किनारपट्टीवर वाढणाऱ्या झाडांना खाजण वने किंवा खारफुटी वने किंवा कांदळवने असे संबोधले जाते. इंग्रजीमध्ये या वनस्पतींना ‘मॅन्ग्रोव्ह’ म्हटले जाते. पोर्तुगीजमध्ये या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘मंगल’ असा होतो. वाढत्या तापमानाचा विचार केला असता या वनस्पती महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘पवित्र काम करणारी’ म्हणून त्यांना ‘मंगल वने’ म्हणून ओळखले जाते.
दलदलयुक्त भागात वाढत असताना खारफुटींना प्राणवायूचा अभाव जाणवतो. हा अभाव दूर करण्यासाठी त्यांना अतिरिक्त आगंतुक मुळे येतात. खारफुटी वनस्पतींमध्ये शल्य मुळे, गुडघ्याच्या आकाराची मुळे, आधार मुळे, हवाई मुळे यांसारखे आगंतुक मुळांचे विविध प्रकार आढळतात.
मोठय़ा प्रमाणात कार्बनचे निराकरण आणि साठवण करण्याच्या क्षमतेमुळे खारफुटी परिसंस्था ही सर्वात उत्पादक परिसंस्थांपैकी एक मानली जाते. ही परिसंस्था विशेष महत्त्वाची आहे. कारण येथे विघटन प्रक्रियादेखील सतत सुरू असते आणि त्यामुळे जटिल सेंद्रिय पदार्थ पुन्हा निसर्गात मिसळण्याची महत्त्वाची प्रक्रिया येथे होते. पाणी आणि जमीन यांच्यात समन्वय साधून ही परिसंस्था निसर्गात संतुलन ठेवते.
खारफुटीची किनारी जंगले, जिवाणूंपासून ते बंगाली वाघांपर्यंत हजारो प्रजातींसाठी, शेकडो किनारी पक्षी आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींसाठी घरटी, निवासस्थान आणि विश्रांतीची ठिकाणे आहेत. खारफुटीच्या मुळांमध्ये समुद्रातील अनेक माशांच्या प्रजाती, परिपक्वता येण्याच्या आधीच्या वयात आश्रय घेतात. ते वाढतात तेव्हा समुद्रातील गवताच्या कुरणांवर त्यांचे पोषण होते आणि पूर्ण वाढ झाल्यावर ते समुद्रात जातात. कोळंबीच्या विविध प्रजातींसाठी हा प्रदेश पाळणाघरासारखाच असतो.
संधिपाद प्राण्यांचे जीवनचक्र खारफुटीमुळे पूर्ण होते. मत्स्यखाद्य प्रजातीतील अंदाजे ७५ टक्के मासे काही काळ खारफुटीमध्ये घालवतात.खारफुटी परिसंस्था ही जगातील सर्वात कार्बनसमृद्ध प्रणाली असून मत्स्यपालन उत्पादन, किनारपट्टी स्थिरीकरण, जैवविविधतेचा अधिवास, समुद्रकिनाऱ्याच्या लाटा व त्सुनामीसारख्या चक्रीवादळांपासून संरक्षण, इत्यादी बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार कलम ४ अंतर्गत आतापर्यंत १९ हजार ५०० हेक्टर कांदळवन क्षेत्र ‘राखीव वने’ म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. कायद्यांचा वापर करून कांदळवनांचा ऱ्हास, भराव टाकणे आणि कांदळवनांची तोड करणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
डॉ. तरन्नुम मुल्ला ,मराठी विज्ञान परिषद