scorecardresearch

कुतूहल : भारतातील आद्य पर्यावरणवादी

चिपको आंदोलनाची लोकप्रियता वाढवण्यास जबाबदार असलेले सुंदरलाल बहुगुणा यांचे कोविड-१९ संसर्गातून उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे २१ मे २०२१ रोजी निधन झाले.

सुंदरलाल बहुगुणा

चिपको आंदोलनाची लोकप्रियता वाढवण्यास जबाबदार असलेले सुंदरलाल बहुगुणा यांचे कोविड-१९ संसर्गातून उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे २१ मे २०२१ रोजी निधन झाले. हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलांच्या संरक्षणासाठी त्यांनी १९७० पासून चिपको आंदोलनाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर १९८० ते २००४ या कालावधीत ते टेहरी धरणाविरुद्ध सतत कार्यरत राहिले. भारतातील आद्य पर्यावरणवादी व्यक्तींपैकी ते एक होते. अतिप्रचंड धरणांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याकडे त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.

९ जानेवारी १९२७ रोजी उत्तराखंडातील टेहरी येथील मरोडा गावात जन्मलेल्या सुंदरलाल बहुगुणा यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातदेखील भाग घेतला होता. गांधीवादी विचारांनी प्रेरित असलेल्या बहुगुणांनी चार हजार ७०० किलोमीटर अंतर पायी पार करून महाप्रचंड प्रकल्पांमुळे होणारे हिमालयातील दऱ्याखोऱ्या-जंगलांचे नुकसान किती भयानक आहे, याचे वास्तव निदर्शनास आणले. हिमालयाची परिसंस्था अतिशय नाजूक असते. ही ढासळली तर सामाजिक परिणामदेखील भयावह होतात, याची कल्पना त्यांनी आधीच दिली होती. आता मात्र विकासाच्या रेटय़ात या भागात झालेल्या मानवनिर्मित रचनांमुळे, गेल्या काही दशकांतील हवामान बदलाच्या संकटांमुळे स्थानिकांची आणि पर्यटकांची अपरिमित हानी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘इकॉलॉजी इज पर्मनन्ट इकॉनॉमी’ हे त्यांचे अतिशय महत्त्वाचे घोषवाक्य परिसंस्थेचा अर्थशास्त्राशी असलेला कायमस्वरूपी संबंध दर्शवते. त्यांनी १९८१ ते ८३ या कालावधीत हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांतील गावागावांत हिंडून जनजागृती केली. याच काळात कार्यरत असलेल्या गौरादेवी यांच्याबरोबरदेखील त्यांनी चिपको आंदोलनाचा प्रसार केला. त्यांच्या समाजकार्याचा परीघ केवळ पर्यावरणापुरता सीमित न राहता डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांची स्थिती सुधारणे, विशेषत: महिलांना सक्षम करणे आणि जातीवाद मिटवण्यापर्यंत विस्तारला होता.

त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन कर्नाटकातील पांडुरंग हेगडे यांनी १९८३ मध्ये ‘अ‍ॅप्पिको चळवळ’ उभारली. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या क्षेत्राच्या रक्षणासाठी त्यांच्यासोबत बहुगुणा यांनीदेखील दक्षिण भारत पिंजून काढला. ‘बेढती’ येथे उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला या साऱ्यांचा कडाडून विरोध होता.

बहुगुणा यांना १९८१ मध्ये पद्मश्री, १९८७ मध्ये ‘राइट लाइव्हलीहूड पुरस्कार’ आणि २००९ मध्ये पद्मभूषण हा बहुमान देऊन त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला. बहुगुणांच्या कार्यामुळेच चिपको आंदोलनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kutuhal india first environmentalist popularity chipko movement responsible sunderlal multiplication died ysh

ताज्या बातम्या