आनंदी असायचं की नाही हा आपली स्वत:ची निवड असू शकते. आनंदी राहणं म्हणजे नक्की काय असतं? मेंदू भावना निर्माण करतो. त्या भावनेत राहायचं की नाही हेही मेंदूच ठरवतो. असं असलं तरी माणूस सातही दिवस, २४ तास आनंदी असू शकत नाही. म्हणून आपल्या भावनांना नाव देणं, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बघू या आपल्या काही भावना आणि त्यासाठी असलेले शब्द. भावना योग्य शब्दात पकडता यायला हवी. म्हणजे मेंदूतली रसायनं संतुलित आहेत का हे समजू शकतं. या पुढची पायरी म्हणजे जर संतुलित नसतील तर ती स्वत:हून संतुलित करता येतील. मेंदूतली  रसायनं समस्थितीत राहायला हवीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– आनंद या मन:स्थितीसाठी काही शब्द :  समाधानी, खूश, मस्त, मजेत, गंमतीत, तृप्त, उत्साही, खेळकर, सर्जनशील, आशादायक इ.

– दु:ख या मन:स्थितीसाठी काही शब्द : एकाकी, निराश, अस्वस्थ, दुखावलेला, दुर्लक्षित, चिंतातुर इ.

– राग या मन:स्थितीसाठी काही शब्द : अपमानित, असुरक्षित, तिरस्कार, टीका सहन करणारा, जाणीवपूर्वक दुर्लक्षित.

आपली मन:स्थिती आत्ता कशी आहे, हे शोधण्यासाठी हे काही शब्द. हे शब्द सापडले तर असं का वाटतं आहे याच्या मुळाशी जाता येईल. ते जमलं तर लक्षात येईल की याच्या मागे निश्चितपणे कोणती तरी घटना आहे. झालेली घटना बदलू शकत नाही. पण होणारे प्रसंग टाळता येतील. यासाठी मन:स्थिती शोधणं आणि ती बदलणं हे महत्त्वाचं.

आपण आपल्या भावना नेमकेपणाने ओळखत नाही, म्हणून त्या बदलत नाहीत, त्याऐवजी आपण भावना थोपवतो. दाबतो. मनात कोंडून ठेवतो. का? तर आपल्या आसपासच्या लोकांना नेहमीच थोपवलेल्या भावना हव्या असतात. आणि आपण ते बरोबर शिकतो. इतरांनाही शिकवतो. भावना वेडय़ावाकडय़ा मार्गाने बाहेर पडायला नकोत, हे बरोबर. पण मेंदूच्या भाषेत भावना या रसायनांच्या स्वरूपात असतात. त्या दाबल्या तर शरीरावर विविध बरेवाईट परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत.

– श्रुती पानसे

contact@shrutipanse.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human brain
First published on: 07-06-2019 at 01:59 IST