पृथ्वीचा २० टक्के भाग व्यापून असलेल्या अटलांटिक महासागराचे क्षेत्रफळ १० कोटी ६४ लाख ६० हजार चौरस किलोमीटर इतके आहे. हा महासागर उत्तर आणि दक्षिण अटलांटिक अशा दोन भागांत विभागला आहे. सरासरी तीन हजार ६४६ मीटर खोल असलेला हा महासागर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगभरात दुसरा, तर ७० कोटी पाच लाख ६० हजार चौरस किलोमीटर पसरलेला हिंदी महासागर क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकावर येतो.

पृथ्वीचा १९.८ टक्के पृष्ठभाग हिंदी महासागराच्या पाण्याखाली आहे. आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडांना अमेरिकेपासून विभक्त करणारा अटलांटिक महासागर लांबुडका, उभट, ‘एस’ आकाराचा असून तो उत्तरेला आक्र्टिक, वायव्येला प्रशांत, आग्नेय दिशेला हिंदी महासागर आणि दक्षिणेला अंटाक्र्टिक किंवा दक्षिणी महासागर यांच्याशी संलग्न आहे.

पूर्वापार अनेक शोधमोहिमांनी अटलांटिक महासागराचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. अटलांटिक महासागरामुळे अनेक किनारे, असंख्य उपसागर, आखाते आणि छोटे समुद्र निर्माण झाले आहेत. या महासागराच्या तळाशी ‘मिड अटलांटिक रिज’ ही समुद्रतळाशी असणारी तीनशे किलोमीटर लांबीची पर्वतरांग उत्तर ध्रुवापासून ते थेट दक्षिणेच्या अंटाक्र्टिकपर्यंत पसरलेली आहे. या पर्वतरांगेमुळे अटलांटिक महासागराचे उभे दोन भाग झाले आहेत. जिथे जिथे ही पर्वतरांग पाण्याच्या पृष्ठभागावर आली आहे, तिथे ज्वालामुखी असणारी बेटे निर्माण झाली आहेत. यापैकी नऊ बेटांना ‘जागतिक वारसा स्थळे’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणांचे नैसर्गिक व सांस्कृतिक मूल्य वादातीत आहे.

हिंदी महासागराच्या उत्तरेस आशिया, पश्चिमेला आफ्रिका आणि दक्षिणेला अंटाक्र्टिक खंड आहेत. अरेबियन समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमानचा सागर हे याचेच उपविभाग आहेत. आपल्या भारत देशामुळे या महासागराचे नाव १५५५ पासूनच ‘इंडियन ओशन’ असे पडले आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे हा महासागर जमिनीने वेढलेला आहे. त्यामुळे अटलांटिक किंवा प्रशांत महासागराप्रमाणे हा दोन ध्रुवांपर्यंत पसरलेला नाही. हिंदी महासागराला बऱ्याच नद्या येऊन मिळतात. सर्व महासागरांत हिंदी महासागर हा सर्वात उष्ण पाण्याचा आहे. तर अटलांटिक महासागरातील पाणी सर्वात खारट! (क्षारता ३७ पी.पी.टी). हिंदी महासागराच्या पश्चिमेकडे सर्वात जास्त वनस्पती प्लवक आढळतात. उन्हाळय़ात यांचे प्रमाण वाढते आणि मान्सूनच्या वाऱ्याने ते सर्वदूर पसरतात. त्यावर गुजराण करणाऱ्या पुढच्या पोषण पातळय़ादेखील येथे अधिक प्रमाणात असतात. भारताच्या पश्चिमेला विस्तीर्ण भूखंडमंच आहे. याचा परिणाम म्हणजे येथे मोठय़ा प्रमाणात मासेमारी शक्य होते.

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org