कुतूहल : बंदीग्रस्त गणित पुस्तके

आजही मुग्ध करणारी ‘एलिस इन वंडरलँड’ ही कादंबरी १८६५ साली प्रसिद्ध झाली.

शिक्षणात पुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु काही पुस्तकांना बंदिवास भोगावा लागतो. कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांच्या नवीन गणिती-वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या पुस्तकांवरील बंदी १७४३ मध्ये उठवली गेली तरी अशा पुस्तकांचे नष्टचर्य संपले नाही. आधुनिक काळातही राजकीय, धार्मिक, सामाजिक कारणांमुळे सार्वजनिक वितरणासाठी वादग्रस्त पुस्तकांवर (काही काळ तरी) बंदी घालावी हे जवळपास सर्व देशांत मान्य आहे. विशेष कायदेही त्यासाठी आहेत. अशा पुस्तकांच्या सूची वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या असून अमूर्त गणित विषयही त्याला अपवाद नाही!

आजही मुग्ध करणारी ‘एलिस इन वंडरलँड’ ही कादंबरी १८६५ साली प्रसिद्ध झाली. तिचे खरे लेखक होते गणिती चार्ल्स डॉजसन; पण त्यांनी ल्युईस कॅरोल हे टोपणनाव वापरले होते. गणिती तर्कशास्त्राचा मजेशीर वेगळा वापर, रंजक वाक्यरचना यामुळे ते पुस्तक लोकप्रिय ठरले. मात्र १९३१ साली चीनमधील हुआन प्रांतात त्यावर बंदी घातली गेली. पुस्तकात विविध प्राणी आणि पक्षी माणसासारखे बोलत असल्याने माणसाचा दर्जा कमी झाला हे त्याचे कारण दिले गेले. आपल्या देशात १९१०च्या सुमारास ज. वि. ओक आणि रा. द. देसाई यांचे बीजगणितावरील सहलिखित पाठय़पुस्तक तत्कालीन इंग्रज सरकारने आक्षेपार्ह मानून त्यावर बंदी घातली. त्यात बीजगणिती क्रिया विशद करणारी उदाहरणे विद्यार्थ्यांत राष्ट्रीय तत्त्वाचे संस्कार बिंबवणारी आहेत असा मुख्य आरोप होता. मात्र रँग्लरर. पु. परांजपे यांनी १९१६ साली ते आरोप चुकीचे आहेत हे मुंबई कायदेमंडळाच्या (तत्कालीन विधिमंडळ) पुढे मुद्देसूदपणे मांडून ती बंदी मागे घेण्यास सरकारला भाग पाडले.

जर्मनीमध्ये रिचर्ड कुराण्ट आणि डेव्हिड हिल्बर्ट यांच्या ‘गणिताचा भौतिकशास्त्रात उपयोग’ या मूळ जर्मन भाषेत प्रसिद्ध झालेल्या (१९२४) पुस्तकाच्या पहिल्या खंडाच्या मुद्रणावर १९३३मध्ये नाझी पक्षाच्या सरकारने बंदी आणली, कारण कुराण्ट हे ज्यू वंशाचे आणि विरोधी पक्षाच्या विचारसरणीचे समर्थक होते. गंमत म्हणजे त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केल्यावर त्या पुस्तकाचा दुसरा खंड १९३७ साली नाझी राजवट असतानाही जर्मनीमध्ये प्रसिद्ध करण्यास मुभा मिळाली, कारण आता ते जर्मन ज्यू नसून अमेरिकन ज्यू होते! अलीकडेच ‘लहान मुलांसाठी गणित’ या मालिकेतील एक पुस्तक एका देशात बाद केले गेले, कारण त्यात बेरीज-वजाबाकी क्रिया दाखवणारी चित्रे धार्मिक भावना दुखावणारी मानली गेली. यावरून लक्षात येते, गणित हा विषय निरपेक्ष, तटस्थ असला तरी त्याचा निर्माणकर्ता, वापरकर्ता आणि नियंत्रणकर्ता मानव असल्याने, गणितावरील पुस्तकेही बंदीच्या सावटापासून दूर राहू शकत नाहीत! भविष्यात पूर्णपणे संगणकाने किंवा यंत्रमानवाने निर्माण केलेली पुस्तके याला अपवाद ठरतील का? – डॉ. विवेक पाटकर  मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Importance of books in education in mathematics scientific approach ban on books akp

ताज्या बातम्या