कुतूहल : वातनौका (एअरशिप)

पहिल्या महायुद्धात जर्मनांनी वातनौकेचा वापर लंडनवर बॉम्बवर्षांव करण्यासाठी केला होता. त्यामुळे ब्रिटनमध्ये चिंता प्रचंड वाढली होती.

हवेत तरंगत प्रवास करण्याचा मानवाचा यशस्वी प्रयत्न म्हणजे वातनौका (एअरशिप). वातनौका म्हणजे हवेत उडणारे जहाज (विमान नव्हे!) या वाहनप्रकाराचा वापर १९व्या शतकात प्रचलित होता. जहाज पाण्यावर तरंगते, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते. तशीच वातनौकेची घनता हवेपेक्षा कमी असते, म्हणून ती हवेत तरंगते.

हवेपेक्षा हलका असलेला वायू हायड्रोजन, हिलियम किंवा उष्ण हवा भरलेला फुगा हवेत तरंगतो. वातनौकेच्या रचनेत असा एक प्रचंड फुगा प्रवासी केबिनला जोडलेला असे. या फुग्याचे आकारमान अंदाजे ३० हजार घनमीटर ते सहा लाख घनमीटर एवढे असे व त्यावर अर्थातच वातनौकेची वजन उचलण्याची क्षमता अवलंबून असे. ही वातनौका प्रोपेलर इंजिनावर चाले, ज्यामुळे हवा मागे ढकलली जाऊन वातनौका पुढे जात असे. इंजिनासाठी अर्थातच इंधन लागे. जुन्या काळातल्या या वातनौका साधारणपणे २००मीटर उंचीवरून ‘उडत’ जायच्या. (म्हणजे साधारणपणे २० व्या मजल्याच्या उंचीवरून!) ढगांत असणाऱ्या स्थिर विद्युतचा धोका लक्षात घेऊन नेहमी ढगांच्या खाली राहण्याचा प्रयत्न केला जाई.

वातनौका विमानाप्रमाणे इंजिनच्या साहाय्याने पुढे ढकलल्या जात. तसेच पाणबुडी ज्याप्रमाणे चेंबरमधील साठवलेले पाणी कमी करून वर आणता येते, त्याप्रमाणे फुग्यामधील हायड्रोजन/ हिलियमचे प्रमाण कमी करून वातनौका जमिनीवर उतरवता येत. वातनौकेचा वेग साधारणत: १२५किमी/ तास एवढा असे. पहिल्या महायुद्धात जर्मनांनी वातनौकेचा वापर लंडनवर बॉम्बवर्षांव करण्यासाठी केला होता. त्यामुळे ब्रिटनमध्ये चिंता प्रचंड वाढली होती.

टायटॅनिक जहाजाची कथा सगळय़ांना परिचित असणारच. त्यातली रोमांचकारी गोष्ट म्हणजे त्या महाकाय जहाजाची युरोप ते अमेरिका अशी अटलांटिक महासागर पार करण्याची क्षमता! तसेच त्या जहाजाची आलिशान प्रवासी व्यवस्था! एकोणिसाव्या शतकात युरोप ते अमेरिकेदरम्यानच्या प्रवासासाठी आरामदायी वातनौका असत. त्यांना या प्रवासासाठी ५ ते १० दिवस लागत. मात्र दुर्दैवाने टायटॅनिकप्रमाणेच ‘िहडनबर्ग’ या वातनौकेला १९३७मध्ये अमेरिकतील न्यू जर्सी जवळ एक भयानक अपघात झाला, आणि ‘िहडनबर्ग’ जळून खाक झाले. हायड्रोजन हा सर्वात हलका वायू असला तरी तो ज्वालाग्राही असतो याचा प्रत्यय येथे आला. या अपघातामुळे ही वातनौका प्रवासी सेवा बंद करण्यात आली.

वातनौका मागे पडल्या. पण हेलिकॉप्टर, विमान असे हवेतून प्रवासाचे पर्याय उपलब्ध होत राहिले. आज तर ऊध्र्व प्रवासाची सीमा अंतराळापर्यंत जाऊन पोहोचली आहे.

– डॉ. माधव राजवाडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Information about airship zws

Next Story
भाषासूत्र : कूस- कुशी, मूस- मुशी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी