डॉ. जेकिल अ‍ॅण्ड मि. हाईड ही कथा आठवते? परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वं एकाच शरीरात वास्तव्य करत असलेली. लोहाचीही तीच कथा आहे. आपल्या सर्वाच्या जगण्याला आधार देण्याचं काम करणारं लोह ताऱ्यांच्या आयुष्यात मात्र मृत्युदूत बनून येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हणजे होतं काय तर-  कोणत्याही ताऱ्याचा जन्म होतो तो, त्याच्या अंतरंगातल्या हायड्रोजन वायूच्या अणूंचं मीलन होत अणुभट्टय़ा धडधडू लागतात तेव्हा, त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा प्रकाशाच्या रूपात उत्सर्जति होत राहते. केंद्राच्या दिशेनं आत खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्या विरोधात, विरुद्ध दिशेनं काम करणारं त्याच ताकदीचं बल तयार होतं. तारा स्थिर होतो, तेजानं झगमगू लागतो. पण काही काळानंतर हायड्रोजनचं इंधन संपतंच. ताऱ्यातल्या हायड्रोजन-अणुभट्टय़ा बंद पडायला लागतात. गुरुत्वाकर्षणाचं बल भारी होतं. तारा आतल्या आत कोसळायला लागतो. परिणामी त्याची घनता वाढून गुरुत्वाकर्षणाचं बलही अधिकाधिक ताकदवान होऊ लागतं. पण तोवर वाढलेलं तापमान हायड्रोजनच्या अणुमीलनातून तयार झालेल्या हेलियमच्या अणूंचं मीलन घडवून आणायला पुरेसं ठरतं. परत एकदा विझू पाहणाऱ्या अणुभट्टय़ा धडधडू लागतात. तारा परत स्थिर होतो. तेजस्वी होतो. काळ सरतो आणि हेलियमचा साठाही संपुष्टात येतो. परत एकदा आतली ओढ भारी होते, घनता वाढते, तापमान चढतं आणि हेलियमच्या मीलनातून तयार झालेला कार्बन इंधनाचं रूप घेतो. परत अणुभट्टय़ा धडधडू लागतात.

हाच सिलसिला चालू राहतो. पायरी पायरीनं वरचढ अणुक्रमांकाच्या मूलतत्त्वांचं इंधन बनत रहातं. त्यांच्या अणूंचं मीलन होत राहतं. त्यातून अधिक जड मूलतत्त्वाचं इंधन तयार होतं.

असं होता होता लोहाचे अणू तयार झाले की मामला कायमचा थंडावतो. तो लोहाचा भार यमदूत बनत ताऱ्याच्या मृत्यूची घंटा वाजवतो. कारण लोहाच्या अणूंचं मीलन होऊन अधिक भारी मूलतत्त्व तयार होऊ शकत नाही. तसं करण्यासाठी आवश्यक असणारी भारीभक्कम ऊर्जा मिळू शकत नाही. आता गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करायला कोणीच नसतं. ते त्या ताऱ्याच्या पसाऱ्याला आतल्या आत ओढू लागतं. घनता वाढतच जाते. तापमानाचा उच्चांक गाठला जातो. ती घनता, त्यापायी येणारा दबाव सहन न झाल्यानं ताऱ्याचा स्फोट होतो. त्याचा मृत्यू होतो. तो ‘सुपरनोव्हा’ बनतो.  लोहाचे अणू शेवटाचे संकेत देणारे यमदूत बनतात. ताऱ्याच्या अटळ शेवटाची सुरुवात करतात.

डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iron destroyer of the star
First published on: 09-05-2018 at 02:04 IST