scorecardresearch

कुतूहल : जागतिक अधिवास दिन

दरवर्षी एका ठरावीक मसुद्याचा विचार करून या दिनाचे आयोजन केले जाते.

कुतूहल : जागतिक अधिवास दिन
(संग्रहित छायाचित्र)

ऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी ‘जागतिक अधिवास दिन’ साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने १९८५ साली ठरवले. त्यानंतर दरवर्षी हा दिवस काही देश साजरा करतातही! त्याप्रमाणे २०२२ मध्ये ३ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येईल. दरवर्षी एका ठरावीक मसुद्याचा विचार करून या दिनाचे आयोजन केले जाते. सर्वाना शाश्वत स्वरूपात निवारा मिळावा, पुरेशा सोयी-सुविधांनी युक्त घर असावे आणि विशेषत: बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग अशा घटकांचा खासकरून विचार व्हावा. सर्वासाठी सुरक्षित व आरोग्यपूर्ण परिसर असावा. वाहतूक आणि ऊर्जास्रोत सहज उपलब्ध असावेत. मोकळय़ा व हिरव्या मैदानांची सुविधा असावी. अन्न व पाणी उत्तम दर्जाचे असावे. सांडपाणी निस्सारणाची योग्य व्यवस्था असावी. प्रत्येकाच्या परिसरात हवेचा दर्जा चांगला असावा. या ठिकाणच्या लोकांना रोजगाराची योग्य संधी असावी आणि हे सारे स्वप्नवत वाटणारे निकष पूर्ण करण्यासाठी शासनाने व इतर सामाजिक संस्थांनी कटिबद्ध व्हावे असे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणते. त्यामुळेच यंदाचा मसुदा ‘तफावतींचे भान राखा’ (माइन्ड द गॅप) असा आहे. 

जागतिक अधिवास दिनाच्या निमित्ताने मनाला जे जाणवते ते असे की आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, जैव-भौतिक अशा  निरनिराळय़ा पातळय़ांवरदेखील आपल्याला जगण्याचा समतोल राखता आला पाहिजे. निसर्गाचे भान राखले पाहिजे. पण आत्ताच्या बदलत्या आणि असुरक्षित अशा हवामानातील स्थित्यंतराच्या काळात समग्र मानव जातीचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. ढगफुटी, पूरपरिस्थिती, गारपीट, वणवे, कोठे कोरडे गेलेले कालखंड आणि पिके तयार असताना नको असलेला, कोसळणारा पाऊस या साऱ्यामुळे नैसर्गिक परिसंस्था धोक्यात आल्या आहेत. निसर्गाला ओरबाडताना, निसर्गानेच आपल्याला उत्तर म्हणून अनेक आपत्ती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे निवारे उद्ध्वस्त होत आहेत.

मानवाच्या अधिवासांची जपणूक करताना विविध ठिकाणच्या प्रजाती, जैवविविधता यांचे अधिवासदेखील टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर येते. जर आपल्याला आपले अस्तित्व टिकवायचे असेल आणि आपल्या पृथ्वीचे भले करायचे असेल तर आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्वच नैसर्गिक परिसंस्थांची व तिथल्या अधिवासांची जपणूक करणे अतिशय समर्पक आहे, आपले अधिवास निर्माण करताना आपण खूप साऱ्या पशुपक्ष्यांच्या, वनस्पतींच्या जगण्याचा अधिकारच काढून घेतो आणि पुढे जाऊन त्यांच्या निवाऱ्याचा विचार करणे तर सोडाच, परंतु ते नष्ट करून टाकतो. जागतिक अधिवास दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना समान जगण्याचा हक्क देणे एवढे तरी केले पाहिजे.

डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या