रकार म्हणजे काही प्लवके सेंद्रिय पदार्थांचे उत्सर्जन करतात जे समुद्राच्या पृष्ठभागावर फेसाच्या स्वरूपात जमा होऊन समुद्राच्या लाटांमुळे घुसळून त्यांचे मृतकण हवेत शिरतात. हे कणही मेघनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरतात. या दोन्ही प्रक्रियांमुळे मेघनिर्मितीमध्ये लक्षणीय वाढ होते असे आढळून आले आहे. प्लवकांमुळे जे सूक्ष्मकण तयार होतात ते मेघसंक्षेपण केंद्रक म्हणून काम करतात. सूर्यप्रकाश, तापमान आणि पोषकद्रव्ये हे आवश्यक असणारे घटक योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यास प्लवकांची वाढ चांगली होते. अनेक महासागरांमधील प्लवके डायमिथाइल सल्फाइड व आयसोप्रिन वायूंचे उत्सर्जन करतात. पण त्यांचे प्रमाण प्रत्येक महासागरात वेगळे असते. डायमिथाइल सल्फाइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण अतिथंड विशेषत: उत्तर गोलार्धातील आर्क्टिक व युरोप खंडातील उत्तर महासागरामध्ये जास्त प्रमाणात असते. आयसोप्रिन वायूचे उत्सर्जन उबदार असणाऱ्या दक्षिण गोलार्धातील अटलांटिक आणि उत्तर अंटार्क्टिक या महासागरात जास्त होते.
प्लवकांनी निर्माण केलेल्या मेघसंक्षेपण केंद्रकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मेघांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. इतर काही सूक्ष्मजीवही वातावरणात मिसळून ते मेघांचे केंद्रक बनतात. या सर्वांचा परिणाम म्हणून मेघांनी परावर्तित केलेल्या सूर्यकिरणांचे प्रमाण वाढते आणि सूर्याच्या उष्णतेचे पृथ्वीवरील शोषण कमी होते. याचा स्थानिक व जागतिक स्तरावरील तापमान, पर्यावरण आणि पर्जन्य यांच्यावर परिणाम होतो.
अनघा शिराळकर मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org