श्रुती पानसे contact@shrutipanse.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागेपणी आपला मेंदू अनेक कामांत गुंतलेला असतो. आपण सतत काहीतरी बघत असतो, ऐकत असतो, निरनिराळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूवर सतत नवनवीन माहिती आदळत असते. त्यामुळे ही माहिती आतमधे नीट झिरपावी यासाठी फारसा वेळ होत नाही. आणि म्हणून हे काम तो रात्रीच्या शांत वेळी करायला घेतो.

जेव्हा आपण अगदी गाढ झोपेत जातो, तेव्हा मेंदू दिवसभरात साचलेल्या गोष्टींची वर्गवारी करायला घेतो. जो अनुभव पुढील काळासाठी आवश्यक आहे, तो शॉर्ट टर्म मेमरीमध्ये पाठवला जातो. तिथून तो लाँग टर्म मेमरीमध्ये जातो. गाढ झोपेत हिप्पोकॅम्पस हे स्मरणकेंद्राचं काम चालू असताना डॉ. जोनाथन विन्सन या मेंदूशास्त्रज्ञाला आढळलं. दिवसभरातला जो अनुभव पुढे कधीही गरजेचा नाही तो डिलीट केला जातो.

अनेकदा दिवसभरात घडलेल्या घटनांवर आधारित स्वप्नं आपल्याला पडतात. आपण जसं टेपवरचं एखादं गाणं पुन्हा ऐकावंसं वाटलं की ‘रीप्ले’ करायचो, तसाच आपला मेंदू या घटना रीप्ले करत असतो. म्हणूनच दिवसभरात घडलेली एखादी घटना आपल्याला पुन्हा स्वप्नात दिसते.

या संशोधनातून असं दिसतं की एखादी गोष्ट दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या कामात आपल्याला आपली झोप मदत करते. गाढ आणि पुरेशी झोप. पूर्ण झोप झाली नाही, तर दुसऱ्या दिवशी कामात/ अभ्यासात लक्ष लागत नाही, चिडचिड होते. कारण मेंदूचं वर्गवारी करण्याचं काम अपुरं राहिलेलं असतं.

झोप या विषयावरच्या अजून एका प्रयोगात एका गटाला एक विषय एक दिवस शिकवला आणि तो किती लक्षात राहिला आहे हे तपासलं. दुसऱ्या गटाला तोच विषय अर्धा- अर्धा करून दोन दिवसात शिकवला. किती लक्षात राहिला आहे हे तपासलं. तर दुसऱ्या गटाचा अभ्यास जास्त चांगला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. याचं कारण एक विषय दोन दिवसात शिकवला तेव्हा रात्रीच्या झोपेच्या काळात शिकवलेल्या विषयावर मेंदूने प्रक्रिया केली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विषय चांगल्या प्रकारे शिकता आला. या संशोधनाचा वापर शिक्षक/ पालकांना होऊ शकतो. तसंच स्व-आकलन तपासण्यासाठीही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही.

 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human brain function brain works psychology zws
First published on: 28-06-2019 at 00:07 IST