भाषासूत्र : सर्वनामांच्या योजनेतूनही अर्थ बदलू शकतो..

सुहासची आई त्याची वाटच पाहत होती.’ या वाक्यावरून ‘तो आपल्या घरी गेला’ असेच निश्चितपणे म्हणायचे आहे.

भाषासूत्र : सर्वनामांच्या योजनेतूनही अर्थ बदलू शकतो..
प्रतिनिधिक छायाचित्र

यास्मिन शेख

‘सुहास आपल्या मित्राबरोबर बराच वेळ गप्पा मारत होता. त्यानंतर सुहास त्याच्या घरी गेला. सुहासची आई त्याची वाटच पाहत होती.’

या वाक्यांत ‘सुहास त्याच्या घरी गेला.’ या वाक्यात ‘त्याच्या  घरी गेला’ या वाक्यरचनेत अधोरेखित शब्दाच्या अर्थामध्ये थोडा गोंधळ जाणवतो. सुहास ‘त्याच्या’ म्हणजे ‘मित्राच्या घरी गेला’ असा अर्थ होईल; पण तो मित्राच्या घरी गेला नसून स्वत:च्या घरी गेला किंवा सुहास आपल्या घरी गेला, असे या वाक्यात सांगायचे आहे. ‘सुहासची आई त्याची वाटच पाहत होती.’ या वाक्यावरून ‘तो आपल्या घरी गेला’ असेच निश्चितपणे म्हणायचे आहे. मात्र ‘त्याच्या घरी गेला’ याचा अर्थ ज्याच्याशी तो गप्पा मारत होता, त्या मित्राच्या घरी तो गेला, असा चुकीचा अर्थ या वाक्यरचनेतून ध्वनित होतो. वाक्यात काही शब्दांची योजना चुकीची झाली, तर अर्थ समजण्यास कठीण जाते, याचे भान भाषेचा उपयोग करणाऱ्यांनी अवश्य ठेवले पाहिजे.

आणखी एक वाक्य लोकांच्या तोंडी अलीकडे ऐकू आले. ते वाक्य-

‘मीना आणि उषा या मैत्रिणी आहेत. मीना तिच्या नवऱ्याशी हुज्जत घालते, हे उषाच्या अलीकडेच लक्षात आले.’ या वाक्यात ‘मीना तिच्या नवऱ्याशी हुज्जत घालते’ या वाक्याचा अर्थ ‘मीना उषाच्या नवऱ्याशी हुज्जत घालते’ असा होईल. ‘मीना आपल्या स्वत:च्या..’ असे वाक्य अर्थाच्या दृष्टीने अधिक योग्य होईल.

अक्षरांत की अक्षरान्त?

तज्ज्ञांच्या समितीने ठरवलेल्या शासनमान्य नियमांत अनुस्वार शब्दातील कोणत्या अक्षरावर द्यावेत किंवा देऊ नयेत या संदर्भात ‘नियम १’ असा आहे- ‘स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल  शीर्षिबदू द्यावा.’

या नियमाला काही शब्दांचे अपवाद आहेत- उदाहरणार्थ- सुखांत (अनेक सुखांमध्ये)- सुखान्त (ज्याचा शेवट सुखपूर्ण आहे असे)

तसेच

दुखांत – दु:खान्त,

देहांत – देहान्त (शिक्षा),

स्वरांत – स्वरान्त (ज्याच्या शेवटी स्वर आहे असा शब्द)

व्यजनांत – व्यजनान्त (ज्याच्या शेवटी व्यंजन आहे असा शब्द) शालांत  (अनेक शालां(/ळां)त) – शालान्त  (शाळेतील शेवटची परीक्षा)

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to make sentences in marathi useful phrases in marathi zws

Next Story
कुतूहल : गारांचा पाऊस
फोटो गॅलरी