दोन-तीन वर्षांपूर्वी माझ्या स्वभावाप्रमाणे उतारवयातही मी एक जरा अतिरेकी प्रयोग केला. त्यात माझ्या मुंबईच्या व्यवसायावर थोडंफार पाणी सोडून एका ग्रामीण, पण अत्याधुनिक रुग्णालयात महिन्यातले १५ दिवस सेवा देण्याचा प्रयत्न केला. परिसर रम्य आणि नीटनेटका होता. अगदी लहान-लहान वस्त्यांमध्येही बाहेर एका गोऱ्यापान निळे डोळे असलेल्या बाईचे छायाचित्र झोपडीवजा घरावर लावलेले दिसे आणि वर मराठीत पाटी असे ‘ब्यूटी पार्लर’. इथल्या एका बाईशी मी बोललो. तिने याचा अर्धाकच्चा तथाकथित कोर्स जवळच्या तालुक्याच्या गावी केला होता. मला म्हणाली, भरपूर मागणी आहे. एका बाईला मढविण्याचे २५ रुपये घेते. तेवढीच घरात मदत होते.
हल्ली कोपऱ्या-कोपऱ्यावर ब्युटी पार्लर्स निघाली आहेत. भारतात आर्थिक उदारीकरण आल्यावर जर कोणी आपल्या तुंबडय़ा ओतप्रोत भरल्या असतील तर या सौंदर्य प्रसाधक निर्मात्यांनी आणि विक्रेत्यांनी. जर आपण गेल्या दहा-वीस वर्षांचा इतिहास बघितला तर उदारीकरणाच्या पहिल्या पाच वर्षांत भारतातल्या अर्धा डझन स्त्रियांनी विश्व किंवा तत्सम सुंदरींचे किताब पटकाविले. याच्या मागे या प्रसाधनांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हात होता, अशी वदंता आहे. एखादे धरण फुटावे तसे हे लोण पसरले आणि डोंबिवली आणि पाल्र्याच्या मुलीदेखील हायहिल्स घालून, लचकत चालत सौंदर्य स्पर्धामधून झळकू लागल्या. हल्ली जो तो सुंदर होऊ पाहतो आहे. त्यात पुरुषांची संख्या कमी असली तरी नगण्य नाही.
 सगळ्यांना चरबी स्वस्तात काढून मिळत असेल तर हवी आहे. सुरकुत्या नको आहेत. टक्कल पडले तर नरकवास मिळाल्याची शिक्षा समजतात. शरीरावर कोठेही जिथे नको तिथे एक जरी केस उगवला तरी साप डसल्यासारखी आपत्ती ओढवली असे वाटते. कोणाला स्तन मोठे हवे आहेत. काहींना लहान करून हवे आहेत. कोणाला कृत्रिम खळी पाडून घ्यायची आहे. ज्यांना थोडेफार मुरुमाचे व्रण आहेत त्यांना इस्त्री करून हवी असते. मेकअपचे तर काही विचारूच नका. वधू इतकी नटते की, ती स्वत: कुठे दिसतच नाही आणि जेव्हा उगवते तेव्हा एक-दीड तास उशिरा येते.
हा देश स्वतंत्र आहे आणि बायकांविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची हल्ली सोय नाही. माझी तरी नाही आणि वर मी पडलो प्लास्टिक सर्जन. असे लिहिणे म्हणजे स्वत:च्या पोटावर पायच, पण या भानगडीतले काही अशोभनीय किस्से  येत्या सोमवारच्या लेखात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुतूहल- कलम का व कसे?
कलम म्हणजे एका चांगल्या जातीच्या झाडाच्या फांदीचा दुसऱ्या कणखर जातीच्या फांदीशी केलेला मिलाप. हे वाचायला जेवढं सोपं वाटतं, तेवढं सोपं नाही. ही एक प्रकारची शल्यक्रियाच आहे. आंब्याच्या बाबतीत, हापूससारख्या जातिवंत आंब्याच्या फांदीच्या सालीला व्यवस्थित काप देऊन कोयीपासून केलेल्या (म्हणजे रायवळ) रोपांवर तसाच काप देऊन दोन्ही फांद्या घट्ट बांधतात. फांद्या एकजीव झाल्यावर सांध्याच्या वरची रोपाची फांदी कापून टाकतात. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कलमात मूळचा भाग हा रायवळचा तर कलमाच्या वर वाढणारे झाड त्या विशिष्ट जातीचे असते.
अशाच प्रकारची कलमक्रिया गुलाबासारख्या फुलझाडांवरही केली जाते. फरक एवढाच की, येथे संपूर्ण फांदी जोडण्याऐवजी आपल्याला हव्या त्या गुलाबाच्या जातीचा पानामागे दडलेला एक डोळा म्हणजे अंकुर सालीसकट काढून तो जंगली गुलाबाच्या कुंडीत लावलेल्या रोपावर एक खाच पाडून बांधला जातो. थोडक्यात, त्या रोपाने एखादं दत्तक मूल वाढविण्यासारखाच हा प्रकार असतो. हे सव्यापसव्य करण्यामागे कारण काय?
आंब्याचं फळ जेव्हा तयार होतं, तेव्हा परागणाची क्रिया ही नसíगकरीत्या कुठल्याही परागांनी होत असल्यामुळे आतील कोय ही १०० टक्के त्याच जातीची असेल अशी शाश्वती नसते. मात्र आपण जेव्हा हापूसची फांदी कलमासाठी वापरतो (लैंगिक पुनरुत्पादन) तेव्हा ती मूळ जातीचे सर्व गुण घेऊनच वाढते व आपल्याला हवी त्याच जातीची फळं मिळतात.
गुलाबाच्या बाबतीत ते झुडूप असल्यामुळे जरा जून फांदी रोवून केलेल्या झाडाची एकंदर रोगप्रतिकारकशक्ती व प्रतिकूल वातावरणात तग धरण्याची क्षमता कमी असते. म्हणून त्यांचं कलम करण्यासाठी काही देशी गुलाबाच्या जातींचा वापर केला जातो. इतर काही फळझाडांच्या पुनरुत्पादनासाठीही कलमाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, चिकूचे कलम खिरणीवर, संत्र्याचे जांबोरी किंवा रंगपूर लाइमवर, बोराचे देशी बोरावर. शोभेच्या फुलझाडांत गुलाबाव्यतिरिक्त हवाई जास्वंद, सोनचाफा, रंगीत निवडुंग इत्यादी झाडांचेही कलम करतात. कधी कधी हे दत्तकविधान रोपाने नाकारले, तर न फुलणारा गुलाब वाढतो, चिकूचे कलम मृत होऊन खिरणीचेच झाड वाढते.
– डॉ. विद्याधर ओगले    मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will be beautiful
First published on: 16-03-2013 at 12:02 IST