पृथ्वीवरील गंधकचक्र म्हणजे गंधकाचा भूमंडल व जीवमंडलातील चक्राकार प्रवास. भूमंडलातील गंधक हे खडकांमधून मातीत मिसळते. पृथ्वीवर गंधक सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि सल्फ्युरिक आम्ल स्वरूपात आढळते. गंधक सजीवातील आवश्यक मूलतत्त्व आहे. प्रथिनातील काही अमिनो आम्लांमध्ये गंधक असते. गंधकचक्रात गंधकाचे ऑक्सिडीकरण व क्षपण होते व त्यातून गंधकाचे जैविक व अजैविक स्वरूपात परिवर्तन होते. वनस्पती आणि जिवाणूंच्या सहाय्याने वातावरणातील गंधक जीवमंडलात प्रवेश करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 डिसल्फ्युरोमोनास (Desulfuromonas), आर्किया (Archea), प्रोटीयस (Proteus), कॅम्पिलोबॅक्टर (Campylobacter), स्यूडोमोनास (Pseudomonas) आणि साल्मोनेला (Salmonella) इत्यादी जिवाणू सल्फेटचे सेंद्रिय गंधकात रूपांतर करतात. असे रूपांतर क्षय व महारोगाचे जिवाणूही करू शकतात, म्हणूनच या प्रक्रियेत अडथळा आणणारी रसायने क्षय व महारोगाच्या प्रतिबंधासाठी वापरतात. समुद्रातील गरम पाण्याच्या झऱ्यांतील जिवाणू थायोमायक्रोस्पायरा (Thiomicrospira),  हॅलोथिओबॅसिलस (Halothiobacillus) आणि बेगियाटोआ (Beggiatoa) हायड्रोजन सल्फाइडचे सरळ गंधकात किंवा सल्फेटमध्ये रूपांतर करतात. त्यांना किमोलीथोट्रोफीक जिवाणू म्हणतात. या जिवाणूंचे सहजीवी त्यांना यासाठी लागणारी कबरेदके पुरवतात. या क्रियेत तयार होणारे गंधक जिप्समच्या स्वरूपात समुद्रात आढळते.  काही जिवाणू सल्फेटचा विनॉक्सिश्वसनक्रियेत (ऑक्सिजनविरहित श्वसन) ऊर्जा मिळवण्यासाठी उपयोग करून घेतात. वातावरणातील सल्फेटचे चयन करणारे जिवाणू गटारातील किण्वनाच्या प्रक्रियेत सहभागी होतात व क्षपणाद्वारे सल्फेटचे रूपांतर हायड्रोजन सल्फाइडमध्ये करतात. हे चयन ऑक्सिजनशिवाय होते. सल्फेटचे जैविक चयन करणाऱ्या जिवाणूंत डिसल्फोबॅक्टेरेल (Desulfobacterales), डिसल्फोविब्रिओनेल(Desulfovibrionales), सिण्ट्रोफोबॅक्टेरेल (Syntrophobacterales), डीसल्फोटोमाकुलम (Desulfotomaculum), डीसल्फोस्पोरोमुसा (Desulfosporomusa), डीसल्फोस्पोरोसायनस (Desulfosporosinus) इत्यादी प्रजातींच्या जिवाणूंचा समावेश होतो. उष्ण पाण्यात आढळणाऱ्या थर्मोडीसल्फोबॅक्टीरिया (Thermodesulfobacteria),  थर्मोडीसल्फोबिअम (Thermodesulfobium) जातीचे जिवाणू व आर्कियोग्लोबस (Archaeoglobus), थर्मोक्लाडियम (Thermocladium) आणि कल्डिविर्गा (Caldivirga) इत्यादी आद्यजिवाणू सल्फेटचे रूपांतर हायड्रोजन सल्फाइडमध्ये करू शकतात.

जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे, सेंद्रिय पदार्थाच्या सडण्यामुळे, ज्वालामुखी व उष्ण पाण्याच्या स्रोतांतूनही गंधक वातावरणात शिरते. खडकांतून ते मातीत मिसळते, पाण्याबरोबर समुद्रात शिरते. वातावरणातील हायड्रोजन सल्फाइड पावसाच्या पाण्यात मिसळते तेव्हा पावसाच्या पाण्याची आम्लता वाढते व त्यामुळे वस्तू गंजतात. पृथ्वीवरील गंधकचक्राचा समतोल मानवी हस्तक्षेपामुळे ढासळत आहे.

– डॉ. जयश्री सैनिस, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal earth sulfur cycle circular travel earth in the globe ysh
First published on: 11-05-2022 at 00:02 IST