जीवाणू दोन प्रकारचे विष तयार करतात. काही जीवाणूंत, उदाहरणार्थ टायफॉइडच्या जीवाणूंत ‘आंतरपेशीय’ विष असते. ते विष त्याच्या पेशीभित्तिकेत असते. हे जीवाणू मेल्यावरच पेशीतील विष बाहेर पडते. मात्र बोट्युलिनम जीवाणूतील विष ‘बाह्यपेशीय’ आहे. म्हणजे हा जीवाणू वाढत असतानाच विष पोषणमाध्यमात पेशीच्या बाहेर टाकतो.

बोट्युलिझम म्हणजे क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम या जीवाणूमुळे होणारी विषबाधा. बोटुलिनम हे विनॉक्सी श्वसन करणारे, मातीत आढळणारे अतिप्राचीन जीवाणू आहेत. त्यांच्या जीवाणूपेशींत तयार झालेले ‘अंतर्बीजाणू’ वाऱ्याबरोबर फैलावतात. ऑक्सिजनची कमतरता असलेल्या ठिकाणी ते वाढतात. हवा, पाणी, अन्नातून, जखमांतूनही क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनमचे बीजाणू शरीरात शिरतात. काही वेळा मधातही क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनमचे अंतर्बीजाणू आढळून येतात. एक वर्षाखालील बाळांना मधातून, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम अंतर्बीजाणू शरीरात शिरून, अन्नविषबाधा होऊ शकते. म्हणून छोट्या बाळांना मध चाटवू नये.

अंतर्बीजाणू पूर्ण कोरड्या जागी, अतिउच्च तापमानाला, तीव्र हानीकारक रसायने असणाऱ्या जागीही सुप्तावस्थेत टिकाव धरू शकतात. क्लॉस्ट्रिडियम दंडगोल, काकडीच्या आकाराचे असतात. त्यांतील अंतर्बीजाणू लंबगोल, अंड्याच्या आकाराचे असतात. त्यांच्याभोवती अनेक थरांचे घट्ट कवच असून ते आतील क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम अंतर्बीजाणूचे प्रतिकूल पर्यावरणापासून संरक्षण करते. ज्या क्लॉस्ट्रिडियम जीवाणूत अंतर्बीजाणू असतो, तो एका बाजूला फुगीर पुंगीसारखा दिसतो.

लहान आतड्यांत, खोल जखमांत, डबाबंद अन्नात, दमटपणा आणि पोषक पदार्थ मिळाले की सुप्त अंतर्बीजाणू सक्रिय होतात. फळांच्या पृष्ठभागावर, दूध, दही, पनीर, मासे, अन्य समुद्रीजीव आणि डबाबंद अन्नपदार्थांतही सुप्तावस्थेतले अंतर्बीजाणू असू शकतात. भारतात फारसे डबाबंद अन्न खाल्ले जात नाही. पण असे अन्न खाणाऱ्यांनी डब्याची झाकणे फुगलेली असतील, डबे वाकले असतील तर त्यातील अन्न खाऊ नये. त्याची सुरक्षित विल्हेवाट लावावी. अन्न फुकट जाऊ नये म्हणून इतर प्राण्यांना ते देऊन त्यांना मृत्युमुखी ढकलू नये.

क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम जीवाणू ‘बोटुलिनम’ चेताविष निर्माण करतात. ते नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले सर्वांत प्रभावी चेताविष असून एक ग्रॅम बोटुलिनम दहा लाख माणसे मारू शकते. म्हणजे ते कोब्रा विषापेक्षाही प्रभावी असते. बोटुलिनममुळे स्नायू शिथिल होतात. स्नायू निकामी झाले तर पक्षाघाताने श्वास घेणेही अशक्य होऊन मृत्यू ओढवतो.

या विषापासून ‘बोटॉक्स’ हे औषध तयार केले जाते. यामुळे गाला-कपाळावरच्या सुरकुत्या घालवता येतात. ओघळलेल्या पापण्या वर उचलता येतात. अर्धशिशी बरी करता येते. या विषाची जहालता लक्षात घेता जैविक अस्त्र म्हणूनदेखील याचा वापर केला जातो.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org