‘वन्यजीवांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यांच्या शाश्वत जीवनासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न करणे’ या ध्येयासाठी १९८२ साली ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (भारतीय वन्यजीव संस्थान) ही संस्था स्थापन झाली. त्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या वनांचे-जंगलांचे संवर्धन, तेथील जीविधतेची (जैवविविधतेची) जपणूक आणि ते करत असतानाच तिथे वास्तव्य करणाऱ्या आदिवासी/ वनवासींचेही हित जपणे, हीदेखील या संस्थेची उद्दिष्टे आहेत.
डेहराडून येथे स्थापन झालेली भारतीय वन्यजीव संस्था ही भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झालेली संस्था आहे. वन्यजीव संरक्षण-संवर्धन आणि व्यवस्थापन या विषयांत प्रशिक्षण, अभ्यासक्रम आणि मार्गदर्शन या संस्थेतून मुख्यत्वे मिळते. या सर्व प्रयत्नांसाठी संस्थेचे वन्यजीव विज्ञान, वन्यजीव व्यवस्थापन, नष्टप्राय होणाऱ्या प्रजातींचे व्यवस्थापन, वारसास्थळांचे संवर्धन व व्यवस्थापन, वन्यजीव न्यायवैद्यकशास्त्र आणि निसर्गसंवर्धन अशा विविध विषयांवर संस्थेने अभ्यासक्रम आखले आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारला त्यांच्या क्षेत्रातील वन्यजीव संरक्षण/ संवर्धन धोरण ठरविण्यासाठी त्या विषयातील इत्थंभूत महिती, तांत्रिक मार्गदर्शन करण्याचेही महत्त्वाचे कार्य ही संस्था करते. संपूर्ण देशभरात संस्थेचे संवर्धन प्रकल्प सुरू आहेत.
ही संस्था भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या अख्यत्यारीतील एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेतर्फे जीविधता, नष्टप्राय होणाऱ्या प्रजाती, वन्यजीव धोरण, वन्यजीव न्यायवैद्यक, अधिवास, परिसंस्था आणि वातावरण बदल अशा अनेकविध विषांवर संशोधन केले जाते. व्ही. बी. सहारिया हे या संस्थेचे संस्थापक संचालक तर हेमेंद्रसिंग पनवर हे पहिले संचालक होते. सध्या डॉ. जी.एस. रावत हे संचालक आहेत.
डेहराडूनच्या दक्षिणेकडील जंगलाजवळ असलेल्या चंद्रबनी येथे १८० एकरांवर ही संस्था उभी असून वन्यजीव संसाधनाविषयी वैज्ञानिक माहितीस्रोत निर्माण करणे, प्रशिक्षित व्यक्ती तयार करणे, वन्यजीव व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा विकास करून संशोधन करणे, अशा प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रक्रियेत येणारे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ती माहिती आणि मार्गदर्शन करणे, या सर्व कार्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांची मदत/सहकार्य घेणे आणि या विषयात आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे क्षेत्रीय केंद्र होण्याचा प्रयत्न करणे हीदेखील या संस्थेची कृतिशील उद्दिष्टे आहेत.
– कविता वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org