फ्रिजॉफ नान्सेन हे १९२२चे नोबेल विजेते संशोधक, केवळ पुस्तकी ज्ञानधारक नव्हते. त्यांची आई मैदानी खेळाडू होती. तिने आपल्या मुलांना दीर्घ सुट्ट्यांत रानावनात जगण्याची सवय लावली. शारीरिक कौशल्यधारी, दुर्दम्य आशावादी, उंच, सडपातळ, चिवट, शीघ्र निर्णय घेणारा नेता अशा धाडसी फ्रिजॉफना स्केटिंग-स्किईंग, पोहण्यातही गती होती. नॉर्वेची राजधानी ऑस्लोतील विद्यापीठात त्यांचा प्राणीशास्त्र हा मुख्य आणि चित्रकला हा आवडीचा विषय होता.
१८८२मध्ये त्यांनी सीलच्या शिकारींसाठीच्या ‘व्हायकिंग’ बोटीवरून ग्रीनलंडच्या पूर्व किनाऱ्याकडे मोहीम काढली. प्राणीशास्त्रातील ज्ञान वापरून समुद्रातील सील, बर्फावरील अस्वलांच्या निरीक्षण-नोंदी पाहून बर्जेन म्युझियममधील ज्येष्ठ वैज्ञानिकांनी नान्सेनना प्राणीजतन-संवर्धन अधिकारीपद दिले. १८८२ अखेर नान्सेनना प्राणीशास्त्रात पीएचडी मिळाली. ग्रीनलँडच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्याकडे जाण्याची, तोपर्यंत न पाहिलेला ग्रीनलँड अभ्यासण्याची मोहीम त्यांनी काढली. ते पाच सहकाऱ्यांसह दोन महिने उणे ४५ अंश सेल्शिअस तापमानात बर्फाळ डोंगरदऱ्यांतून समुद्रसपाटीपासून २.७ किलोमीटरवरून स्केटिंग करून अर्धमेल्या स्थितीत विजयी वीर म्हणून पश्चिम किनाऱ्यावर पोहोचले. मध्य-ग्रीनलँडच्या नव्या माहितीवर आधारित शोधनिबंध आणि ‘फर्स्ट क्रॉसिंग ऑफ ग्रीनलँड’ आणि ‘एस्किमो लाईफ’ ही पुस्तके नान्सेन यांनी लिहिली.
हेही वाचा >>> कुतूहल : कार्बन डायऑक्साइड शोषक महासागर
नान्सेन यांनी ध्रुवीय समुद्रप्रवाहामुळे ध्रुवीय बर्फ पूर्व-पश्चिम जातो असा अंदाज वर्तवला. सत्यशोधनासाठी नान्सेननी योजना आखली. कल्पकतेने ‘फ्रॅम’ (नॉर्वेजियनमध्ये ‘फॉरवर्ड’) अतिबलशाली खास बनावटीचे जहाज बांधून घेतले. ते सायबेरियाजवळ मुद्दाम बर्फात अडकू दिले. बर्फ वितळल्यावर पस्तीस महिन्यांनी ‘फ्रॅम’ स्पित्झबर्जेनजवळ खुल्या समुद्रात पोहोचले. पण त्यावर नान्सेन नव्हते. एक सोबती, दोन कयाक, २८ कुत्रे, कुर्त्यांच्या व माणसांच्या ३० दिवसांच्या खाद्यासह नान्सेन उत्तर ध्रुवाकडे गेले होते. समुद्रातल्या काहीशा भुसभुशीत बर्फावरून हा ताफा २३ दिवसांत २२५ किलोमीटर अंतर पार करून उत्तर ध्रुवाजवळ पोहोचला. मानवाने न पाहिलेल्या उत्तरध्रुवीय भागाला स्पर्शून आग्नेयेला वळून ‘फ्रान्झ जोसेफ’ पठारावर हिवाळा काढून नॉर्वेच्या वार्डोत पोहोचले. नान्सेनचे भूगोल, नकाशाविषयक ज्ञान इतके अचूक होते, की त्यांच्यापाठोपाठ ‘फ्रॅम’ही तेथे पोहोचले. चार लाखांवर जागतिक युद्धकैद्यांना रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरीतून सुखरूप आपापल्या देशात पोहोचवण्याची ‘नोबेल पारितोषिकपात्र’ कामगिरी नान्सेन यांनी केली. कागदपत्ररहित युद्धनिर्वासितांसाठी ज्याच्या नावे जगन्मान्य ‘नान्सेन पासपोर्ट’ जारी करण्यात आला, असा हा अवलिया वैज्ञानिक!
– नारायण वाडदेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org