दीपलक्ष्मी नारायण पुजारी
कमी खोल, म्हणून पारदर्शक समुद्रात रंगीबेरंगी फुलांसारखे, फांद्यांसारखे, आकर्षक काही सजीव दिसतात, ती प्रवाळ बेटे होत. ही प्रवाळ-बेटे म्हणजे जैविक वसाहतीत राहणारे छोटे सागरी प्राणीच असतात. सागरी परिसंस्थेत ही बेटे महत्त्वाची भूमिका बजावतात. सदाहरित वर्षांवनांतील सजीवांमधील विविधतेप्रमाणे प्रवाळ बेटे अनेकविध सजीवांनी समृद्ध आहेत. या नयनरम्य बेटांच्या सौंदर्याचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. आंतरगुही (सिलसेंटरेटा) वर्गातील लहान आकाराच्या या प्राण्यांचे अन्न म्हणजे छोटे मासे आणि तरंगणारे सूक्ष्म प्राणी.




हे सजीव कॅल्शिअम काबरेनेटचे उत्सर्जन करतात आणि त्याचे कवच त्यांच्याभोवती तयार होते. कालांतराने हे सजीव मृत झाल्यावर, त्यांच्या अवशेषांमध्ये वाढणारे जलशैवाल आणि त्यांनी उत्सर्जित केलेले क्षार एकत्र येऊन प्रवाळ खडक तयार होतात. या खडकांना प्रवाळ मंच किंवा प्रवाळ भित्तिका असे म्हणतात. यातील काही लाल रंगांच्या प्रजातींना पोवळे म्हणतात. ही मौल्यवान पोवळी म्हणजे मृत प्रवाळांचे कंकाल असून त्यांचा रत्न म्हणून वापर करतात. खोल पाण्यातील काही प्रजातींना काळे पोवळे म्हणतात. ते क्वचितच सापडतात.
या भित्तिका तयार होण्यास लाखो वर्षे लागतात. हे प्राणीसमूह समुद्रात ६० मीटर खोलीपर्यंत असतात. प्रशांत आणि हिंदी महासागरात एक हजार मीटर खोलीपर्यंत प्रवाळ आढळतात. प्रवाळ वाढीसाठी विस्तीर्ण पाया लागतो. त्यांची वाढ समुद्रपृष्ठाच्या दिशेने म्हणजेच ऊर्ध्व दिशेने, अर्थातच खालून वर होते. प्रवाळातले प्राणी या पृष्ठभागांना चिकटून राहतात. मृत झाल्यावर या प्राण्यांचे बाह्यकंकाल एकमेकांना चिकटतात आणि त्यांचे एकावर एक थर तयार होतात. वरच्या बाह्यकंकालांच्या वजनाने खालचे थर घट्ट व कठीण होतात. अशा प्रकारे तयार झालेल्या कठीण खडकांपासून प्रवाळ भित्तिका तयार होतात.
नवीन प्रवाळांचा जन्म मृत प्रवाळांच्या वस्तीतच होत असल्याने प्रवाळ खडकांचा विस्तार होतो. अशा प्रकारे मूळ प्रवाळ भिंतीवर, नवीन जिवंत प्रवाळांच्या वसाहती निर्माण होत राहतात. काही वेळा भूअंतर्गत हालचालींमुळे प्रवाळ भित्तिका पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. यांनाच आपण प्रवाळ बेटे म्हणतो. लक्षद्वीप व मालदीवची बेटे ही अशा प्रकारे तयार झालेली बेटे आहेत. सागरी परिसंस्थेत प्रवाळ आणि कांदळवनांपासून जमीन बनते.