सूर्यमालेतील पृथ्वी हा एकच असा उपग्रह आहे की ज्याच्यावर जीवावरण आहे. वनस्पती या जीवावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतात आढळणारे हवामान, पर्जन्य आणि मृदा प्रकारांमधील भिन्नता लक्षणीय आहे. राजस्थानच्या वाळवंटापासून पूर्व भारतातील अतिपर्जन्य असलेला भूभाग, त्याचप्रमाणे हिमालयातील थंड हवामान ते दक्षिण भारतातील दमट उष्ण हवामान, हे सर्व प्राकृतिकरीत्या जुळून आल्याने भारत वनस्पतींच्या जैवविविधतेत संपन्न झाला आहे. भारतातील वनसंपदेत जवळजवळ ४५००० प्रजाती आहेत. ही संख्या जागतिक वनसंपदेच्या १० टक्के आहे. सपुष्प वनस्पतींच्या १५००० प्रजाती आहेत. जगाच्या तुलनेत हे प्रमाण १६ टक्के आहे. त्यापकी १/३ वनस्पती मूळच्या भारतातील आहेत.
वनसंपदा म्हणजे प्राकृतिकरीत्या आढळणारी संपदा. हिमालयात होणारे सूचिपर्णी वृक्ष किमती लाकूड म्हणून ओळखले जातात. त्यातील ‘टॅक्सस बक्काटा’ वृक्ष कर्करोगाच्या निदानासाठी वापरला जातो. ‘रोडोड्रेडॉन’ वृक्ष त्याच्या फुलाच्या सौंदर्यासाठी वाखाणले जातात. त्याचप्रमाणे संपूर्ण प्रदेश रोपटी, झुडपे, वेली आणि वृक्षांपासून मिळणाऱ्या औषधी वनस्पतींचे भांडार म्हणून ओळखला जातो. हिमालयाच्या पायथ्याजवळील उत्तर भारतातील साल वृक्षाचे लाकूड बहुपयोगी आहे.
मोठय़ा प्रमाणात पर्जन्य लाभलेला भारताचा पूर्व भाग तेथील घनदाट सदाहरित वनांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील ऑíकडची फुलं संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. घटपर्णी ही वनस्पती नसíगकरीत्या भारतात फक्त मेघालयात सापडते. राजस्थानातील वाळवंटी प्रदेशात प्राधान्याने खुरटय़ा काटेरी वनस्पती आहेत. मध्य भारत हा मुख्यत: पानगळीच्या वृक्षांचा प्रदेश आहे. हा प्रदेश आवळा, अर्जुन, ऐन, व मोह ह्य़ा वृक्षांनी व्यापलेला आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता जगप्रसिद्ध आहे.
भारताला ७०० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भौगोलिक परिस्थितीचा समुद्रातील जैवविविधतेवर अतिशय अनुकूल परिणाम झालेला आहे. भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक ठिकाणी तिवरांचे जंगल आहे. या जंगलांपकी सुंदरबन, भित्तरकनिका, पिछावरम आणि कोकण हे प्रदेश विशेष उल्लेखनीय आहेत. किनाऱ्याजवळील समुद्री जीवांच्या बाल्यावस्थेत संगोपन होण्यास तिवरांचे जंगल उपयुक्त असते. त्याचप्रमाणे किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी या जंगलाचा उपयोग होतो.
– डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगराख्यान : सोमवार फाशीचा!
लंडनमध्ये मध्ययुगीन काळात अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, साध्या किरकोळ गुन्ह्य़ांबद्दल दिल्या जाणाऱ्या क्रूर शिक्षांमुळे त्या काळाला रानटीपणाचे शतक (रूड एज) असे म्हणत. सध्या किरकोळ समजल्या जाणाऱ्या १२० प्रकारच्या गुन्ह्य़ांना त्या वेळी फाशी हीच शिक्षा होती. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले लोक आपली फाशी रद्द करून ऑस्ट्रेलिया वा अमेरिकेच्या निर्जन प्रदेशात हद्दपारीची शिक्षा व्हावी, म्हणून बरीच खटपट करीत. प्रत्येक आठवडय़ातील सोमवारी सकाळी फाशी देण्याचा सरकारी दिवस ठरलेला होता! म्हणून सोमवारची सकाळ ही ‘हँगिंग मॉìनग’- फाशी देण्याची सकाळ! न्यूगेट या भागातील एका चौकात लाकडी चबुतऱ्यावर फाशी देण्याची व्यवस्था केलेली होती. फाशी देणारे दोन जण तिथे हजर असत. ऐन वेळी एकाला जमले नाही तर दुसरा त्याचे काम करी. फाशी देण्याचा कार्यक्रम पाहण्यास स्त्री-पुरुषांची तिथे गर्दी होई. काही जण तर फाशीची ‘गंमत’ पाहण्यासाठी चबुतऱ्याजवळची जागा आधीच ‘बुक’ करीत! फाशीशिवाय मान मुरडणे, खोडे, बोटांचा चाप, नऊ पदरी चाबकांचे फटके, लोखंडी टोप घालणे या शिक्षा असत. सामान्य माणूस या शिक्षांकडे करमणुकीचे साधन म्हणून पाहत असे. त्या वेळचे तुरुंग म्हणजे अनेक साथींची, रोगराईंची माहेरघरे. तुरुंगांचे रखवालदार कैद्यांना छळून त्यांच्याकडून पसे उकळीत. लॉर्ड नॉर्थ याने पुढे या तुरुंग व्यवस्थेत बरीच सुधारणा केली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com 

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias forest wealth
First published on: 02-02-2016 at 00:37 IST