घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठय़ा अक्षरांत ‘आयोडीनयुक्त मीठ’, असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडीइन का मिसळतात?  हा प्रश्न नेहमी पडतो. आयोडीन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भके व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतिमंद वा मुकबधिर होतात. मोठय़ा माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात, बौद्धिक क्षमता कमी होते, वाढ खुंटते. स्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडीन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व कॉर्ड माशाच्या यकृताचे तेल इत्यादींपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोडय़ा प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठय़ा प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते.
त्यामुळे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. गरीब, श्रीमंत असे सर्वच लोक जेवणात मिठाचा समावेश करत असल्याने मिठात आयोडीन मिसळल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे १ किलो मिठात १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमाणात  आयोडीन मिसळणे योग्य ठरते.  
मिठात आयोडीन टाकण्यासाठी चार असेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. यात पोटॅशिअम आयोडेट, पोटॅशिअम आयोडाइट, सोडिअम आयोडेट व सोडिअम आयोडाइड यांचा समावेश होतो. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही मिठात आयोडीन मिसळल्याचा फायदा होतो. ज्या मिठाच्या आयोडायझेशनसाठी आयोडाइड वापरले आहे, ते जास्त काळ हवेच्या संपर्कात आले तर त्यातील आयोडीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घरात मीठ वापरताना ते झाकून ठेवणे चांगले.
डॉ. जगन्नाथ दीक्षित, (औरंगाबाद) मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,चुनाभट्टी,मुंबई २२ office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रबोधन पर्व – नरहर कुरुंदकर – सव्यसाची विचारवंत
नरहर कुरुंदकर (१९३२ ते १९८२) अध्यापन, साहित्य समीक्षा, सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, चित्रपट-नाटक-संगीत आदी कला, समाजवादी चळवळ, राष्ट्र सेवा दल अशा विविध विषयांशी निगडित असलेले आणि त्याविषयी अधिकारवाणीने बोलणारे आधुनिक महाराष्ट्रातले नाव म्हणजे नरहर कुरुंदकर. कुरुंदकरांच्या प्रतिभेची चुणूक तशी अल्पकाळातच जाणवू लागली आणि तिला उजागर करणाऱ्या संधीही मिळाल्या. वयाच्या पंधराव्या वर्षी कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून स्वातंत्र्याची पहाट जवळ आलेली असताना कुरुंदकर यांना तुरुंगात जावे लागले. वयाच्या तेविसाव्या वर्षी सौंदर्यशास्त्र या विषयावर व्याख्यानासाठी कुरुंदकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाने बोलावले होते. एकही पुस्तक नावावर नसताना वयाच्या बत्तिसाव्या वर्षी कुरुंदकर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. कुरुंदकर यांना इंटर पास व्हायला वयाची तिशी गाठावी लागली असली तरी त्यांनी पुढे शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य या अध्यापनाशी निगडित क्षेत्रात अतिशय तन्मयतेने काम केले.
आदर्श शिक्षक -प्राध्यापक-प्राचार्य असा त्यांचा केवळ मराठवाडय़ातच उल्लेख केला जातो असे नाही तो महाराष्ट्रभर केला जातो. त्यांच्याविषयी राम शेवाळकर म्हणतात – ‘‘नरहर कुरुंदकर यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, व्यासंगाने, मूलगामी चिंतनाने व आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादनाने अवघ्या मराठवाडय़ाचे वैचारिक, वाङ्मयीन व सांस्कृतिक नेतृत्व आपल्याकडे घेतले. मराठवाडय़ातील राजकीय कार्यकत्रे एवढेच नव्हे तर राज्यकत्रेसुद्धा कुरुंदकरांच्या या वाढत्या प्रभावाची दखल घेऊ लागले. उर्वरित महाराष्ट्रालाही मराठवाडय़ातील विवेकाचा प्रवक्ता म्हणून कुरुंदकरांना मान्यता द्यावी लागली.’’ कुरुंदकर यांनी केवळ मराठवाडय़ातीलच राजकारण-समाजकारण ढवळून काढले नाही तर महाराष्ट्राचेही लोकशिक्षण केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले कुरुंदकर तितकेच प्रभावी वक्तेही होते. लेखक आणि वक्ता ही दोनच कुरुंदकर यांची खरी रूपे. कुरुंदकर यांनी महाराष्ट्राला नवा विचार दिला नाही, पण विचार कसा करावा हे मात्र शिकवले.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iodised salt
First published on: 18-08-2014 at 01:42 IST